मुंबईच्या व्यापार्याची दोन कोटी रुपयांची फसवणूक श्रीरामपूर येथील सराफ पिता-पुत्रावर गुन्हा दाखल
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
सुवर्णालंकार व डायमंड अलंकाराच्या व्यवहारापोटी श्रीरामपूर येथील सराफ पिता-पुत्राने मुंबई येथील व्यापार्याची सुमारे दोन कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्पूर्वी या घटनेने सराफा व्यापार्यांत एकच खळबळ उडाली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, श्रीरामपूर शहरातील वैष्णवी अलंकारचे अक्षय बाळासाहेब डहाळे व बाळासाहेब विश्वनाथ डहाळे यांनी मुंबई येथील व्यापारी दिनेश प्रकाश मेहता (वय 47, रा.विलेपार्ले, मुंबई) यांच्याकडून सुमारे 1 कोटी 98 लाख 6 हजार रुपयांचे सुवर्णालंकार व डायमंड अलंकाराचा व्यवहार केला होता. या अलंकाराची रक्कम दिनेश मेहता यांनी अक्षय डहाळे व बाळासाहेब डहाळे यांच्याकडे मागितली असता त्यांनी दिली नाही. उलट मेहता यांना रक्कम व अलंकार परत न करता उलट तुला जे करायचे ते कर, तुझे सोने व डायमंडचे अलंकार आम्ही देणार नाही व पैसेही देणार नाही असे बोलून मेहता यांची रक्कम बुडविण्याच्या हेतूने त्यांची फसवणूक केली.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात प्रकाश मेहता यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 430/2021 प्रमाणे अक्षय बाळासाहेब डहाळे व बाळासाहेब विश्वनाथ डहाळे यांच्या विरुद्ध भादंवि कलम 420, 406, 34 अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास शहराचे पोलीस निरीक्षक संजय सानप करत आहे. या प्रकाराने सराफा व्यापार्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.