शिक्षणव्यवस्थेच्या अधोगतीचा ‘गलगोटिया’ इशारा! नवकल्पनांच्या नावाने ‘कॉपी-पेस्ट’चा खेळ; पदवीधरांचे ‘कारखाने’ की कल्पकतेची खाण?..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राजधानीत भरलेल्या पहिल्याच जागतिक एआय संमेलनात ‘गलगोटिया’ विद्यापीठातील ‘त्या’ एका घटनेने केवळ एका शिक्षण संस्थेचे पितळ उघडे पाडले नाहीतर, देशातील संपूर्ण उच्च शिक्षणव्यवस्थेच्या सडलेल्या पायावरच हातोडा मारला आहे. पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधी आमदार सत्यजीत तांबे यांनी ‘एक्स’वर व्यक्त केलेली चिंता ही केवळ एका राजकारण्याची प्रतिक्रिया नसून, ती भारतीय शिक्षण व्यवस्थेतील ‘क्वालिटी’ गहाळ झाल्याचे दाहक वास्तव मांडणारी आर्त हाक आहे. आज आपण अभिमानाने भारत जगातील सर्वाधिक तरुणांचा देश असल्याचे सांगतो, पण या तरुणांच्या हातात असलेल्या पदव्या खरंच त्यांना जागतिक स्पर्धेत टिकवून ठेवण्यास सक्षम आहेत का? की आपण केवळ पदवीधरांचे ‘कारखाने’ चालवत आहोत, जिथे बुद्धिमत्तेपेक्षा कागदाच्या तुकड्याला अधिक महत्त्व दिले जाते? हा प्रश्न दिल्लीतील घटनेने आपल्या सर्वांसमोर उभा केला आहे.

आमदार तांबे यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमधून अत्यंत अचूकपणे ‘कट-कॉपी-पेस्ट’ या बळावत चाललेल्या संस्कृतीवर बोटं ठेवले आहे. आज भारतातील बहुतांश विद्यापीठांमध्ये ‘संशोधन’ हा नवीन काही शोधण्याचा प्रवास उरलेला नसून, ती केवळ एक प्रशासकीय ‘प्रक्रिया’ बनली आहे. प्राध्यापकांना बढती हवी असेल तर शोधनिबंध प्रसिद्ध करणे सक्तीचे आहे आणि विद्यापीठांना रँकिंग हवे असेल तर, प्रकाशनांची संख्या दाखवणे अनिवार्य आहे. या स्पर्धेत ‘संख्येच्या’ शर्यतीत ’गुणवत्तेचा’ बळी दिला जात आहे. पीएचडीचे प्रबंध असोत किंवा पदवी स्तरावरील प्रकल्प, गुगलवरुन माहिती उचलून ती थोड्याफार फरकाने सादर करणे हेच आजचे संशोधन बनले आहे. ज्यावेळी मूलभूत प्रश्न विचारण्याची आणि प्रस्थापित सिद्धांतांना आव्हान देण्याची सवय मारली जाईल, त्यावेळी तिथे ‘इनोव्हेशन’ कसे जन्माला येईल? हा प्रश्न आहे.

दिल्लीतील ‘त्या’ घटनेचा आधार घेत चिंता व्यक्त करणार्या आमदार तांबे यांनी जोपर्यंत आपले संशोधन केवळ ‘रँकिंग’ आणि प्रमोशनपुरते मर्यादित राहील, तोपर्यंत आपण जगाला दिशा देणारे शोध लावू शकणार नसल्याचे वास्तव चित्रही दाखवले. आज आपण शंभराहून अधिक ‘युनिकॉर्न’ कंपन्यांचा टप्पा गाठला म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेत आहोत. परंतु, आमदार तांबे यांनी मांडलेली आकडेवारी डोळे उघडणारी आहे. अमेरिका सातशे पेक्षा जास्त आणि चायना पाचशे पेक्षा जास्त युनिकॉर्नसह आपल्या कित्येक योजन पुढे आहेत. भारतातील बहुतांश स्टार्टअप्स हे पाश्चात्य मॉडेल्सची कॉपी करून भारतीय बाजारपेठेत उतरल्याकडे लक्ष वेधताना त्यांनी आपण स्वतःचे असे ‘ओरिजिनल’ काय निर्माण केले? असा सवाल करीत त्यांनी त्याला आपली शिक्षण व्यवस्था आडवी येत असल्याचे निरीक्षण नमूद केले आहे.

भारताला जर खरोखर ‘विश्वगुरु’ किंवा जागतिक महासत्ता बनायचे असेल तर, आपल्याला आपल्या प्राथमिक आणि उच्च शिक्षणाच्या मुळावर घाव घालावा लागेल. गुणपत्रिकेवरील टक्केवारीवर आधारित गुणवत्तेची व्याख्या आता बदलायला हवी. ज्या दिवशी आपण एखाद्या विद्यार्थ्याच्या जिज्ञासेला गुण देऊ आणि त्याच्या अयशस्वी पण प्रामाणिक प्रयोगाचे कौतुक करू, त्या दिवशी खर्या अर्थाने क्रांती सुरू होईल असा आशावाद व्यक्त करताना ‘गलगोटिया’ विद्यापीठासारख्या घटना एका मोठ्या रोगाची लक्षणे आहेत. हा रोग म्हणजे ‘दिखाऊपणा’असल्याची टीकाही त्यांनी केली. आपल्याला इव्हेंट्स नकोत, तर प्रयोगशाळा हव्या आहेत. आपल्याला केवळ पदव्या देणारी विद्यापीठे नकोत, तर विचार करायला लावणारी ज्ञानमंदिरे हवी आहेत. सत्यजीत तांबे यांनी मांडलेला विचार हा केवळ टीकेचा सूर नसून, तो या देशातील धोरणकर्ते, शिक्षणतज्ज्ञ आणि पालकांसाठीही ‘वेक-अप कॉल’ आहे, त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

आपला देश केवळ सव्वाशे कोटी ग्राहकांची बाजारपेठ नाही, तर ती सव्वाशे कोटी मेंदूंची प्रयोगशाळा बनली पाहिजे. ज्या दिवशी आपली शिक्षण व्यवस्था ‘प्रक्रिया’ पूर्ण करण्याऐवजी ‘परिणाम’ देण्यावर भर देईल, त्या दिवशी जगातील मोठ्या समस्यांची उत्तरे ‘सिलिकॉन व्हॅली’मध्ये नाहीतर, भारताच्या गल्लीबोळातील स्टार्टअप्समध्ये मिळतील. मात्र या स्थितीकडे आज गांभीर्याने पाहीले गेले नाहीतर, भविष्यात आपण केवळ पदव्यांच्या ढिगार्यावर बसलेला दिशाहीन देश म्हणून ओळखले जाऊ असा गर्भित इशाराही आमदार सत्यजीत तांबे यांच्या ‘गलगोटिया’ प्रकरणावरील भाष्यात दडल्याचे दिसून येते.

