कोतूळमध्ये अवैध दारु विक्रीवरुन दोन गटांत राडा पोलिसांनी तत्काळ धरपकड करुन तणाव केला शांत


नायक वृत्तसेवा, अकोले 
ड्राय डेच्या दिवशीच कोतूळमध्ये बुधवारी (ता. ६) अवैध दारु विक्रीवरून दोन गटांत हाणामारी झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांना ताब्यात घेतल्याने तणाव निवळला. आठवडे बाजारच्या दिवशी बसस्थानक परिसरात ही घटना घडल्याने दिवसभर चांगलीच चर्चा रंगली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने सार्वजनिक सुट्टी असल्याने सर्वत्र देशी-विदेशी दारु विक्री बंद होती. ड्राय डे असताना पोलीस आणि दारु उत्पादन शुल्कच्या आशीर्वादाने आठवडे बाजारच्या दिवशी बसस्थानक परिसरात पार्सल पद्धतीने अवैधरित्या देशी दारुची हातोहात विक्री सुरू होती. सरकारमान्य दारु दुकाने बंद असल्याने मद्यपी ग्राहकांनी ड्राय डेच्या दिवशी या अवैध दारुचा पुरेपूर आस्वाद घेतला.

मात्र, ग्राहकांचा ओघ वाढल्याने दोन अवैध दारू विक्रेत्यांमध्ये व्यवसायाच्या स्पर्धेतून जोरदार हाणामारी झाली. बराच वेळ सुरू असणारा हा गोंधळ अनेकांनी पाहिल्यानंतर पोलिसांपर्यंत ही खबर गेली. पोलिसही तत्काळ याठिकाणी हजर झाले. पोलिसांनी या अवैध दारु विक्रेत्यांसह हाणामारी करणार्‍यांची धरपकड करुन तणाव शांत केला. पोलिसांनी या दारु विक्रेत्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

दरम्यान, गावातील परवानाधारक देशी दारुचे दुकान स्थलांतरीत झाले आहे. या दुकानाकडे जाण्याचे अंतर जास्त असल्याने मद्यपी ग्राहकांचा ओढा गल्ली बोळात सुरू झालेल्या अवैध दारुकडे वळत आहे. यामुळे गावात अवैध दारु विक्रीचे व्यवसाय गल्लीबोळात सुरू झाले आहेत. झटपट पैसे मिळवण्याचा हा व्यवसाय असल्याने अनेक तरुण या व्यवसायाकडे वळत असल्याचे दिसून येते. यापूर्वी पोलिसांनी अनेक छापे टाकून विक्रेत्यांना पकडले. मात्र, त्यांना काही फरक पडत नाही. उत्पादन शुल्क अधिकारी मात्र, याकडे डोळेझाक करत असल्याने हा व्यवसाय फोफावत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

Visits: 95 Today: 3 Total: 1102691

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *