संगमनेर उपविभागात वाहनांच्या चोर्या जोरात! एक बोलेरो व तीन दुचाकींसह पावणे तीन लाखांहून अधिक ऐवज लंपास

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या चोवीस तासांत संगमनेर उपविभागातील एकूण सहापैकी चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीच्या पाच घटना समोर आल्या असून चोरट्यांनी एका बोलेरो चारचाकी वाहनासह तीन दुचाकी व अॅल्युमिनिअमची तार असा एकूण 2 लाख 81 हजार 500 रुपयांचा ऐवज लांबविला आहे. यात अकोले शहरातील देवठाण रस्त्यावरुन बोलेरो जीप तर घारगाव, संगमनेर शहर व आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी एक दुचाकी लांबविण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अकोले शहरातून देवठाणकडे जाणार्या रस्त्यावर यातील पहिली घटना घडली असून काशिबाई म्हातारबा डोंगरे या 73 वर्षीय महिलेच्या घराच्या दारासमोर उभे असलेली बोलेरो जीप (क्र.एम.एच.17/व्ही.7360) अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली आहे. तर चोरीच्या उर्वरीत सर्व घटना संगमनेर तालुक्याच्या तीन पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातून समोर आल्या आहेत. घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत साकूरच्या कोकाटे वस्तीवरुन अकलापूरच्या पांडुरंग शंकर कणसे यांची 20 हजार रुपये किंमतीची बजाज प्लॅटीना दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविली, तर याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिंदोडी शिवारातून कल्पतरु पॉवर ट्रान्स कंपनीची 7 हजार 500 रुपयांची अॅल्युमिनिअमची तारही चोरीला गेल्याची तक्रार कंपनीचे प्रतिनिधी प्रशांत श्यामराव सपकाळ यांनी नोंदविली आहे.

संगमनेर शहर पोलीस ठाणाच्या हद्दीत खांडेश्वरा मंदिराच्या परिसरातूनही दुचाकी चोरीचा प्रकार समोर आला असून शुक्रवारी गणोरे येथील ऋषीकेश राजेंद्र आहेर हा विद्यार्थी मंदिराच्या पाठीमागील बाजूस दुचाकी उभी करुन दर्शनासाठी गेला असता त्याची 25 हजार रुपये किंमतीची होंडा ड्रीम (क्र.एम.एच.17/सी.बी.1456) अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली. तर आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निमगाव जाळी येथील विशाल विश्वनाथ वदक या तरुणाची स्प्लेंडर प्लस (क्र.एम.एच.17/ए.एल.8142) दुचाकी निमगाव जाळीतील स्वामी समर्थ रुग्णालयापासून लांबविण्यात आली. या पाचही प्रकरणी त्या-त्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.
