महामार्गावर खोळंबलेल्या प्रवाशांना शिवसैनिकांचा आधार! डिझेल संपलेल्या मालट्रकनेे रोखला महामार्ग; शिवसैनिक रस्त्यावर मात्र ‘वसुली’ कंपनी गायब..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सततची वाहतूक कोंडी आणि अपघातांची मालिका रोखण्यासाठी अस्तित्वात आलेला ‘पुणे-नाशिक’ राष्ट्रीय महामार्ग गेल्या दोन-तीन वर्षांपासून प्रवाशांसाठी पुन्हा डोकेदुखी ठरु लागला आहे. त्यातच गेल्या मोठ्या कालावधीपासून या महामार्गाच्या कॉक्रीटीकरणाचेही काम सुरु असल्याने जागोजागी केलेल्या एकेरी वाहतुकीने अपघाती घटनांमध्ये वाढ होण्यासह वारंवार वाहतूक कोंडी होवून प्रवाशांना तासन् तास अडकून पडावे लागत आहे, मात्र टोल वसुली कंपनीला त्याचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचेही प्रत्येकवेळी समोर आले आहे. बुधवारी दुपारीही प्रवाशांना असाच प्रसंग पुन्हा एकदा भोगावा लागला. माळवाडीनजीक एकेरी मार्गावर भररस्त्यात डिझेल संपल्याने एक मालट्रक उभा राहीला आणि त्याने तब्बल अडीच तास हजारों प्रवाशांना मोठा मनस्ताप दिला, या वाहतूक कोंडीत शिवरायांचा इतिहास अनुभवायला आलेल्या काही परदेशी पर्यटकांचाही समावेश होता. या दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते यांच्यासह माजी तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांच्या कार्यकर्त्यांनी प्रवाशांना आधार दिला. कोंडी फोडण्यासाठी या आठ-दहाजणांनी मिळून भरउन्हात वाहतुकीचे संचालन करीत ती सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. तब्बल दोन ते अडीच तास सुरु असलेल्या या मनस्तापादरम्यान महामार्ग पोलिसांसह टोल ‘वसुली’ कंपनीचे अस्तित्व मात्र दिसून आले नाही, या दरम्यान डोळासणेनजीकच्या ‘स्पीडगन’सह हिवरगाव टोलनाक्यावरुन ‘वसुली’ मात्र जोमाने सुरु होती.

पूर्वीच्या पुणे-नाशिक महामार्गाच्या आठवणी जागल्या की, प्रचंड नागमोडी आणि अंगावर येणार्या घाटरस्त्यांमुळे सतत अपघाताची श्रृंखला जोपासणारा, वारंवार प्रचंड कोंडीने प्रवाशांना मनस्ताप देणारा साक्षात ‘मृत्यूघंटा’ ठरलेला महामार्ग म्हणून जाणत्यांना आजही धडकी भरेल. त्याला पर्याय म्हणून 2017 साली खेड ते सिन्नर या दरम्यान या महामार्गाचे नूतनीकरण करण्यात आल्यानंतर या महामार्गावरील अपघातांच्या श्रृंखलेसह वाहतूक कोंडीतून प्रवाशांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात हा महामार्ग वाहतुकीला सुरु होताच ती फोल ठरली. रस्ता निर्मिती करणार्या ठेकेदार कंपनीने सत्तर टक्के पूर्णत्वाच्या अटीचा परिपूर्ण फायदा घेत वाहतुकीसह टोल वसुलीही सुरु केली. त्यानंतरच्या वर्षभरात राहीलेली 30 टक्के कामे पूर्ण होवून हा महामार्ग ‘परिपूर्ण’ होण्याची गरज होती.

प्रत्यक्षात मात्र ठेकेदाराने तत्कालीन राजमार्ग प्राधिकरणातील काही अधिकार्यांना हाताशी धरुन राहीलेली कामे सोडून दिली. त्याचा परिणाम अनेक ठिकाणचे उपरस्ते (सर्व्हिसरोड), उड्डाण व भूयारी मार्ग, प्राण्यांना सुरक्षित महामार्ग ओलांडता यावा यासाठी मूळ नकाशात दर्शवलेली विविध ठिकाणे, रस्ता निर्मिती करताना तोडलेल्या झाडांच्या बदल्यात वृक्षारोपण व संगोपनाला फाटा देण्याचा संतापजनक प्रकार अशा असंख्य अपूर्ण कामांसह आजतागायत हा महामार्ग टोलसह सुरु आहे. या दरम्यान गेल्या नऊ वर्षात या सदोष महामार्गावर असंख्य अपघाती घटना घडून शेकडों नागरीकांना जीव गमवावा लागला, अनेकांना गंभीर दुखापती झाल्या आणि कोट्यवधींच्या मालमत्तेचे नुकसानही झाले. मात्र वसुलीसह महामार्गाच्या परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही.

अनेक प्रसंगात एखाद्या अपघातानंतर आंदोलने झाली, संतप्त नागरीकांनी महामार्गही रोखला, काहीवेळा टोलनाक्यावरही धावा केला. मात्र प्रत्येकवेळी ठेकेदार कंपनीने थातूरमातूर उपाययोजनांचे अवसान आणून नागरीकांच्या तोंडाला पानेच पुसली. अलिकडच्या काळात रस्त्याच्या प्रचंड दूरावस्थेतून अपघातांमध्ये झालेली वाढ आणि अपूर्ण राहीलेल्या कामांमूळे नागरीकांचा वाढता रोष पाहता गेल्या वर्षभरापासून या महामार्गाच्या मजबुतीकरणाचे काम सुरु करण्यात आले. त्यासाठी जागोजागी दोन्ही बाजूची वाहतूक एकाच मार्गावरुन वळवण्याचे प्रयोगही सुरु झाले. मात्र भरधाव वेगाने धावणार्या वाहनांना अचानक वळणरस्ता दाखवताना आवश्यक काळजी घेतली गेली नाही. त्यामुळे वर्षभरापासून सुरु असलेल्या कॉक्रीटीकरणाच्या या कामानेही अनेक निष्पापांचे बळी घेतले आहेत. आजही हा सिलसिला सुरु असताना ठेकेदार कंपनीच्या अक्षम्य हलगर्जीपणाचा फटका वारंवार पुणे-नाशिक या दोन शहरांदरम्यान प्रवास करणार्यांना बसत आहे. एकेरी वाहतूक करताना केवळ दिशादर्शक फलक सोडून ठेकेदाराकडून कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने एकाच रस्त्यावरुन दोन्ही बाजूने भरधाव येणार्या वाहनांना अपघात होण्यासह वारंवार वाहतुकीची कोंडी होते.

मागील वर्षभरापासून वारंवार घडत असलेल्या या गोष्टीतून कोणताही बोध न घेता ठेकेदार मात्र आजही आपल्याच मनमस्तीत असल्याचा संतापजनक प्रकार गुरुवारी (ता.25) पुन्हा एकदा समोर आला. पठारभागावरील माळवाडी या तालुक्याच्या शेवटच्या गावानजीक रस्त्याचे काम सुरु असल्याने एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. मात्र त्यासाठी कोणतेही नियोजन केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे या परिसरात वारंवार वाहतुकीचा खोळंबा होत असतो. गुरुवारी दुपारी मात्र याच एकेरी मार्गावर एका मालट्रकचे डिझेल संपल्याने तो भररस्त्यातच उभा राहीला आणि त्याचा चालक चक्क डिझेल आणण्यासाठी निघून गेला. त्यामुळे दोन्ही बाजूने सुरु असलेल्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने काही वेळातच ‘तु आधी जाणार की, मी..’ या मनस्थितीने माळवाडीपासून आळेखिंडीपर्यंतची वाहतूक भरउन्हात गोठवली.

