संगमनेरात शिक्षकानेच विद्यार्थीनीला केले गर्भवती! मानसिक अगतिकतेचा घेतला गैरफायदा; नराधम शिक्षकाला पोलिसांकडून बेड्या..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
ज्या हातांनी पाटीवर ज्ञानाची अक्षरे गिरवायची, ज्या हातांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार द्यायचा, त्याच हातांनी एका अबोल चिमुरडीचे आयुष्य उध्वस्त करण्याचे महापाप संगमनेर तालुक्यातील एका नराधम शिक्षकाने केले. घरातील कौटुंबिक परिस्थितीमुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या अवघ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीच्या अगतिकतेचा गैरफायदा घेत, चक्क शिक्षकानेच तिचे शारीरिक शोषण करुन तिला गर्भवती केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. भारतीय संस्कृतीतील पवित्र ‘गुरु-शिष्य’ परंपरेला काळिमा फासणार्या या घटनेने संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा हादरुन गेला असून, त्या नराधम शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

याबाबत पिपंरी-चिंचवड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी संगमनेर तालुक्यातील पठार भागातील एका माध्यमिक शाळेत शिक्षण घेते. घरच्या परिस्थितीत तिला असे वाटत होते की, तिचे आई-वडील केवळ तिच्या भावाचेच लाड करतात आणि तिच्याकडे दुर्लक्ष होते. या न्यूनगंडातून ती शाळेत सतत विचारमग्न आणि एकटीच राहायची. हीच संधी साधून, शाळेतील शिक्षक अमोल बाबासाहेब भोसले (वय 23) याने तिच्याशी संवाद साधला. 2024 मध्ये जेव्हा ती अवघ्या 13 वर्षांची होती, तेव्हा त्याने तिच्या मनात घर करून बसलेली एकलपणाची ‘सल’ ओळखून तिला भावनिक आधार देण्याचे नाटक केले.

खरे तर, एका आदर्श शिक्षकाने त्या मुलीच्या मनातील हा गैरसमज दूर करुन तिच्या पालकांशी संवाद साधायला हवा होता. मात्र, या घटनेत शिक्षकी वेशातील अमोल भोसले नावाचा ‘सैतान’ जागा झाला. त्याने ऑक्टोबर 2024 मध्ये मुलीला तिच्या आईच्या मोबाईलवर प्रेमाचा संदेश पाठवून या नात्याला कलंक लावला. त्यानंतर, मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून त्याने तिच्या असहायतेचा फायदा घेतला आणि तिच्यावर वारंवार घरी जावून बलात्कार केला. गेल्या दोन वर्षांपासून हा नराधम अशाचप्रकारे सातत्याने तिचे शारीरिक शोषण करत होता.

काही दिवसांपूर्वी पीडित मुलीने पोटात दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर तिच्या पालकांनी तिला उपचारासाठी पिंपरी-चिंचवड (जि.पुणे) येथील एका रुग्णालयात दाखल केले. तिथे वैद्यकीय तपासणी झाली असता, ती गर्भवती असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. हा प्रकार समजताच तिच्या पालकांच्या पायाखालची वाळूच सरकली. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी सतर्कता दाखवत पोलिसांना पाचारण केले. महिला पोलीस अधिकार्यांनी पीडितेला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, तिने या नराधम शिक्षकाचे नाव आणि त्याने केलेल्या अत्याचाराचा पाढाच वाचला.

याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आरोपी अमोल बाबासाहेब भोसले (वय 23, रा.पठारभाग, ता.संगमनेर) याच्यावर भारतीय न्यायसंहितेच्या कलम 64 (2) (एफ) (एम), 65 (1) आणि पोक्सो कायद्याच्या कलम 3, 4, 5 व 6 नुसार ‘झीरो’ क्रमांकाने गुन्हा दाखल केला. हा तपास घारगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून, घारगाव पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत या प्रकरणातील नराधम शिक्षकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेने संगमनेरचा शिक्षकी पेशा पुन्हा एका काळवंडला असून संपूर्ण तालुक्यात संताप निर्माण झाला आहे.

तालुक्याच्या पठारभागात घडलेल्या या घटनेतून एक अत्यंत भीषण वास्तव समोर आले आहे. आपणच आपल्या पोटच्या मुला-मुलींमध्ये केलेला नकळत भेदभाव किंवा त्यांच्याशी असलेला संवादाचा अभाव किती महागात पडू शकतो, याचे हे जिवंत उदाहरण आहे. जेव्हा मुलं घरातून भावनिकदृष्ट्या दुरावतात, तेव्हा बाहेरची ‘लांडगी’ वृत्ती त्यांच्या मानसिक अगतिकतेची शिकार करते. आपल्या पाल्यांच्या मनात काय चालले आहे, हे जाणून घेणे केवळ शिक्षकांचेच नाही, तर पालकांचेही प्रथम कर्तव्य आहे. मुलांशी मैत्रीचे नाते निर्माण करा, अन्यथा अशा विकृत प्रवृत्तींचे फावणार आहे असा स्पष्ट संदेश या घटनेने पालकांना दिला आहे. शिक्षकीपेशाला कलंक लावून अवघ्या 15 वर्षीय विद्यार्थीनीला गर्भवती करुन तिचे आयुष्य उध्वस्त करणार्या या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी, असा संतप्त सूर आता संगमनेर तालुक्यातून उमटत आहे.

