नॅशनल इंग्लिश स्कूल बनली संस्था चालकांसाठी कुस्तीचा आखाडा! संस्थेवरील वर्चस्वाची लढाई; आता समनापूरातील चौघांविरोधात गुन्हा दाखल..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शिक्षणापासून दूर असलेल्या मुस्लिम समाजातील ग्रामीण मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने दोन दशकांपूर्वी स्थापन झालेली अलाईड एज्युकेशन सोसायटी आता संचालकांच्या वर्चस्वाच्या वादात अडकली आहे. गेल्या काही वर्षांपासून या संस्थेवर आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी संचालकांमध्ये मोठी चढाओढ लागल्याचे दिसत असून त्यातून हाणामार्या, परस्परांविरोधात तक्रारीही दाखल होण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. गेल्या शुक्रवारीही याच कारणाने दोन गटांत पुन्हा एकदा धुमश्चक्री उडाली असून त्यातून पहिल्या गटाकडून यापूर्वीच गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल झालेला असतांना आता दुसर्या गटाकडूनही शहर पोलीस ठाण्यात तक्रार झाली आहे. संस्थापकांनी विद्याजर्नासाठी उभ्या केलेल्या या संस्थेत आता नित्यानेच वर्चस्वाची लढाई होवू लागल्याने या शाळेचे मैदान संचालकांसाठी कुस्तीचा आखाडा ठरले आहे.

गेल्या गुरुवारी (ता.16) अलाईड एज्युकेशन सोसायटीच्या संगमनेरातील एका खासगी बँकेतील खात्यातून सात लाख रुपयांची रक्कम काढली गेल्याच्या कारणास्तव त्याची चौकशी करण्यासाठी संस्थेचे संचालक डॉ.वासीम करीम तांबोळी शुक्रवारी (ता.17) आपल्या दोघा साथीदारांसह लिंकरोडवरील बँकेत आले होते. यावेळी बँकेतील अधिकार्यांकडून ते माहिती मिळवित असतांना संस्थेचे अन्य संचालक असलेले रईस अहमद शेख (बेपारी) तेथे आले व त्यांनी ‘शाळेचे खाते आपल्या नावावर आहे, आपणच खात्यातून सात लाख रुपये काढले आहेत’ असे सांगत त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करीत बँकेच्या बाहेर आणले.

यावेळी बेपारी यांच्यासह अदनान मन्सूर बेपारी, जुबेर आयुब सय्यद व फिरोज गुलाब बागवान (सर्व रा.अलकानगर) यांनी डॉ.वासीम तांबोळी यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करीत लोखंडी रॉडने त्यांच्या पायावर आघात केले. या मारहाणीत त्यांच्या गुडघ्याला मार लागून पायाचे हाड मोडल्याने त्यांना अत्यवस्थ अवस्थेत परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी दुसर्या दिवशी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी रुग्णालयात जावून त्यांचा जवाब नोंदविल्यानंतर रईस शेख (बेपारी) यांच्यासह अन्य तिघांवर भा.द.वी.कलम 326, 323, 504, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनेला आता चार दिवसांचा कालावधी लोटला असतांना पहिल्या प्रकरणातील मुख्य आरोपी रईस बेपारी यांच्या रुग्णालयातील जवाबावरुन आज पहाटे दोन वाजता पहिल्या गटाविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. त्यानुसार रईस बेपारी व डॉ.वासीम तांबोळी यांच्यात समनापूरच्या अलाईड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदावरुन जुना वाद आहे. याबाबत अहमदनगरच्या धर्मदाय आयुक्तांकडे दावाही सुरु आहे. या दरम्यान गेल्या 17 मार्चरोजी बँकेने त्याना फोन करुन बोलावून घेतले असता रईस बेपारी दुपारी बँकेत हजर झाले. यावेळी बेपारी संस्थेच्या खात्याबाबत कोणास माहिती देवू नका असे बँकेच्या कर्मचार्यास सांगत असतांना त्याचा राग येवून डॉ.वासीम करीम तांबोळी व काशिम करीम तांबोळी या दोघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

त्यामुळे फिर्यादी असलेले रईस बेपारी बँकेतून बाहेर आले. यावेळी बाहेर उभ्या असलेल्या नाजिम करीम तांबोळी व नजीर इस्माईल तांबोळी (चौघेही रा.समनापूर) यांनी फिर्यादीस थांबवून तोंडावर, पाठीवर व पोटावर मारहाण केली. यावेळी नाजीम तांबोळी याने हातातील फायटरसारख्या काहीतरी टणक वस्तूने त्यांच्या छातीवर व चेहर्यावर मारहाण केली, त्यात त्यांचा एक दातही तुटला. अशा आशयाच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी वरील चौघांविरोधात भा.द.वी.कलम 325, 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपास पोलीस नाईक सचिन उगले यांच्याकडे सोपविला आहे. या घटनेने अलाईड एज्युकेशन सोसायटीत सुरु असलेली वर्चस्वाची लढाई पुन्हा एकदा उफाळून समोर आली आहे.

गरीबी व शिक्षणाच्या अभावाने मागासलेल्या ग्रामीण भागातील मुस्लिम मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी मुस्लिम समाजातील काहींनी दोन दशकांपूर्वी अलाईड एज्युकेशन सोसायटीची स्थापना करुन नॅशनल इंग्लिश स्कूलची रुजवात केली. मात्र संस्थेच्या संस्थापकांच्या निधनानंतर या संस्थेवर वर्चस्वासाठी संचालकांची लढाई सुरु झाली आणि हा वाद थेट धर्मदाय आयुक्त आणि न्यायालयात पोहोचला. तेथून अद्याप कोणताही निर्णय झालेला नसतांना आता त्यावरुन पुन्हा एकदा दोन गट एकमेकांसमोर उभे ठाकल्याने शिक्षणासाठी उभ्या राहीलेल्या या संस्थेच्या मैदानाला कुस्तीच्या आखाड्याचे स्वरुप आले आहे.

