भंडारदरा एैंशी तर निळवंडेचा पाणीसाठा पोहोचला पंच्याहत्तर टक्क्यांवर! पावसाचा जोर ओसरला मात्र संततधार कायम; निळवंडे धरणाचा विसर्ग घटवला
नायक वृत्तसेवा, अकोले
गेल्या बारा दिवसांपासून धरणांच्या पाणलोटात सुरू असलेल्या झंझावाती पावसाचा जोर गेल्या 24 तासांत खालावला आहे. त्यामुळे आदिवासी पट्ट्याला काहीसा दिलासा मिळाला असून धरणांमध्ये होणारी पाण्याची आवकही कमी झाली आहे. मात्र या पावसाने उत्तर नगर जिल्ह्यातील बहुतेक सगळी छोटी धरणं तुडूंब केली असून मोठ्या धरणांमधील पाणीसाठा समाधानकारक अवस्थेत पोहोचवला आहे. पावसाचा जोर ओसरल्याने शनिवारी तीन हजार क्यूसेकपर्यंत वाढवलेला निळवंडेचा विसर्ग आज सकाळी 800 क्यूसेकपर्यंत कमी करण्यात आल्याने गेल्या दोन दिवसांपासून दुथडी वाहणार्या प्रवरेचे पात्र आता संकुचित होवू लागले आहे.
मागील दोन आठवड्यांपासून जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण केले आहे. जूनच्या सुरुवातीला दीर्घकाळ पावसाने ओढ दिल्याने शेतकरीराजा हवालदिल झालेला असताना जूनच्या शेवटच्या आठवठ्यात लाभक्षेत्रासह धरणांच्या पाणलोटात मान्सूनचे आगमन झाले. मात्र त्यावेळी पाणलोटात पावसाला फारसा जोर नसल्याने धरणातील पाणीसाठे अगदी कासवगतीने वाढू लागल्याने लाभक्षेत्रातील पावसाने आनंदलेल्या चेहर्यांवरही चिंतेचे मळभ दिसत होते. मात्र गेल्या बारा दिवसांपासून मान्सूनच्या काळ्याकुट्ट ढगांनी उत्तरेतील पावसावर अवलंबून असलेल्या धरणांच्या पाणलोटात तुफान हजेरी लावतांना अकोले तालुक्यातील सर्वच लघु व मध्यम प्रकल्प तुडूंब केले.
त्यामुळे जुलैच्या पहिल्याच आठवड्यात मुळा, भंडारदरा व निळवंडे या तीनही मोठ्या धरणांमध्ये मुबलक प्रमाणात नवीन पाण्याची आवक झाल्याने जुलैच्या मध्यातच यासर्व धरणांची अवस्था समाधानकारक आहे. पुढील काही दिवस पावसाची संततधार कायम राहील्यास भंडारदरा व निळवंडे हे दोन्ही धरणं चालू महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ओव्हर फ्लो होण्याचीही शक्यता आहे. अकोले तालुक्याच्या उत्तरेतील आढळा व भोजापूर ही दोन्ही धरणं तुडूंब झाल्याने आढळा नदीतून 613 क्युसेक तर म्हाळुंगी नदीतून 540 क्युसेक पाणी वाहत आहे. गेल्या चोवीस तासांत पाणलोटातील घाटघर येथे 75 मि.मी, रतनवाडी 64 मि.मी, भंडारदरा 45 मि.मी, वाकी 31 मि.मी, निळवंडे 19 मि.मी, आढळा 1 मि.मी. व अकोले येथे 10 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आज सकाळी 6 वाजता धरणातील पाणीसाठे पुढीलप्रमाणे आहेत – मुळा 15 हजार 291 दशलक्ष घनफूट (58.81 टक्के), भंडारदरा 8 हजार 843 दशलक्ष घनफूट (80.11 टक्के) व निळवंडे 6 हजार 298 दशलक्ष घनफूट (75.80 टक्के). इतका पाणीसाठा आहे.