निझर्णेश्वर विद्यालयात विठू नामाची शाळा भरली ‘जय हरी माऊली’ म्हणत ग्रामस्थांनी घेतले दर्शन

नायक वृत्तसेवा, कोकणगाव
आषाढी एकादशीनिमित्त संगमनेर तालुक्यातील कोकणगाव – शिवापुर येथील निझर्णेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिंडी काढत विठू नामाची शाळा भरवली होती. त्यामुळे काही काळ कोकणगावात पंढरी अवतरल्याचा भास ग्रामस्थांना झाला. अनेकांनी मनोभावे या बाल वारकऱ्यांचे ‘जय हरी माऊली’ म्हणत दर्शन घेतले.

पंढरपूरला पायी वारीत जाण्याची परंपरा फार जूनी असून भक्ताची श्रद्धा या वारीशी जूळलेली आहे. खऱ्या अर्थाने पंढरपूर वारीची परंपरा समाजातील भेदभाव दूर करण्यासाठी झाली. यात सर्वजण सहभागी होतात. या वारीचे महत्त्व लक्षात घेऊन येथील विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रखुमाई, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, आदिशक्ती मुक्ताबाई, इ.संतांच्या आकर्षक वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विद्यालयातील चिमूकल्या बालगोपालांनी विठ्ठल नामाचा जप जय जय कार करत संपूर्ण कोकणगाव- शिवापुर गावचा परिसर भक्तीमय केला होता. मुख्याध्यापिका श्रीमती सी.बी.राहणे यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल नामाच्या जपाबरोबरच विद्यार्थ्यांनी डॉक्टर,आरोग्य सेवक, पोलीस यांची भूमिका साकारून जनतेची सदैव सेवा करत विठू माऊली प्रमाणे जनतेचे हित पाहणाऱ्या या व्यक्तीचीं आकर्षक भूमिका साकारली होती. यावेळी विद्यालयामध्ये आकर्षक रिंगण सोहळा व ‘माऊली माऊली’ या गीतावर लेझीम नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले.

दिंडी सोहळ्याला तहसीलदार धीरज मांजरे, शिवाजी जोंधळे, सुनील जोंधळे,संतोष जोंधळे, अण्णासाहेब जोंधळे, रमेश जोंधळे, श्रीमती कोल्हे यांच्यासहित गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, पालक व गावकरीही सहभागी झाले होते. हा दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे कलाशिक्षक पारासुर, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती काळे, घोडे, कांबळे, खेमनर, राजू पवार, श्रीमती पवार, श्रीमती भालेराव, श्रीमती खताळ यांनी परिश्रम घेतले. इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनी मिरवणुकीसाठी रथ उपलब्ध करून दिला.

Visits: 131 Today: 2 Total: 1098097
