शूरखुर्म्याच्या दुधातून संगमनेरात राजकीय ‘साखर’ पेरणी! माजी नगराध्यक्षांकडून आमदारांचा सत्कार; संगमनेरात राजकीय भूकंपाचा अनुमान..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
विविध कारणांनी सर्वोच्च न्यायालयात अडकलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अद्यापही स्पष्टता नसली तरीही महायुतीकडून मात्र त्याची तयारी सुरु झाली आहे. आगामी काळात सत्ताधारी महायुतीने काँग्रेसला राजकीय धक्के देण्याचे नियोजन केले असून त्याचा प्रत्ययही येण्यास सुरुवात झाली आहे. त्याचाच भाग म्हणून रमजान ईदच्या कार्यक्रमात मुद्दाम उपस्थित असलेल्या काँग्रेसच्या माजी नगराध्यक्षांनी आमदार अमोल खताळ यांच्याशी जवळीक साधल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे केंद्र सरकारने ‘सौगात-ए-मोदी’च्या माध्यमातून मुस्लिम समाजाला कुरवाळण्याचा प्रयत्न केला असतानाच आता दुसरीकडे अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हाध्यक्षांनी शूरखुर्म्याच्या दुधातून राजकीय साखर पेरणीला सुरुवात केल्याने येणार्या काळात स्थानिक काँग्रेसमध्ये राजकीय भूकंपाचा अनुमान वर्तवला जात आहे.
संगमनेरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आजवरच्या पदाधिकार्यांवर दृष्टीक्षेप टाकल्यास जिल्हा परिषदेपासून ग्रामपंचायतीपर्यंत माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसचे वर्चस्व असल्याचे दिसून येते. यावेळी मात्र संगमनेरच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेसचा पराभव होवून महायुतीच्या अमोल खताळ यांनी बाजी मारल्याने स्थानिक पातळीवरील राजकीय गणितांमध्येही बदल होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यातूनच अनेकांनी महायुतीमधील पदाधिकार्यांचा हात धरुन सीमोल्लंघनाची कवायत सुरु केली असून सोमवारी (ता.31) भाजप अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष जावेद जहागिरदार यांनी आयोजिलेल्या ‘स्नेह भेटी’च्या कार्यक्रमातून तसे स्पष्ट संकेतही मिळाले आहेत.
गेल्या साडेतीन दशकांपासून संगमनेर नगरपरिषदेवर काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. सुरुवातीच्या काळात 1990 ते 2000 या दशकांत पालिका सभागृहात सत्ताधारी काँग्रेसचा वरचष्मा असला तरीही विरोधकांची दखलपात्र उपस्थितीही बघायला मिळायची. मात्र मागील दोन-अडीच दशकांत त्यात अमुलाग्र बदल होवून आजच्या स्थितीत भाजपच्या मेघा भगत वगळता विरोधकांचे पालिकेतील संख्याबळ नगण्य अवस्थेत पोहोचले आहे. यावेळी मात्र महायुतीने ऐतिहासिक कामगिरी करताना संगमनेर विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच भगवा फडकावल्याने पालिकेतील विरोधकांचे मनोबल आकाशी भिडले आहे.
स्थानिक विरोधकांचा इतिहास पाहता कधीकाळी पालिकेत शिवसेनेचा वरचष्मा बघायला मिळतं. मात्र तीन वर्षांपूर्वी राज्यात घडलेल्या सर्वात मोठ्या राजकीय भूकंपात शिवसेनेच्या एकसंधतेलाच तडा गेल्याने स्थानिक पातळीवरीवरही या पक्षाची ताकद दोन भागात विभागली गेली आहे. त्यातही मातोश्रीशी निष्ठा सांगत फूटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या ‘उबाठा’ गटातील जुन्या शिवसैनिकांचा अंतर्गत खेचाखेचीतून वारंवार उपमर्द झाल्याने आजच्या स्थितीत स्थानिक उबाठा गट काहींच्या हातात सामावला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्रित लढल्यास उबाठाला किती जागा सोडल्या जातील यावरुन तर्कवितर्क सुरु झाले आहेत.
स्थानिक निवडणुकांमध्ये शिवसेनेला मतं मिळवून देणार्या चेहर्यांविरोधातच अंतर्गत कारस्थान सुरु झाल्याने गेली पाच-पाच दशकं मातोश्रीशी निष्ठा सांगणार्यांची आता घुसमट वाढली आहे. त्यातूनच उबाठा गटाच्या ठिकर्या उडण्याचे अंदाज असतानाच त्याचे लोण आता काँग्रेसच्या दारातही पोहोचल्याचे चित्र निर्माण झाले असून येणार्या काळात सत्ताधारी गटातच राजकीय भूकंपाचा धक्का बसण्याचा अनुमान आहे. यासर्व पार्श्वभूमीवर सोमवारी (ता.31) रमजान ईदचे औचित्य साधून माजी उपनगराध्यक्ष आणि भाजप अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष जावेद जहागिरदार यांनी आयोजित केलेला ‘स्नेहभेट’ कार्यक्रम चर्चेत आला आहे.
या कार्यक्रमाला आमदार अमोल खताळ यांच्यासह गेल्या अडीच दशकांपासून पालिका सभागृहाचे सदस्य आणि दोनवेळा नगराध्यक्षपद भूषविलेल्या दिलीप पुंड यांची उपस्थिती राजकीय विश्लेषकांच्या भुंवया उंचावणारी ठरली आहे. या कार्यक्रमात आमदार खताळ यांनीही त्यांच्याशी गुप्तगू करीत स्थानिक राजकारणावर मंथन केल्याने भविष्यातील संगमनेरच्या राजकारणाचे चित्रही उमटू लागले आहे. या कार्यक्रमात उबाठाचे माजी तालुकाप्रमुख कैलास वाकचौरे यांची उपस्थितीही खूप बोलकी ठरली आहे. यासर्व घडामोडी संगमनेरचे स्थानिक राजकारण प्रभावित करणार्या असून त्याचे प्रतीध्वनी प्रत्यक्ष निवडणुका दृष्टीपथात दिसताच ऐकू येण्याची शक्यताही बळावली आहे. माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागिरदार यांच्या ‘शूरखुर्मा डिप्लोमसी’तून समोर आलेला हा प्रकार भाजपकडून स्थानिकची तयारी सुरु झाल्याचे चित्रही दाखवणारा ठरला आहे.
देशातील सध्याचे राजकारण जाती केंद्रित असून सर्वच राजकीय पक्षांकडून मोठ्या गटावर प्रभाव टाकणार्या स्थानिक नेत्यांना जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर जावेद जहागिरीदार यांनी आयोजित केलेल्या ‘स्नेहभेटी’त महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्यासह काँगे्रसचे दिग्गज स्थानिक नेते दिलीप पुंड यांची उपस्थिती खूप बोलकी असून मध्यंतरी त्यांच्या सुपूत्राने केलेली लोणीनंतरची ‘मुंबई वारी’ही चर्चेत आली आहे. त्यातून आगामी कालावधीत स्थानिक काँग्रेससह उबाठा गटालाही मोठ्या राजकीय भूकंपाचा हादरा सोसावा लागणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत.