112 क्रमांकावर खून झाल्याची खोटी माहिती देणार्यावर गुन्हा नेवासा पोलिसांच्या पथकाने रामडोह येथील एकास घेतले ताब्यात

नायक वृत्तसेवा, नेवासा
112 क्रमांकावर फोन करून वरखेड गावात खून झाल्याची खोटी माहिती देणार्या रामडोह येथील इसमावर नेवासा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, प्रजासत्ताक दिनी 7.49 वाजता 112 वर तुकाराम नावाने पोलिसांना फोन आला की वरखेड गावामध्ये खून झाला आहे. त्यावरुन पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या आदेशावरुन तेथे उपनिरीक्षक मोंढे, पोना. संजय माने, अशोक कुदळे गेल्यावर सदर इसमाचे नाव तुकाराम गोरे असून तो रामडोह येथील असल्याची माहिती मिळाली.

रामडोह येथील तुकाराम गोरे याच्या राहत्या घरी पोलीस गेले असता तेथे कोणत्याही प्रकारचा खून अथावा गुन्हा घडलेला नव्हता. त्यावेळी तेथे हजर असलेल्या तुकाराम बाबुराव गोरे याच्या तोंडाचा आंबट उग्र वास येत होता. त्यास 112 क्रमांकाच्या कॉलबाबत विचारपूस करता त्याने मी खोटा कॉल केला असल्याचे सांगितले. तुकाराम गोरे हा दारुच्या नशेत असल्याने त्यास ताब्यात घेवून त्याची वैद्यकीय तपासणी केली असता दारुच्या नशेत असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र अधिकार्यांनी दिले. याप्रकरणी तुकाराम बाबुराव गोरे (वय 29, रा. वरखेड) याच्याविरुध्द नेवासा पोलिसांत गुरनं. 73/2023 भारतीय दंडविधान कलम 177 सह महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 85-1 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

112 क्रमांकावर अचडणीच्या वेळीच कॉल करण्यात यावा. यावर खोटी माहिती देवून दिशाभूल करणार्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील याची सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी.
– विजय करे (पोलीस निरीक्षक, नेवासा)
