‘राजहंस’चा कायमच दूध उत्पादकांना मोठा दिलासा ः थोरात दूध संघामध्ये बॉयलर व अॅटो कन्व्हेअरचे उद्घाटन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
दूध व्यवसायामुळे तालुक्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली असून कोरोना संकटातील लॉकडाऊनमध्ये एकही दिवस बंद न ठेवता राजहंस संघाने शेतकर्यांना मोठा दिलासा दिला आहे. नव्याने उभारलेला दूध पावडर प्लँट हा संकट काळात देखील मोठा आधार ठरले असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे नवीन बॉयलर व अॅटो कन्व्हेअर उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख हे होते. तर व्यासपीठावर ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, उपाध्यक्ष साहेबराव गडाख, गणपत सांगळे, संचालक लक्ष्मण कुटे, आर. बी. रहाणे, मोहन करंजकर, विलास वर्पे, डॉ. गंगाधर चव्हाण, बाबासाहेब गायकर, विलास कवडे, संतोष मांडेकर, अण्णासाहेब राहिंज, पांडुरंग सागर, माणिक यादव, राजेंद्र चकोर, सुभाष आहेर, सुभाष गुंजाळ, कार्यकारी संचालक डॉ. प्रताप उबाळे, फायनान्स मॅनेजर जी. एस. शिंदे आदी उपस्थित होते.
लॉकडाऊन संकटात अनेक खासगी दूध संघांनी दूध घेणे बंद केले होते. अनेक व्यवसाय बंद असल्याने दुधाची विक्री होत नव्हती. अशा संकट काळात सुद्धा एकही दिवस दूध बंद ठेवता राजहंस दूध संघाने शेतकर्यांना मोठा दिलासा दिला होता. या संकट काळात महानंदचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांच्या पाठपुराव्यातून राज्यात दरोज दहा लाख लिटर दुधाची पावडर बनविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठा ऐतिहासिक निर्णय घेत शेतकर्यांना मदत केली होती. याचबरोबर राजहंस दूध संघाने सुद्धा उभारलेल्या पावडर प्लँटमुळे तालुक्यातील शेतकर्यांना मोठा आधार मिळाला असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
तर संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख म्हणाले, महसूल मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली राजहंस संघाची गौरवास्पद वाटचाल सुरू असून सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या आर्थिक शिस्त व काटकसर या तत्वांवर दूध संघाचा कार्यभार सुरू आहे. संघाच्या पावडर प्लँटचा निर्णय हा मोठा दिशादर्शक ठरला आहे. अॅटो कन्व्हेअर व नव्या बॉयलरमुळे दूध संघाच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. यापुढील काळातही शेतकर्यांच्या हितासाठी सातत्याने काम केले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी विनायक वैद्य, रमेश कोळगे, बाळासाहेब बडे, शरद केकाण, भाऊसाहेब आहेर, सुरेश जोंधळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अॅड. सुरेश जोंधळे व नामदेव कहांडळ यांनी केले तर उपाध्यक्ष साहेबराव गडाख यांनी आभार मानले.