काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांची सुरक्षा हटवली! नाना पटोलेंसह अन्य पंधरा नेत्यांचाही समावेश; नार्वेकरांच्या सुरक्षेत मात्र वाढ तर, आव्हाडांची सुरक्षा कायम..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
विविध राजकीय निर्णयामुळे गेल्या दोन महिन्यात सतत चर्चेत असलेल्या राज्य सरकारने आज घेतलेला आणखीन एक निर्णय राज्यातील राजकीय वातावरण तापवणारा ठरला आहे. शिंदे सरकारने तत्कालीन आघाडी सरकारमधील प्रमुख वरिष्ठ नेत्यांना सरकारकडून पुरविण्यात आलेली सुरक्षा व्यवस्था मागे घेतली आहे. त्यात काँग्रेसचे दिग्गज नेते, तत्कालीन महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांचाही समावेश आहे. एकीकडे विरोधी गटातील नेत्यांची सुरक्षा हटवण्याच्या निर्णयासोबतच दुसरीकडे ठाकरे गटाच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत मात्र वाढ करण्याबरोबरच माजीमंत्री जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा कायम ठेवण्यात आल्याने आगामी काळात राज्यातील राजकीय समीकरणं बदलण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतरही विरोधी गटातील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षातील 22 नेत्यांना राज्य सरकारकडून पूर्वीप्रमाणेच असलेली विविध दर्जाची सुरक्षा कायम ठेवण्यात आली होती. मात्र शिंदे सरकारच्या आजच्या निर्णयानुसार काँग्रेसचे दिग्गज नेते माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, युवासेनेचे प्रदेशाध्यक्ष वरुन सरदेसाई, नितीन राऊत, सतेज पाटील, संजय राऊत, नवाब मलिक, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, भास्कर जाधव, नरहरी झिरवाळ, सुनील केदार व डेलकर परिवाराचाही त्यात समावेश आहे.

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्यात आली होती. राज्य सरकारच्या आजच्या निर्णयाने ती आता काढून घेण्यात आली आहे. एकीकडे विरोधी गटातील 22 पैकी 15 मोठ्या नेत्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याचा निर्णय तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी व त्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना पूर्वी असलेल्या एक्स दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करुन ती आता वाय-प्लस दर्जाची करण्यात आली आहे. तर माजीमंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचीही सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत त्यांची आशिष शेलारांशी जवळीक दिसून आली होती. त्याचाच परिणाम त्यांची सुरक्षा व्यवस्था कायम असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुसंख्य भागात पावसामुळे झालेल्या नुकसानीवरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु असताना राज्य सरकारने अचानक विरोधी गटातील दिग्गज नेत्यांची सुरक्षा काढून घेतल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. राज्य सरकारने हा निर्णय गृह विभागाच्या अहवालावरुन घेतल्याचे सांगितले जात असले तरीही, हा निर्णय पूर्णपणे राजकीय असल्याचे मानले जात आहे. सुरक्षा काढण्यात आलेल्या सर्व नेत्यांचे मागील दोन महिन्यांच्या कालावधीतील राजकीय वक्तव्य पाहिले असता त्यातूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे दिसून येते. या विषयावरुन आता राज्यात राजकीय रणकंद माजण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Visits: 70 Today: 2 Total: 394418