एक कोटीचा गांजा तस्कर अखेर गजाआड! प्रकटीकरण शाखेची पहाटे कारवाई; विधानसभेत गाजला होता मुद्दा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
वरीष्ठ पातळीवरुन मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर सुकेवाडी शिवारात झालेल्या कारवाईत तब्बल एक कोटी 14 हजार रुपयांचे बाजारमूल्य असलेला 456 किलो गांजा हस्तगत होवूनही गांजा तस्कर मात्र पसार होता. संगमनेर शहरातील या कारवाईने गल्लीपासून थेट विधानसभेपर्यंत चर्चा झाल्याने पोलिसांवरील दबावही वाढला होता. त्यातून सलग दुसर्‍या दिवशी पोलिसांनी गोल्डनसिटीत छापा घालीत गांजाचे आणखी एक गोदाम उघड करुन 33 किलो गांजासह चौघांना अटक केली. आता सुकेवाडी प्रकरणात पसार असलेल्या तुषार उर्फ दमल्या उत्तम पडवळ हा घुलेवाडी परिसरात असल्याचा सुगावा लागताच पोलिसांच्या प्रकटीकरण शाखेने पहाटे छापा घालीत त्याच्याही मुसक्या आवळल्या आहेत. गेल्या दोन दिवसांतील कारवाईत पोलिसांनी एक कोटी 22 लाख रुपये किंमतीचा 489 किलो गांजा हस्तगत केला असून पाचजणांना अटक केली आहे. या कारवायांमधून शहराला गांजा तस्करांचा विळखा पडल्याचेही स्पष्ट झाले असून पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची प्रामाणिक चौकशी झाल्यास गांजा तस्करीचे संपूर्ण नेटवर्क उध्वस्त होण्याची शक्यता आहे.


राज्याच्या वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांना संगमनेरातील गांजा तस्करीचा सुगावा लागल्यानंतर त्यांनी नाशिक आणि पुण्याच्या अमलीपदार्थ विरोधी टास्क फोर्सला कारवाईचे आदेश दिले होते. टास्क फोर्सच्या नाशिक विभागाचे उपअधिक्षक गुलाबराव पाटील यांनी कारवाईचे नेतृत्व करताना बुधवारी रात्रीपासूनच सुकेवाडी परिसरावर लक्ष केंद्रीत केले होते. गुरुवारी सकाळी सुकेवाडीतील मोठेबाबा मंदिरालगत प्रत्यक्ष कारवाई करताना संयुक्त पथकांनी तुषार उर्फ दमल्या पडवळ याने आपल्या घरातच निर्माण केलेले गांजाचे गोदाम उघड करीत तब्बल 456 किलो गांजा हस्तगत केला. आरोपी मात्र छाप्यापूर्वीच ऊसाच्या आडोशाने पसार झाला.


या कारवाईने जिल्हा हादरला असताना त्याचे पडसाद थेट विधानसभेतही उमटले आमदार अमोल खताळ यांनी याबाबत प्रश्‍न उपस्थित केल्यानंतर गृहराज्यमंत्र्यांनी दोषींना सोडणार नसल्याचे उत्तर दिल्याने संगमनेरचे गांजा प्रकरण ‘हॉट’ झाले. त्यातच काल (ता.12) शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने गुंजाळवाडी शिवारातील गोल्डनसिटीत छापा घालून आणखी एका गांजा गोदामाचा भंडाफोड करीत 32 किलो 845 ग्रॅम गांजा हस्तगत करुन शुभम चंद्रकांत जाधव (वय 28, रा.इंदिरानगर, गल्ली नं.1), विशाल अशोक गायकवाड (वय 22, रा.जनतानगर गल्ली नं.1), प्रथमेश अशोक पावडे (वय 22, रा.इंदिरानगर गल्ली नं.4) व परवेझ दाऊद शेख (वय 26, रा.साईश्रद्धा चौक गल्ली नं.1, घुलेवाडी) अशा चौघांना अटक केली.


अलिकडच्या काळात जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा सापडण्याची ही पहिलीच वेळ असल्याने आणि इतकी पक्की माहिती असतानाही सुकेवाडी प्रकरणातील आरोपी पसार होण्यात यशस्वी ठरल्याने पोलिसांच्या कारवाईबाबतही साशंकता होती. त्यातून पसार आरोपीचा शोध घेण्याचा दबावही वाढत गेला. अखेर आज (ता.13) पहाटे आरोपी तुषार उर्फ दमल्या उत्तम पडवळ (वय 27, रा.सुकेवाडी) हा घुलेवाडी परिसरात असल्याचा सुगावा लागताच प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी छापा घालीत त्याच्या मुसक्या आवळल्या. आज त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.


गेल्या दोन दिवसांतील या कारवायांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा हस्तगत झाल्याने शहरातील पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या छाप्यांमधून पोलिसांनी एकूण पाचजणांना अटकही केली असून त्यातील चौघे शुक्रवारपासून तर, सुकेवाडी प्रकरणातील पडवळ आजपासून पोलीस कोठडीत जाणार आहे. पोलिसांनी या पाचही जणांची प्रामाणिकपणे चौकशी केल्यास संगमनेर भोवती निर्माण झालेले गांजा तस्करीचे नेटवर्क उघड होण्याची शक्यता आहे. मात्र मागील काही प्रकरणांचा तपास पाहता शहर पोलिसांकडून गांजा प्रकरण किती गांभीर्याने घेतले जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


शहर पोलीस अनभिज्ञ कसे?
संगमनेर शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील इतक्या मोठ्या गांजा गोदामाबाबत थेट राज्याच्या वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांना इत्यंभूत माहिती मिळते मात्र जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांना त्यांचा थांगपत्ता नसतो हा विचारच मुळात आता हास्यास्पद वाटत आहे. इतक्या राजरोसपणे मोक्याची जागा हेरुन उभारलेल्या या नेटवर्कची व्याप्तीही खूप मोठी असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात स्थानिक पोलिसांनी ‘एमडी’ या घातक अमलीपदार्थाचा तस्करही जेरबंद केला होता. मात्र त्याच्या तपासाबाबत फारकाही दिलासादायक समोर आलेले नाही. त्यावरुन शहरात सहज उपलब्ध असलेल्या अमलीपदार्थांमागे स्थानिक पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचा आशीर्वाद नाकारता येणार नाही. अन्यथा वरील दोन्ही प्रकरणाच्या तपासाला एव्हाना वेगही आला असता आणि त्यात अडकलेली संपूर्ण पुरवठा साखळीही उघड झाली असती.

Visits: 60 Today: 1 Total: 1415460

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *