आश्वीमध्ये कौटुंबिक हिंसाचाराला वैतागलेल्या विवाहितेची आत्महत्या

आश्वीमध्ये कौटुंबिक हिंसाचाराला वैतागलेल्या विवाहितेची आत्महत्या
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कौटुंबिक हिंसाचाराला वैतागलेल्या सत्तावीस वर्षीय अखेर आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता.18) दुपारी 3 वाजेच्या सुमारास आश्वी बुद्रूक येथे घडली आहे. या प्रकरणी माहेर व सासरच्यांत तणावाचे वातावरण झाल्याने पोलिसांनी सासरच्या तिघांवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर रात्री उशिराने विवाहितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.


याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, ढोलेवाडी माहेर असलेली विवाहिता जया उर्फ चित्रा हिचे 2011 मध्ये आश्वी बुद्रूक येथील राहुल नामदेव ताजणे याचेशी मोठ्या थाटात लग्न करुन दिले होते. लग्नानंतर अवघ्या दोनच महिन्यांत सासरच्यांनी जया हिस त्रास देण्यास सुरू केले. परंतु माहेरच्यांनी तिची समजूत काढून वारंवार सासरी नांदायला पाठविले. लग्नानंतर दीड वर्षांनी तिला एक मुलगा व चार वर्षांनी एक मुलगी झाली. त्यानंतरही सासरच्यांच्या वर्तनात काहीएक फरक पडला नसून वारंवार किरकोळ कारणावरुन शिवीगाळ करुन मारहाण करत होते. अनेकदा माहेरी काढून देत होते. मात्र, वैतागलेली विवाहिता जया ही सासरी जाण्यास नकार देत होती. यादरम्यान सासरच्यांशी बैठका घेऊन समजावून सांगत नांदण्यास पाठवत होते. दरम्यान, 8 सप्टेंबर, 2020 रोजी ढोलेवाडी येथे पित्र असल्याने जया हिला घेण्यास भाऊ रवींद्र बाळू मंडलिक हे गेले असता त्यांना वाद झाले असल्याचे समजले. सासरा व नवर्‍याने शिवीगाळ करत नवर्‍याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. त्यावेळी नवराही तिच्याशी बोलत नव्हता. परंतु पुन्हा एकदा तिची समजूत काढत सासरी नांदण्यास पाठविले. त्यानंतर भाऊ रवींद्र मंडलिक यास अचानक शुक्रवारी (ता.18) फोन आला आणि जया हिला लोणी येथील प्रवरा रुग्णालयात आणले असल्याचे सांगितले. त्यावेळी दुसरा भाऊ अनिल आणि दाजी एकनाथ महादू ताजणे यांस कळविले. संगमनेरातून सर्वजण लोणीला गेले असता त्यांना जया हिला शवविच्छेदन करण्यासाठी नेले असल्याचे सांगितले. त्यावेळी तिने सासरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजले. याबाबत भाऊ रवींद्र मंडलिक यांनी आश्वी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी नवरा राहुल नामदेव ताजणे, सासरा नामदेव ताजणे, सासू सुमन नामदेव ताजणे यांच्याविरोधात भांदवि कलम 306, 498 (अ), 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Visits: 136 Today: 1 Total: 1424540

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *