प्रलंबित मानधनासाठी शासकीय अधिकार्‍याला मारहाण! संगमनेर पंचायत समितीमधील प्रकार; काँग्रेस नेत्यासह दहाजणांवर गुन्हा.. ‘त्या’ अधिकार्‍याने माझा विनयभंग केला! महिलेचा तक्रार अर्ज; कारवाईसाठी मात्र ठिय्या..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
महिला बचत गटाच्या समुदाय संसाधन व्यक्ति म्हणून कार्यरत असलेल्या एका महिलेचे मानधन रखडवल्याचा आरोप करीत आठ ते दहाजणांनी पंचायत समितीचे तालुका अभियान व्यवस्थापक नंदलाल कोकाटे यांना सोमवारी दुपारी बेदम मारहाण केली. या प्रकरणी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे समर्थक शरद थोरात यांच्यासह आठ ते दहाजणांवर फौजदारी कट रचून लोकसेवकाला मारहाण आणि सरकारी कामात व्यत्यय आणल्याचा गुन्हा दाखल झाल्याने संगमनेरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. सोमवारी रात्री उशिराने लोकसेवकाच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद झाल्यानंतर सदरील महिलेनेही ‘त्या’ अधिकार्‍याने विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करीत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत तक्रारअर्जही दाखल केला आहे, मात्र पोलिसांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नसल्याने काँग्रेस समर्थक महिलांनी आज (ता.24) शहर पोलीस ठाण्यासमोर जमून जोरदार घोषणाबाजीही केली. त्यातून महिनाभराच्या विश्रांतीनंतर संगमनेरातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून पुढील काही दिवस संगमनेरकरांना त्याचा तापही सहन करावा लागणार आहे.


याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना सोमवारी (ता.23) दुपारी सव्वादोनच्या सुमारास तालुका पंचायत समिती कार्यालयात घडली. या प्रकरणी पंचायत समितीच्या तालुका अभियान योजनेचे व्यवस्थापक नंदलाल पोपटराव कोकाटे (मूळ रा.वारनवाडी, ता.पारनेर, ह.मु.संगमनेर) यांनी कथन केलेल्या फिर्यादीनुसार तालुक्याच्या पूर्वेकडील (विखे पाटलांच्या प्रभावाखालील) एका गावातील महिला बचतगटाच्या समुदाय संसाधन अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या एका चाळीस वर्षीय महिलेविषयी असंख्य तक्रारी असल्याने ‘त्या’ महिलेला पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांनी कारवाई का करु नये अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस बजावली होती. संबंधित महिलेकडून ठरवून दिलेल्या कालावधीत ‘त्या’ नोटीसला उत्तर मिळणे अपेक्षित होते, प्रत्यक्षात मात्र तसे न घडल्याने त्या महिलेला शासनाकडून दिले जाणारे मासिक मानधन रोखण्यात आले होते.


सोमवारी (ता.23) दुपारी सव्वादोनच्या सुमारास अभियान व्यवस्थापक नंदलाल कोकाटे आपल्या कार्यालयात असतानाच सदरील महिला आपले पती व शरद थोरात यांच्यासह त्यांच्या दालनात आले. यावेळी थोरात यांनी; ‘या महिलेचे मानधन का दिले नाही?’ अशा दरडावणीच्या भाषेत त्यांच्याकडे विचारणा केली. त्यावर संबंधिताने त्या महिलेविरोधातील तक्रारींचा पाढा वाचून त्यांची कामगिरी असमाधानकारक असल्याचे सांगत गटविकास अधिकार्‍यांनी नोटीस बजावल्यानंतरही त्याचे उत्तर न मिळाल्याने त्यांचे मानधन थांबवण्यात आल्याची माहिती दिली. त्यावर थोरात यांनी; ‘आम्ही खुलासा करणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा’ असे सांगत दरडावण्याचा प्रयत्न केला.


त्या उपरांतही नंदलाल कोकाटे यांनी शरद थोरात व त्यांच्यासोबतच्या व्यक्तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्याचा राग येवून थोरात यांनी त्यांच्या डोक्यात चापटीने मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून कार्यालयातील दोघा-तिघा कर्मचार्‍यांनी मध्यस्थी करीत प्रकरण मिटवले. या प्रकाराने घाबरलेल्या नंदलाल कोकाटे यांनी तेथून थेट कार्यालयातील आपल्या वरीष्ठ अधिकार्‍यांकडे जावून घडल्या प्रकाराची माहिती दिली व ते दुसर्‍या खोलीत निघून गेले. त्यानंतर काहीवेळाने पुन्हा आठ ते दहाजण आले व त्यांनी सदरील अधिकार्‍याला नाव, गाव विचारुन खात्री होताच त्यातील चार-पाचजणांनी ‘तु शरद नानाला ओळखीत नाही का?’ असा सवाल करीत पुन्हा मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळीही कार्यालयातील अन्य अधिकारी व कर्मचार्‍यांनी धाव घेत मारहाण करणार्‍यांची समजूत काढीत त्यांना बाजूला नेले.


या दरम्यान संबंधित व्यवस्थापकाने मारहाण करणार्‍या जमावातील प्रत्येकाचे नाव जाणून घेत रात्री उशिराने शहर पोलीस ठाणे गाठले व दुपारी घडलेला संपूर्ण प्रकार कथन केला. त्यावरुन पोलिसांनी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे समर्थक व अलिकडेच काँग्रेसच्या गोटात शिरलेल्या शरद थोरात, अभिषेक थोरात, ऋषीकेश थोरात, शिवामृत भोकरे व अक्षय भालेराव यांच्यासह चार ते पाचजणांवर भारतीय न्यायसंहितेच्या कलम 132, 121 (1), 131, 133, 61 (2) प्रमाणे बेकायदा जमाव, दंगल माजवणे यासह समान उद्दिष्टांच्या तरतुदींन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाने संगमनेरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून सत्ताधार्‍यांकडून थोरात समर्थकांवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे.


या प्रकरणात गुन्हा दाखल झालेले थोरात समर्थक शरद थोरात कधीकाळी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जात, या काळात त्यांची उठबैस महायुतीच्या नेत्यांमध्ये असतं, मात्र दोन महिन्यांपूर्वी पिंपरणेत झालेल्या एका सोहळ्यात त्यांनी आपल्या विरोधाची तलवार म्यान करुन भविष्यातील राजकारण माजीमंत्री थोरात यांच्यासोबत एकत्र येवून करण्याचा निश्‍चय करीत आपल्या समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शरद थोरात यांचा लढवय्या स्वभाव पाहता काँग्रेसच्या संयमी राजकारणात ते स्वतःला किती दिवस शांत ठेवतील असा प्रश्‍न विचारला जात असतानाच सोमवारी पंचायत समिती प्रकरणातून त्याचा प्रत्यय संगमनेरकरांना आला.


नायक वृत्तसेवा, संगमनेर
बचत गटाचे काम करणार्‍या तालुक्यातील एका 40 वर्षीय समुदाय संसाधन व्यक्ति म्हणून कार्यरत महिलेचे मानधन रोखल्याच्या कारणावरुन थोरात समर्थक कार्यकर्त्यांनी सोमवारी पंचायत समितीच्या अभियान व्यवस्थापकाला मारहाण केल्याचा प्रकार समाज माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणातील महिलेनेही सदरील अधिकार्‍याने मानधन मिळवण्यासाठी आपल्यासोबत फिरायला येण्याची गळ घालून कार्यालयातच आपला विनयभंग केल्याचा तक्रारअर्ज शहर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे, मात्र पोलिसांनी त्यावर अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेसच्या महिला आघाडीने शहर पोलीस ठाण्याच्या आवारातच ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली. त्यातून शहरातील राजकारण पुन्हा एकदा तापू लागल्याची चिन्हेही दिसू लागली आहेत.


सोमवारी (ता.23) दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडलेल्या या प्रकरणात माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे समर्थक शरद थोरात यांच्यासह आठ ते दहाजणांनी पंचायत समितीच्या कार्यालयात जावून सदरील महिलेचे मानधन का रोखले? असा सवाल करीत त्या अधिकार्‍याला थेट लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी नंदलाल पोपटराव कोकाटे या अधिकार्‍याच्या तक्रारीवरुन शासकीय कार्यालयात घुसून धुडगूस घालण्याच्या प्रकरणी गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल झाल्याने त्याला प्रत्यूत्तर म्हणून सदरील महिलेनेही आपला तक्रारअर्ज दाखल करीत सोमवारी त्यांच्यासोबत घडलेला प्रकार पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न केला.


त्यानुसार सोमवारी दुपारी सदरील महिला अभियान व्यवस्थापक नंदलाल कोकाटे यांच्याकडे मानधनाबाबतची विचारणा करण्यासाठी गेली असता त्या अधिकार्‍याने ‘तुमचे मानधन माझ्या हातात आहे, मी म्हणतो तसे करा, त्यानंतरच तुमचे मानधन तुम्हाला मिळेल..’ असे म्हणत त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान त्याने सदरील महिलेला स्पर्श करुन ‘तु दोन दिवस माझ्यासोबत फिरायला चल, तिकडून आल्यानंतर तुझे मानधन काढून देतो..’ असे सांगत स्त्री मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे ‘त्या’ महिलेने शहर पोलिसांना दिलेल्या तक्रारअर्जात म्हटले आहे.


मात्र पोलिसांनी सदरील महिलेचा अर्ज दाखल करुन घेतला असला तरी त्यावर कोणतीही कायदेशीर प्रक्रिया केलेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेसच्या महिला आघाडीने आज सकाळपासूनच शहर पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या दिला असून विनयभंग करणार्‍या अधिकार्‍याविरोधात तक्रार दाखल करण्यासह शरद थोरात व अन्य आठ ते दहाजणांवर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला आहे. मात्र त्या उपरांतही वृत्तलिहेपर्यंत त्या महिलेच्या तक्रारअर्जाची दखल घेतली गेली नव्हती.

Visits: 3 Today: 3 Total: 1602591

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *