सराईत चोरट्यांनी तेलडेपो फोडून ‘रामराज्या’चा फुगा फोडला! पाच लाखांचे खाद्यतेल लंपास; सुरक्षारक्षक निद्राधीन की कटात सामील?..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहरातील गुन्हेगारीचा आलेख काहीसा खाली घसरल्याचे चित्र होते. पोलिसांच्या दृष्टीने ‘रामराज्या’चा आव आणणारा हा भास किती पोकळ आहे, याचा प्रत्यय आज होळीच्या दिवशी पहाटेच अनुभवायला आला. अकोले रस्त्यावरील अरिहंत ऑईल डेपो या खाद्यतेलाच्या गोदामावर सराईत चोरट्यांनी डल्ला मारत पोलिसांच्या कार्यक्षमतेचा अक्षरशः शिमगा केला. तेलाच्या गोदामाचे शटर उचकटून, मजुरांना खोलीत डांबून आणि सीसीटीव्ही यंत्रणा उध्वस्त करीत चोरट्यांनी तब्बल 225 खाद्यतेलाचे डबे सोबत आणलेल्या टेम्पोत भरुन लंपास केले. या धाडसी चोरीने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, व्यापारी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदरची धक्कादायक घटना आज (ता.3) पहाटे तीन ते पावणे पाचच्या सुमारास अकोले रस्त्यावर घडली. या घटनेत सहभागी असलेले चोरटे केवळ गुन्हेगारच नव्हेतर, या परिसराच्या भूगोल आणि वावरणार्यांच्या दिनचर्येचा पूर्ण अभ्यास करुन आलेले ‘प्रोफेशनल’ दरोडेखोरच होते, हे त्यांच्या कार्यपद्धतीवरुनही स्पष्ट झाले आहे. गोदामाच्या शेजारीच असलेल्या फरशी कटिंग मशीनवर काम करणार्या मजुरांच्या हालचालींची या चोरट्यांना अचूक माहिती होती. पहाटे साडेचारच्या सुमारास नेहमीप्रमाणे त्यातील एका मजुराला जाग आली आणि त्याला काहीतरी विपरीत घडत असल्याचा सुगावा लागला, त्यावेळी त्याने बाहेर येण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांनी आधीच त्याच्या खोलीला बाहेरुन कडी लावली होती. त्यामुळे त्याने आरडाओरड केल्यानंतर इतर मजुरांनी त्यांच्याकडे धाव घेतली, तोपर्यंत चोरट्यांनी त्याच्या डोळ्यादेखत तब्बल सव्वादोनशे तेलाचे डबे पिकअपमध्ये भरुन तेथून पळ काढला होता.

या सराईत चोरट्यांनी आपल्या पाऊलखुणा मिटवण्यासाठी जाताजाता गोदामासह बाहेरील बाजूला लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरेही फोडून टाकले. शिवाय डीव्हीआरचा शोध घेत तो देखील मुद्देमालासह चोरुन नेला. यावेळी त्यातील काही चोरट्यांनी गोदामात लावलेली वातानुकुलीन यंत्रणा (एसी) उचकटण्याचाही प्रयत्न केला, परंतु त्यात त्यांना यश आले नाही. धक्कादायक बाब म्हणजे, जवळपास दीडतास अनोख्या चोरीचे हे महानाट्य सुरु होते, त्यावेळी शेजारच्या गोदामाचा सुरक्षारक्षक मात्र गाढ झोपेत होता. इतका मोठा प्रकार सुरु असतानाही सुरक्षारक्षकाला काहीच कसे समजले नाही? असा प्रश्न निर्माण झाला असून तो देखील आता पोलिसांच्या रडारवर आला आहे.

कोविड काळानंतर संगमनेर शहराचा विस्तार वाढला असून अनेक मोठ्या व्यापार्यांनी आपली गोदामे शहराबाहेर हलवली आहेत. मात्र, या गोदामांच्या सुरक्षेसाठी पोलीस गस्तीचा अभाव असल्याचे आजच्या घटनेने सिद्ध केले आहे. होळीच्या सणासुदीत जेव्हा पोलीस बंदोबस्त कडक असणे अपेक्षित असते, तेव्हाच चोरट्यांनी पाच लाख रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारला. सूर्यफूल आणि पामतेलाचे डबे भरुन निघालेला टेम्पो शहरातून बाहेर पडेपर्यंत पोलिसांच्या एकाही गस्ती पथकाची त्यावर नजर पडू नये, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. ही घटना म्हणजे केवळ एका गोदामाची लूट नसून, संगमनेर पोलिसांच्या तथाकथित ‘दबदब्याची’ पोलखोल आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधिक्षक डॉ.कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर, उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक तपासणी पथकालाही पाचारण करण्यात आले. नाशिकच्या ठसे तज्ज्ञांनाही बोलावण्यात आले आहे. त्या शिवाय आजूबाजूच्या अन्य सीसीटीव्ही फुटेजवरून गुन्हेगारांचा माग काढला जात आहे. मात्र वृत्त लिहेपर्यंत या प्रकरणात पोलिसांना फारकाही करता आल्याचे दिसून आलेले नाही. या घटनेने शहराबाहेर गोदामे आणि अलिशान दालने टाकून आजवर शहरातील आपल्या घरात शांतपणे निद्रीस्त होणार्या व्यापार्यांची मात्र झोप उडाली अराहे. या घटनेनंतर मर्चन्ट्स बँकेचे माजी चेअरमन आणि तेलाचे उत्पादक ओंकारनाथ भंडारी यांच्यासह शहरातील व्यापार्यांनी मुकेश कोठारी व राजकुमार पारख या व्यापार्यांची भेट घेवून त्यांना दिलासा दिला. ऐन होळीच्या दिवशी घडलेल्या या घटनेने शहरातील व्यापार्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी होत आहे.

शहर व परिसरातील गोदामे अथवा दुकाने फोडून घडणार्या चोरीच्या घटना संगमनेरकरांना नवीन नाहीत, मात्र या घटनेत चोरट्यांनी चक्क चारचाकी मालवाहतूक वाहनासह शहराबाहेर असलेले गोदाम लक्ष्य केल्याने कोविड संक्रमणाच्या काळासह शहरातील अरुंद रस्ते आणि वारंवार वाहतुकीच्या समस्येमुळे शहराबाहेर गेलेल्या व्यापार्यांमध्ये चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे. या घटनेत चोरट्यांनी सीसीटीव्हीची मोडतोड करुन डीव्हीआरही पळवल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान आहे. अशा स्थितीत पोलीस चोरट्यापर्यंत पोहोचून व्यापार्यांना दिलासा देण्यात यशस्वी ठरतात का? हे पाहणं महत्वाचे असून या घटनेच्या तपासावर व्यापार्यांचा विश्वास अवलंबून आहे.

