डोक्यात पाटा घालून पत्नीचा खून करणार्यास आजन्म कारावास! संगमनेरच्या जिल्हा न्यायालयाचा निकाल; घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला होता प्रकार..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
घटस्फोटीत तरुणीशी विवाह करुन नंतर तिच्या चारित्र्यावर संशय घेणार्या व त्यातूनच साडूच्या घरात असतांना तिच्या डोक्यात दगडी पाटा घालून तिचा निर्घृन खून करणार्या पतीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2018 साली तालुक्यातील जवळे बाळेश्वर येथे घडलेल्या खटल्याची सुनावणी संगमनेरच्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयात चालली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी सरकारी पक्षाने सादर केलेले साक्षीपुरावे ग्राह्य मानून आरोपी प्रकाश नामदेव धांडे (रा.आंबेवंगण) याला आजन्म करावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या निर्णयाने आपल्या मुलीला न्याय मिळाल्याची भावना यावेळी मयत विवाहितेच्या आईने व्यक्त केली.
याबाबतची हकिकत अशी की, मुळचे शेंडीवाडीचे (हिवरगाव पठार) मात्र कामनिमित्त मुंबईत राहणार्या महादु तिटकारे यांच्या एका मुलीचा दहा वर्षांपूर्वी विवाह झालेला होता. मात्र त्या दोघांमध्ये न पटल्याने त्यांचा घटस्फोट होवून मुलगी वडिलांकडेच राहत होती. या दरम्यान 2018 मध्ये अकोले तालुक्यातील आंबेवंगण येथील प्रकाश नामदेव धांडे याच्यासोबत जवळे बाळेश्वर येथील मंदिरात करुन देण्यात आला. लग्नानंतर दोघेही श्रीगोंदा परिसरात मोलमजुरीची कामे करुन उपजिवीका सांभाळीत होते. या दरम्यान नोव्हेंबर 2018 मध्ये आई आजारी असल्याने मयत मुलगी शांता आपला पती प्रकाश धांडेसह मुंबईला गेले होते.
त्यावेळी मयतेने आपला पती चारित्र्यावर संशय घेत असल्याचे व याबाबत आपण सासु-सासर्यांनाही सांगितल्याचे तिने सांगितले. तसेच, याबाबत आईलाही तिच्या सासु-सासर्यांशी बोलण्यास सांगितले. त्यावर ‘मी बोलेल तुझ्या सासु-सासर्याशी’ असे आश्वास देत त्या माऊलीने दोघांची समजूत घातली व त्यांना परत पाठवले. त्यानंतर आठ-दहा दिवसांनी मुलीची आई गंगुबाई, जावई प्रकाश धांडे व मुलगी शांता असे सगळे जवळे बाळेश्वर येथील दुसर्या मुलीच्या सासरी बाळु घोडे यांच्या घरी आले. दुपारची जेवणावळ उरकल्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास आरोपी प्रकाश धांडे हा राजापूरातील राहीलेले काम करुन येते असे सांगून बाळू घोडे यांची दुचाकी घेवून गेला तो रात्री उशिराने आठ वाजता परत आला.
यानंतर सगळ्यांनी एकत्रित जेवणं केल्यानंतर दोन खोल्यांच्या घरात एका खोलीत प्रकाश धांडे व त्याची बायको शांता आणि दुसर्या खोलीत आई गंगुबाईसह दुसरी मुलगी कांता तिचा नवरा बाळू घोडे झोपलेले असतांना रात्री दोनच्या सुमारास अचानक शांताचा किंचाळण्याचा आवाज ऐकून सगळ्यांना जाग आली. या आवाजाने तिची बहिण कांता बहिण झोपलेल्या खोलीकडे धावली असता समोरील दृष्य पाहून हादरली. काही तासांपूर्वी तिच्याशी बोलणारी तिची बहिण रक्ताच्या थारोळ्यात गुपचुप पडली होती. तिचा पती प्रकाश मात्र कोठेही दिसत नव्हता, बाजुलाच रक्ताने माखलेला दगडी पाटाही पडलेला होता. त्यावरील रक्ताचे थळगे त्याचाच वापर करुन खून झाल्याचे सांगण्यास पुरेसा होता.
याबाबत 12 नोव्हेंबर, 2018 रोजी घारगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक ए.एस.भुसारी व उपनिरीक्षक योगेश मोहिते यांनी या प्रकरणाचा कसोशीने तपास करुन आरोपीला जेरबंद केले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून त्यांनी पुरावे आणि साक्ष यावर लक्ष्य केंद्रीत आरोपी प्रकाश नामदेव धांडे याच्याविरोधात संगमनेरच्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर जिल्हा न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज चालले. सरकारी वकिल मच्छिंद्र गवते यांनी न्यायालयासमोर आठ जणांची साक्ष नोंदवली. त्यात मयतेची आई आणि बहिण कांता घोडे, शवविच्छेदन करणार्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सिमा लोहारे व तपासी अधिकार्यांची साक्ष महत्वाची ठरली.
सकारी अभियोक्ता मच्छिंद्र गवते यांनी केलेला प्रबळ युक्तिवाद आणि सादर केलेले साक्षीपुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी प्रकाश नामदेव धांडे (रा.आंबेवंगण) याला आजन्म सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विजय परदेशी, हेडकाँस्टेबल आर.व्ही.भुतांबरे, प्रवीण डवरे, पोलीस शिपाई विक्रांत देशमुख, महिला पोलीस स्वाती नाईकवाडी व प्रतिभा थोरात यांनी साहाय्य केले.