‘बेशिस्ती’ला चाप लावण्यासाठी कठोर भूमिका आवश्यक! ‘पार्किंग’ नसताना चारचाकीचा बडेजाव; ‘अक्कलशून्यां’चाही रस्तोरस्ती अडथळा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
एखाद्या शहराचे सौंदर्य आणि त्याचा सुटसुटीतपणा ज्या प्रकारे तेथील अतिक्रमणांवर अवलंबून असतो, त्याप्रमाणे प्रत्येक शहराची अंतर्गत वाहतूक त्या शहराचा आरसा मानलो जातो. संगमनेर नगरपालिकेतील सत्ताधारी गटाने शहराच्या सौंदर्याचा विडा उचलून अडथळ्याची सोयीस्कर अतिक्रमणं हटवण्याची मोहीम हाती घेतल्याने रस्त्यांवर सुटसुटीतपणाचा आभास होत आहे, प्रत्यक्षात मात्र गोरगरीबांच्या रोजीरोटीवर लाथ घालून मोकळ्या झालेल्या याच रस्त्यांवर आता पालिकेने जणू बेशिस्त चारचाकी वाहनांना विनामूल्य पार्किंगची सुविधाच उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे मोहीमेनंतर म्हणायला ‘मुक्त’ झालेल्या रस्त्यांवरील मोकळ्या जागा फेरीविल्यांऐवजी आता बेशिस्त चारचाकी वाहनधारकांच्या ताब्यात गेल्या आहेत. पालिका प्रशासनाने या विषयाकडेही अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज असून मनाला वाटेल तेथे वाहनं उभी करुन खरेदीसाठी शहरात हिंडणार्‍या ‘अक्कलशून्य’ वाहनधारकांसह ‘पार्किंग’ला जागा नसतानाही चारचाकी घेण्याचा बडेजाव मिरवणार्‍यांना ‘चाप’ बसण्यासाठी कठोर धोरणासह तशी भूमिकाही घेण्याची गरज आहे. अन्यथा सध्या सुरु असलेल्या अतिक्रमण हटाओ मोहीमेचा हेतू तर सफल होईल, मात्र परिणाम शून्यच असतील हे मात्र निश्‍चित.


‘वैभवशाली’ची टीमकी वाजवत गेल्या चार दशकांपासून पालिकेची सत्ता उपभोगणार्‍या सत्ताधार्‍यांनी यावेळी सत्ता मिळवताना संगमनेरकरांना ‘2.0’ नावाचा विकास आराखडा दाखवला. नवी टीम, नवा जोश आणि विकासाची दृष्टी या गोष्टी पडताळून हुशार संगमनेरकरांनी चार दशकांचा पूर्वानुभव असतानाही पालिकेची सत्ता पुन्हा त्याच गटाकडे सोपवली, मात्र त्याचवेळी ती मिळवताना त्यांनी दाखवलेल्या ‘व्हिजन’च्या पूर्ततेवर विश्‍वास ठेवूनच. त्यातच राज्यासह देशातील राजकीय स्थितीत वेगाने बदल होत असताना विधानसभेत पराभव पाहिलेल्या सत्ताधारी गटाला पालिकेच्या माध्यमातून आपले ‘राजकारण’ सक्रीय ठेवण्याची संधीही मिळाली आहे. त्याचे त्यांच्याकडून सोने होईल अशी संगमनेरांना अपेक्षा आहे. त्या दिशेने पहिले पाऊल टाकताना पालिकेतील सत्ताधारी गटाने शहरात थेट वाहतुकीला अडथळा ठरणार्‍या सोयीस्कर अतिक्रमणांसह फेरीविक्रेते, फळ व भाजी विक्रेते, रस्त्यात पथार्‍या मांडून व्यापार करणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारण्याची मोहीम सुरु केली.


त्यातून मोकळे झालेले रस्ते, सुरळीत वाहतूक अशी अपेक्षा ठेवून रस्त्यावर आलेल्या सामान्य संगमनेरकराला मात्र भलतेच चित्र दिसू लागले. अकोलेरोड, नवीननगर रोड, नगररोड, दिल्लीनाका, नाशिक महामार्ग अशा सगळ्याच ठिकाणी गरीब विक्रेत्यांना हटवून मोकळ्या केलेल्या जागांवर आता केवळ पैशांच्या जोरावर अलिशान चारचाकी बाळगणारे, मात्र त्याच्या वापरासाठी असलेल्या नियमांबाबत ‘अक्कलशून्य’ असलेल्या वाहनधारकांनी व्यापल्याचे बघायला मिळाले. शहरातील अतिक्रमणांसोबतच अशा बेशिस्त वाहनधारकांचीही मोठी समस्या असून शहराच्या आसपासच्या भागासह ग्रामीणभागातून दररोज चारचाकी घेवून येणार्‍या अशा वाहनधारकांची मोठी संख्या आहे.


यातील अनेक वाहनधारक अतिशय अरुंद आणि वर्दळीच्या रस्त्यांवरही अविचाराने वाहनही घालतात आणि शेवटी जीथे मार्गच बंद होईल अशा ठिकाणापर्यंत जावून आसपास वाटेल तीथे किंवा भररस्त्यातच ते उभे करुन चक्क कोणताही विचार न करता खरेदीसाठी निघूनही जातात. अशांच्या या अक्कलशून्य कृतीने सामान्य माणूस मात्र नाहक मनस्तापाचा बळी ठरत असल्याची उदाहरणे रोजच शहराच्या वर्दळीच्या रस्त्यावर घडतात. अशा बेशिस्त वाहनधारकांना नियमांची अक्कल शिकवण्याची आवश्यकता असून त्यासाठी पालिकेला कठोर धोरणांसह त्या अनुषंगाची भूमिकाही घ्यावी लागणार आहे. अन्यथा सोमवारपासून सुरु झालेला शहर सौंदर्यकरणाचा विषय पुढील पंधरवड्यापर्यंत येऽ रेऽ माझ्या मागल्या प्रमाणेच ठरु शकतो.


दुसरीकडे शहरातील रस्त्यांवर विक्रेत्यांच्या नियमित अतिक्रमणांसोबतच चारचाकी उभी करण्यासाठी स्वतःची जागा नसतानाही केवळ पैशांचा बडेजाव मिरवण्यासाठी चारचाकी बाळगणार्‍यांचीही संगमनेरात मोठी संख्या आहे. अशा वाहनधारकांनी मेनरोड, बाजारपेठेसह या रस्त्यांना जोडणार्‍या बहुतेक सर्वच उपरस्त्यांच्या दुतर्फा वाहतुकीला उघड अडथळा करुन शासकीय जागेतच आपले ‘पार्किंग’ निर्माण केले आहे. साईनाथ चौक, स्वातंत्र्य चौक, शास्त्री चौक, कॅप्टन लक्ष्मी चौक, तहसील व पोलीस कार्यालयाच्या परिसरासह पालिकेच्या निर्माणाधीन असलेल्या व्यापारी संकुलाच्या परिसरात असंख्य चारचाकी वाहने कायमस्वरुपी उभी असल्याचे चित्र रोजच बघायला मिळते. या वाहनधारकांनीही एकप्रकारे रस्त्यावर अतिक्रमणच केलेले असल्याने अशांवर दंडात्मक कारवाईची गरज आहे. त्यासाठी पालिकेला कठोर धोरण आखून त्याची तितक्याच सक्षमपणे अंमलबजावणीही करावी लागेल, अन्यथा अतिक्रमण हटवण्याच्या मोहीमांच्या आजवरच्या फार्समध्ये हा एक प्रकार मोजला जाईल.


चारचाकी वाहन असूनही त्याच्या पार्किंगला जागा नसलेल्यांसाठी पालिकेने आपल्या मालकीच्या भूखंडांना संरक्षक कवच निर्माण करुन सशुल्क सुविधा उपलब्ध केल्यास पालिकेच्या उत्पन्नात भर पडू शकेल. शिवाय रस्त्याच्या कडेचा वापर पार्किंगसाठी करणार्‍या अथवा भररस्त्यात वाहने उभी करुन खरेदीला जाणार्‍या बेशिस्तांची वाहने टोईंग करुन जमा करण्याचे कठोर धोरण राबवल्यास त्यातून पालिकेला उत्पन्नासह रस्ते मोकळे ठेवण्याचा हेतूही साधता येईल. सोबतच शहरालगत मोठ्या जमिनी असलेल्या तरुणांनाही त्यांच्या मोकळ्या जमिनींवर पत्र्याच्या शेड उभारुन मासिक भाडेतत्वावर ‘पार्किंग’ नसून चारचाकीची हौस असलेल्यांना त्या उपलब्ध करण्याचा व्यवसाय करता येवू शकतो. मात्र त्यासाठी ठोस धोरणांसह व्यापक प्रयत्नांची गरज आहे.


‘संगमनेर 2.0’ अंतर्गत विकासाचे ‘व्हिजन’ दाखवणार्‍या पालिकेतील सत्ताधारीगटाने गेल्या सोमवारपासून शहरात वाहतुकीला अडथळा ठरणार्‍या अतिक्रमणांसह शहराच्या सौंदर्याला डाग लावणार्‍या फेरीविक्रेत्यांविरोधात कठोर भूमकिा घेत कारवाईला सुरुवात केली आहे. मात्र पालिकेकडून अतिक्रमण मुक्त होणार्‍या रहदारीच्या रस्त्यांवरील मोकळ्या जागांवर बेशिस्त चारचाकी वाहनधारकांनी ताबा घेण्यास सुरुवात केल्याने पालिकेची मोहीम नेमकी कोणाच्या सोयीसाठी? अशी शंका निर्माण झाली आहे. सोबतच अतिक्रमण हटवताना ‘पार्किंग’साठी जागा नसतानाही बडेजाव मिरवण्यासाठी चारचाकी वाहने बाळगणार्‍या वाहनधारकांनाही अतिक्रमणधारकाच्या श्रेणीतच मोजण्याची गरज असून त्यांच्या विरोधात कारवाईसाठी धोरणात्मक आणि कठोर निर्णय घेण्याची गरज आहे.

Visits: 4 Today: 4 Total: 1512930

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *