कीड रोगनाशक म्हणून वापर होणार्या कडूलिंबावरच किडीचा हल्ला निसर्गप्रेमी तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन समूहाच्या सर्वेक्षणातून उघड
नायक वृत्तसेवा, नगर
कीड रोगनाशक म्हणून वापर करण्यात येणार्या कडूलिंबावरच एका किडीने हल्ला केला आहे. एक प्रकारच्या हुमणीच्या जीवन साखळीतील हे भुंगेरे कडूलिंबाचा पाला खात असल्याने झाड वाळून जात असल्याचे प्रकार आढळून आले आहेत. निसर्गप्रेमी तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन समूहामार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून हे स्पष्ट झाले आहे.
पिकांवर पडणार्या अनेक प्रकारच्या कीड रोगावर कडुलिंबाचे औषध फवारले जाते. कडूनिंबाचा पाला माणसांमध्येही अनेक रोगांसाठी उपयुक्त ठरतो. मात्र, सध्या या कडुलिंबाच्या झाडालाच किडीने ग्रासले आहे. अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी कडूलिंबाची झाडे वाळून जात असल्याचे आढळून आले. असे का होत आहे, यासाठी निसर्गप्रेमी तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन समूहामार्फत जिल्ह्यात सर्वेक्षण करण्यात आले.
यासंबंधी निसर्ग अभ्यासक जयराम सातपुते यांनी सांगितले, ‘हुमणीच्या भुंगेर्यांचे प्रमाण यावर्षी तुलनेने प्रचंड वाढले आहे. त्याचा प्रादुर्भाव कडूलिंब वृक्षांवर दिसून आला. ठिकठिकाणी कडूलिंबांचे वृक्ष वाळून जात आहेत. हुमणी ही शेती फळबागा तसेच इतर वनस्पतींसाठी अतिशय उपद्रवी अळी आहे. देशात हुमणीच्या सुमारे 300 प्रजाती असून त्यातील लिकोफोलिस आणि होलोट्रॅकिया अशा दोन प्रजाती आपल्याकडे आढळतात. हुमणीची जीवनसाखळी अंडी, अळी, कोष व कीटक या अवस्थांमधून पूर्ण होते. अळी अवस्थेत असताना हुमणी जमिनीत राहून पिकांची मुळे खातो. जून-जुलैमध्ये त्याचे किटकात रुपांतर झाल्यावर भुंगेरे जमिनीतून बाहेर येतात. ते थव्याने कडूलिंब व बाभूळ या झाडांवर रात्री हल्ला करतात. हे भुंगेरे सुमारे शंभर दिवस जगतात. यावर्षी त्यांचे प्रमाण अधिक असल्याने जादा नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. यावर कोणतीही रासायनिक औषधे वापरून या किडीचे नियंत्रण करण्यापेक्षा रुईच्या चिकाची फवारणी करावी. पिकांची फेरपालट करून हुमणी नियंत्रणात आणता येते,’ असेही सातपुते यांनी सांगितले.
या सर्वेक्षणात महापालिका उद्यान विभागप्रमुख मेहेर लहारे यांच्यासह वनस्पती अभ्यासक प्रीतम ढगे, उमेश भारती, अतुल सातपुते, राजेंद्र बोकंद, संजय बोकंद, विजय परदेशी, अजिंक्य सुपेकर, विठ्ठल पवार, संदीप राठोड, अंकुश ससे, सतीष गुगळे, नितीन भोगे, मच्छिंद्र रासकर, प्रवीण साळुंके, विलास नांदे, अमित गायकवाड यांच्यासह तीस अभ्यासकांनी सहभाग घेतला.