नववर्षात तालुक्यातील रुग्णगतीला लागला मोठा ब्रेक! शहरी भागासोबतच आता ग्रामीणभागातील सरासरीही एकेरीत आल्याने दिलासादायक चित्र

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील कोविड संक्रमणाला लागलेली आहोटी सलग दहाव्या दिवशी कायम आहे. रोज आढळून येणार्या एकूण रुग्णांच्या सरासरीत मोठी घट झाल्याने तालुक्यात कोविडचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच शहर व तालुक्याची सरासरी एकेरीत आली आहे. रविवारीही तालुक्याच्या रुग्णसंख्येत अवघ्या अकरा रुग्णांची भर पडून एकूण रुग्णसंख्या आता 6 हजार 140 वर पोहोचली आहे. यात शहरी भागातील तिघांचा तर ग्रामीणभागातील आठ जणांचा समावेश आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून एकूण रुग्णगतीला मोठा ब्रेक लागल्याने कोविडचा पराभव आता दृष्टीपथात आला आहे.

एप्रिलपासून संगमनेर तालुक्यात कोविडचा प्रादुर्भाव सुरु झाला. तेव्हापासून प्रत्येक दिवशी, प्रत्येक आठवड्याला व महिन्याला शहर व ग्रामीणभागातील रुग्णसंख्या उंचावतच गेल्याचे दिसून आले. ऑगस्टमधील गणेशोत्स, ईद, मोहरम् यासारखे मोठे धार्मिक सण पार पडल्याने त्याचा परिणाम तालुक्याची रुग्णसंख्या विक्रमीगतीने वाढण्यात झाला. तशीच स्थिती नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या दिवाळीच्या निमित्तानेही पहायला मिळाल्याने तालुक्यात कोविडची दुसरी मोठी लाट येणार असा अंदाज जाणकारांच्या चर्चेतून समोर आला. 16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या तीस दिवसांच्या कालावधीत तसे चित्रही दिसून आले.

मात्र डिसेंबरच्या दुसर्या पंधरवड्यात रुग्णगतीच्या सरासरीत वेगाने बदल झाल्याचे दिसतांनाच कोविडचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा नियंत्रणात आल्याचे समाधानकारक दृष्यही पहायला मिळाले. डिसेंबरच्या शेवटच्या पंधरवड्यात रुग्णवाढीला लागलेला ब्रेक नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून कायम राहील्याने आजच्या स्थितीत 1 ते 10 जानेवारी या दहा दिवसांत तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत 12.6 रुग्ण दररोज या गतीने 126 रुग्णांची वाढ झाली. यात शहरी रुग्णसंख्येची गती प्रतीदिवस चार तर ग्रामीणक्षेत्रातील रुग्णगती दररोज 8.6 इतक्या मोठ्या प्रमाणात खालावल्याचे चित्र दिसत आहे.

नववर्षाच्या पहिल्या दहा दिवसांत 1 जानेवारी रोजी एकूण 6 रुग्ण (शहरी दोन व ग्रामीण चार), 2 जानेवारी 9 रुग्ण (शहरी पाच व ग्रामीण चार), 3 जानेवारी रोजी 22 (शहरी चार व ग्रामीण 18), 4 जानेवारी रोजी निरंक, 5 जानेवारी रोजी एकूण 18 (शहरी आठ व ग्रामीण 10), 6 जानेवारी रोजी एकूण 24 (शहरी सात व ग्रामीण 17), 7 जानेवारी रोजी एकूण आठ (शहरी एक व ग्रामीण सात), 8 जानेवारी रोजी एकूण 20 (शहरी आठ व ग्रामीण 12), 9 जानेवारी रोजी एकूण 8 (शहरी दोन व ग्रामीण सहा) आणि 10 जानेवारी रोजी एकूण 11 (शहरी तीन व ग्रामीण आठ) याप्रमाणे गेल्या दहा दिवसांत तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत 126 (सरासरी 12.6) रुग्णांची भर पडली. त्यात सरासरी 4 रुग्ण रोज या गतीने शहरी रुग्णसंख्येत 40 तर सरासरी 8.6 रुग्ण दररोज या गतीने ग्रामीणभागात एकूण 86 रुग्ण वाढले.

रविवारी (ता.10) समोर आलेल्या एकूण अकरा रुग्णांमध्ये शहरातील अभिनवनगर मधील 50 वर्षीय इसम, नवघर गल्लीतील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 52 वर्षीय महिला व ग्रामीणभागातील नान्नज दुमाला येथील 60 वर्षीय महिला व 23 वर्षीय तरुण, गुंजाळवाडीतील 39 वर्षीय तरुणासह 34 व 30 वर्षीय महिला, निमगाव खुर्दमधील 57 वर्षीय इसम, कोळवाडे येथील 42 वर्षीय महिला आणि वडगाव पानमधील 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 6 हजार 140 वर पोहोचली आहे.

गेल्या नऊ महिन्यांचा कोविडचा तालुक्यातील प्रवास बघता नववर्षाच्या सुरुवातीपासून तालुक्यासाठी अत्यंत दिलासादायक चित्र निर्माण झाल्याचे दिसत आहे. यापूर्वी गेल्या दोन महिन्यांपासून शहरी रुग्णसंख्येत मोठी घट होत ती सरासरी एकेरीत आल्याचे दिसत असताना नववर्षातील एकूण घटत्या रुग्णसंख्येने रुग्णगतीत सातत्य राखणार्या ग्रामीण क्षेत्रातील रुग्णगतीही खुप कमी होत थेट एकेरीत आल्याने संपूर्ण तालुक्यात नऊ महिन्यांनंतर मोठे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. त्यातच येत्या 16 जानेवारीपासून देशभरात लसीकरणालाही सुरुवात होत असल्याने कोविडचा पराभव टप्प्यात आला आहे. मात्र तोपर्यंत प्रत्येक नागरिकाने काळजी घेण्याची गरज आहे.

