कारवाई पुण्यात ‘धडकी’ मात्र संगमनेरच्या बांधकाम विभागाला! तीन वर्षांचे दस्तावेज भस्म; चार तास सुरु होता जाळण्याचा ‘मेगा’ कार्यक्रम
श्याम तिवारी, संगमनेर
शुक्रवारी पुणे विभागीय अपर महसूल आयुक्तांकडे सापडलेले भ्रष्टाचाराचे घबाड यंत्राच्या मदतीने मोजले जात असताना, त्याच दिवशी रात्री दुसरीकडे 140 किलोमीटर अंतरावरील संगमनेरात कारवाईच्या भीतीपोटी मात्र अभियंत्यांनी कागदपत्रांची ‘होळी’ पेटवली होती. याबाबतची माहिती मिळताच प्रस्तृत प्रतिनिधींनी घटनास्थळी जावून पाहणी केली. मात्र तत्पूर्वीच भ्रष्टाचाराचे नामोनिशाण मिटवण्यासाठी आवश्यक ते सगळे प्रयोग राबविल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे हा सगळा धक्कादायक प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या ‘गुलमोहर’ या गोंडस बंगल्याच्या परिसरात घडला. ते म्हणता ना; चुकीच्या कामाची पुसलेली पावलंही घडलेल्या प्रसंगाची साक्ष देत असतात, तसं या प्रकरणातही दिसून आलं. जाळून टाकलेल्या कागदपत्रांमध्ये केवळ कागदावर झालेल्या कामांचा समावेश असण्याची शक्यता दर्शविणारा अवघ्या चार इंचाचा अर्धवट जळालेला कागदांचा पुंजका बरेच काही बोलून गेला आहे. या छोट्याशा तुकड्यातून जळालेल्या कागदांमध्ये विधान परिषदेकडून प्राप्त झालेल्या निधीचे विवरण नमूद होते हे स्पष्ट होते. म्हणजेच जी कामे केवळ कागदावरच मंजूर होवून संपली, त्या सगळ्या गोष्टींचा ‘तो’ पुरावा होता. रात्रीच्या अंधारात घडलेल्या या प्रकाराने सार्वजनिक बांधकाम विभागात बोकाळलेला भ्रष्टाचारही उघडपणे समोर आला आहे. या गंभीर प्रकाराची जिल्ह्याचे पालकमंत्री दखल घेणार आहेत का? हा खरा प्रश्न आहे.
सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकर्याकडून भूसंपादनाचे पैसे अदा करण्याच्या बदल्यात आठ लाखांची लाच घेताना पुण्यातील विभागीय महसूल अपर आयुक्त डॉ. अनिल रामोड याला शुक्रवारी सीबीआयने अटक केली. पुण्यातील त्याच्या दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या अलिशान घरांवर टाकलेल्या छाप्यात सहा कोटींची रोख रक्कम आणि मालमत्तांची कागदपत्रे सापडली. त्यावरुन त्याच्या भ्रष्टाचाराच्या आवाक्याचा अंदात लावण्यात येत असताना या कारवाईची धडकी मात्र तेथून 140 किलोमीटर अंततरावर असलेल्या संगमनेरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला भरल्याचे दिसून आले. पुण्यातील या लाचखोराकडे सापडलेली रोकड यंत्राच्या सहाय्याने मोजली जात असताना संगमनेरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय निवासस्थानांमधील चक्क कार्यकारी अभियंत्यांच्या ‘गुलमोहर’ या बंद बंगल्याच्या कुंपनातच हा प्रकार सुरु होता.
शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सुरु झालेला हा धक्कादायक प्रकार रात्री साडेदहानंतरही सुरु होता. त्यावरुन संगमनेरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे रात्रीच्या अंधारात अग्निच्या स्वाधीन केल्याचेही दिसून येते. कागदपत्रे जाळल्यामुळे निर्माण झालेल्या धुराने पाठीमागील बाजूला असलेल्या मानवी वसाहतीला त्रास होवू लागल्याने त्यांनी संबंधित कर्मचार्यांकडे त्याबाबत तक्रारही केली, त्यानंतर होळीची जागा बदलून ती बंगल्याच्या बाह्य बाजूला उत्तरेकडील कोपर्यात नेण्यात आली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर काही पत्रकारांनी रात्रीच पुरावे मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत संबंधितांनी आपला कार्यभाग आटोपला होता. त्यातच अंधार असल्याने नेमक्या गोष्टी कॅमेर्यात कैद करता आल्या नाहीत.
त्यामुळे आज (ता.10) सकाळीच शासकीय विश्रामगृहाच्या परिसरातील ‘त्या’ भागाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता अत्यंत धक्कादायक गोष्टी समोर आल्या. सुरुवातीला बांधकाम विभागाच्या कार्यालयामागील अधिकारी निवास्थानाच्या परिसरात बाहेरील बाजूच्या एका कोपर्यातून धुराचे लोळ उठताना दिसले. तेथे जावून पाहीले असता आजूबाजूला प्रचंड गबाळ, पालापाचोळा विखुरलेला असतानाही त्यातील अवघा पाटीभर पाचोळा पेटवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसले. धक्कादायक म्हणजे त्याच्या शेजारीच एखाद्या फुटावर साधारणतः तीन फूट व्यासात शेकोटी झाल्याचे मात्र चक्क माती धुवून ती पेटलीच नसल्याचा अभास निर्माण करण्याचा प्रयत्नही दिसून आला. तेवढ्याच भागात पाण्याने ओली झालेली जमीन स्पष्टपणे दिसूनही आली, त्यातून भ्रष्टाचाराच्या खुणा दिसल्या मात्र पुरावा किंचित सापडला नाही.
