गर्दणी येथील शेतकर्यांना सेंद्रीय शेतीबाबत मार्गदर्शन
नायक वृत्तसेवा, अकोले
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथील कृषीदूत प्रतीक नितीन मडके या विद्यार्थ्याने अकोले तालुक्यातील गर्दणी येथील शेतकर्यांना नुकतेच सेंद्रीय शेतीबाबत मार्गदर्शन केले.
ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत गर्दणी गावातील शेतकर्यांना सेंद्रीय खत (जीवामृत, बिजामृत, दशपर्णी अर्क, निमाश्र आदी) याच्या निर्मितीची पद्धत, त्याचा वापर व फायदे याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच जीवामृत बनविण्याचे प्रात्यक्षित करून दाखवले. जीवामृत बनविण्यासाठी अतिशय मोजक्या आणि सहज उपलब्ध असणार्या वस्तूंचा (शेण, गोमूत्र, बेसनपीठ, गुळ) आदिंचा उपयोग होत असल्याकारणाने रासायनिक खताऐवजी आपण जीवामृत हे सेंद्रीय खत म्हणून वापरू शकतो. तसेच जीवामृत वापरामुळे कोणत्याही प्रकारे पिकाला नुकसान होत नाही आणि रासायनिक खतांचा वापर होत नसल्याकारणाने तसेच जीवामृत हे सर्वोत्तम बुरशीनाशक व विषाणूनाशक म्हणून वापर होतो म्हणून खर्चही खूप कमी लागत असल्याचे कृषीदूत प्रतीक मडके यांनी सांगितले. या प्रात्यक्षिकासाठी सहयोगी अधिष्ठाता डॉ. यू. बी. होले, कार्यक्रम समन्वयक डॉ. बी. टी. कोलगणे, केंद्रप्रमुख डॉ. डी. के. कठमाळे, विषयतज्ज्ञ डॉ. व्ही. बी. गेडाम आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. पी. एन. गजभिये यांचे मार्गदर्शन लाभले.