सापटीतून कार काढण्याच्या प्रयत्नात मालट्रकचा अडथळा ओलांडू पाहणार्या काही वाहनांनी आडव्यातिडव्या प्रकारे वाहने घातल्याने माळवाडीनजीक नाशिकलेनवरील महामार्ग ठप्प पडला. कोणीच माघार घेत नसल्याने, घेण्यासाठी जागाच नसल्याने जवळपास अर्धातास खोळंबा सहन केल्यानंतर पुण्याहून संगमनेरला परतणारे शिवसेना उबाठाचे माजी पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते आपल्या दोघा-तिघा सहकार्यांसह जवळपास दीड किलोमीटरची पायपीट करुन खोळंब्याच्या केंद्रस्थानी पोहोचले. त्याचवेळी माजी तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांचे पाच-सहा कार्यकर्तेही त्यांच्या मदतीला धावले. या सर्वांनी वाहनधारकांना प्रेमाने आणि काहींना रागाने समजावून सांगत एकाच लेनवर दोन्ही बाजूने फसलेल्या वाहनांना क्रमवारीने सोडून कासवगतीने का होईना वाहने चालती ठेवण्याचा प्रयत्न केला.

जवळपास दोन ते अडीच तास भर उन्हात ठाकरेंचे सैनिक प्रवाशांसाठी घाम गाळीत वाहतुकीचे संचालन करीत होते. मात्र या दरम्यान ना तेथे डोळासणे महामार्गाचे कर्मचारी पोहोचले ना घारगाव पोलीस. टोल कंपनीचे तर सांगायलाच नको. कदाचित गेल्या दोन-अडीच तासांपासून माळवाडीत महामार्ग ठप्प असल्याचे टोलवरील कर्मचार्यांच्या गावीही नाही अशा अविर्भावात त्यांच्याकडून ‘वसुली‘ सुरु होती. धक्कादायक म्हणजे या मार्गावरील वाहतूक सुरळीत रहावी यासाठी डोळासणे येथे महामार्ग पोलिसांचे केंद्र आहे. एका सहाय्यक निरीक्षकासह अर्धाडझन कर्मचार्यांची फौजही त्यांच्या दिमतीला देण्यात आली आहे. माळवाडीचा खोळंबा झाल्यानंतर अचानक रस्त्यावरील वाहनांची संख्या थांबलेली पाहून कोणत्याही सूचनेशिवाय येथील कर्मचार्यांनी घटनास्थळी धावण्याची गरज होती, मात्र प्रत्यक्षात टोल कंपनीप्रमाणे या ‘कंपनी’कडूनही डोळासणेजवळ ‘स्पीडगन‘द्वारा जोमाने वसुली सुरु असल्याचे चित्र बघायला मिळाले. तब्बल अडीच तासांनी सदरील मालट्रकच्या चालकाने डिझेल ओतल्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास येथील वाहतूक पूर्णतः सुरळीत झाली.

परदेशी पर्यटकांनाही ‘कोंडी’चा अनुभव..!
अलिकडच्या काळात नेहमीच्या ठरलेल्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका आजवर विद्यार्थी, नोकरदार, उद्योजक, व्यावसायिकांसह कृत्रिम प्राणवायूसह जीव वाचवण्यासाठी नाशिक, पुण्याकडे निघालेल्या रुग्णांना बसल्याचे शेकडों दाखले आहेत. त्यात आता परदेशी नागरीकांचीही भर पडली आहे. बुधवारी माळवाडीनजीक जवळपास अडीच तास ‘कोंडी’ झाल्याने पुणे आणि परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची अनुभूती घेण्यासाठी आलेल्या जवळपास डझनभर विदेशी पर्यटकांनाही प्रचंड उन्हात घामाच्या धारा रुमालावर घेत कोंडी सुटण्याची प्रतिक्षा करावी लागली. ही सगळी मंडळी पुण्याहून प्रभु श्रीरामचंद्रांच्या सहवासाची अनुभूती प्राप्त करण्यासाठी नाशिकला निघाली होती. मात्र त्यांना वाटेतच अडीचतास अडकून पडावे लागले.