त्यानंतर बाजुलाच असलेल्या कार्यकारी अभियंत्यांसाठीच्या मात्र सध्या बंद असलेल्या ‘गुलमोहर’ या प्रशस्त बंगल्याच्या पाठीमागील बाजूस सुरुवातीला पेटविलेल्या शेकोटीचे नामोनिशाण स्पष्टपणे दिसून आले. या भागात पेव्हर ब्लॉक बसवलेले असल्याने अग्नीचा दाह त्यांनाही बसून त्याचे चटके बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचाराची साक्ष देत होते. त्याच ठिकाणी अर्धवट जळालेल्या साधारण तीन-चार इंचाच्या काही कागदांचा अर्धवट जळालेला एक पुंजकाही दिसला. आणि त्यानेच या जळीतकांडाची जणू नावानिशी साक्ष देवून टाकली. या पुंजक्यात बांधकाम विभागाच्या दोघा शाखा अभियंत्यांची अर्धवट जळालेली नावे असून जाळलेला दस्तावेज सन 2017-18 ते सन 2019-20 पर्यंतच्या तीन वर्षांमध्ये 45/15 योजनांमधून विधान परिषदेच्या माध्यमातून मिळालेल्या निधीचा विनियोग अर्थात कामाच्या पूर्ण/अपूर्ण कामाचा सविस्तर तपशील असलेले विवरण पत्र असल्याचे दिसून आले.
अशाप्रकारच्या अहवालात योजनातंर्गत मिळालेल्या निधीतून कोणती कामे झाली, त्याची सद्यस्थिती काय आहे याबाबतचे विवरण असलेल्या वस्तुनिष्ठ माहितीचा समावेश असतो. सापडलेल्या पुंजक्यातून जाळण्यात आलेल्या दस्तावेजात गेल्या तीन वर्षात विधान परिषदेकडून मिळालेल्या निधीचे विवरण असल्याचे दिसले. मात्र कागदं जाळण्याचा हा धक्कादायक प्रकार सलगपणे तब्बल चार तास आणि दोन वेगवेगळ्या ठिकाणी झाला. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या या अग्नीत किती कोटींचे पाप जाळले गेले याचा शोध होण्याची गरज आहे. प्रशासनातून सुशासनाचे स्वप्नं असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या अत्यंत धक्कादायक अशा प्रकाराकडे किती गांभीर्याने बघतात आणि या घटनेच्या गांभीर्याने चौकशीचा प्रयत्न करतात हे पाहणं आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
नियमानुसार कोणत्याही शासकीय कार्यालयातील दस्तावेज जाळण्यापूर्वी काय जाळणार आहात याचा पंचनामा करावा लागतो. त्यातही बारा वर्षांपेक्षा अधिक जुने दस्तावेज असतील तर वरीष्ठ अधिकार्यांच्या पूर्व लेखी परवानगीशिवाय ते नष्ट करता येत नाहीत. असे असतांनाही संगमनेरच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मात्र रात्रीच्या अंधारात तब्बल चार तास चक्क ‘बेकायदा’ पद्धतीने कोट्यवधीचे मूल्य असलेली कागदं जाळली गेली. प्रशासनातून आदर्श सुशासनाचे स्वप्नं असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या प्रकरणाकडे किती गांभीर्याने पाहतात हे आता महत्त्वाचे आहे. हा प्रकार भ्रष्टाचाराची लक्तरं जाळण्याचाच आहे हे स्पष्ट आहे, हा प्रकार घडवून आणणार्या अधिकार्यांना चौकशीशिवाय सोडून दिल्यास हा प्रकार शासन प्रायोजित असल्याचेही स्पष्ट होईल.
शिक्षकी पेशातून बांधकाम क्षेत्रात आलेल्या संगमनेरच्या कार्यकारी अभियंत्यांना लोकांना ज्ञान पाजळण्याची भारी हौस आहे. संगमनेर अकोल्यातील सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन देणार्या संगमनेर महाविद्यालयाजवळ दुभाजकात खंड पाडण्याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या या महाशयांनी चक्क प्राचार्यांनाच ज्ञान पाजले. त्यातही कहर म्हणजे विद्यार्थी व पादचार्यांसाठी असलेल्या फूटपाथवर बोकाळलेली अतिक्रमणं प्राचार्यांनीच ‘प्रबोधन’ करुन हटवण्याची ‘अजब’ अपेक्षाही या महाशयांनी व्यक्त करुन टाकली. दुसरीकडे मात्र त्यांच्याच बुडाखाली कोट्यवधीच्या भ्रष्टाचाराचे पुरावे रात्रीच्या अंधारात जाळून टाकण्यात येवूनही त्यांना याचा थांगपत्ता नसेल असे म्हणणे हास्यास्पद ठरेल. त्यावरुन त्यांचे खाण्याचेही दिसून आल्याचे आता स्पष्ट आहे.