संगमनेर पोलिसांचा नाकर्तेपणा नागरीकांच्या मूळावर! अवघ्या अर्धातासांत दोन महिलांचे दागिने ओरबाडले; एकाच तक्रारीत दुसरी घुसवून लक्तरे झाकण्याचाही प्रयत्न..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील काही दिवसांपासून एकामागून एक घटनांच्या माध्यमातून सतत चर्चेत असलेल्या संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दित सोनसाखळी चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. जवळजवळ दिवसाआड घडणार्या चोरीच्या घटनांमधून सामान्यांनी आयुष्यभर मेहनत करुन घेतलेले दागिने एका झटक्यात गायब केले जात आहेत. धक्कादायक म्हणजे विद्यमान पोलीस निरीक्षकांच्या कारकीर्दीत अशा एकाही घटनेचा मागमूस लावण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. त्यामुळे मनोधैर्य उंचावलेले चोरटे शहरात चौफेर पोलिसांच्या नाकावर टिच्चून महिलांना लक्ष्य करीत आहेत. अशाच सलग दोन घटना मंगळवारी सकाळी घडल्या असून या दोन्ही घटनांत एकूण 36 ग्रॅम वजनाचे दोन मिनी गंठण लांबवण्यात आले आहेत. यावरही कहर म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी व वेळी घडलेल्या या दोन्ही घटना एकत्र करुन शहर पोलिसांनी आपली फाटलेली लक्तरे झाकण्याचाही केविलवाणा प्रयत्न केला आहे. संगमनेर पोलिसांचा हा नाकर्तेपणा शहरवासीयांच्या मूळावर उठला असून पोलीस अधीक्षकांनी या घटनांकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त होत आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यातून समजलेल्या माहितीनुसार या दोन्ही घटना मंगळवारी (ता.21) सकाळी साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास अनुक्रमे मालदाड रोड व घुलेवाडी परिसरात घडल्या. यातील पहिल्या घटनेत मालदाड रस्त्यावरील लव-कुश या पॉश वसाहतीत राहणार्या संगिता कैलास राठी या सकाळी आठच्या सुमारास भाजीपाला घेण्यासाठी वसाहतीच्या बाहेरील रस्त्यावर भरणार्या बाजारात गेल्या होत्या. सुमारे अर्धातासानंतर साडेआठच्या सुमारास त्या भाजी घेवून घराकडे जात असताना त्यांच्या पाठीमागून एका लाल रंगाच्या पल्सर दुचाकीवरुन दोघे आले व त्यांना ओलांडून पुढे गेले. यावेळी जाताजाता दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या चोरट्याने सदरील महिलेच्या गळ्यात असलेले गंठण हेरले.
त्यामुळे काही अंतर पुढे गेल्यानंतर दुचाकीस्वार चोरट्याने आपले वाहन वळवून पुन्हा त्या महिलेच्या दिशेने जाण्यास सुरुवात केली. सकाळची वेळ असल्याने वसाहतीकडे जाणार्या रस्त्यावर फार वर्दळ नव्हती. त्याचाच फायदा घेत पाठीमागे बसलेल्या चोरट्याने अवघ्या काही क्षणातच पायी चाललेल्या राठी यांच्या गळ्यातील 16 ग्रॅम वजनाचे आणि अवघे 31 हजार रुपये पोलीस मूल्य असलेले सोन्याचे मिनीगंठण ओरबाडीत तेथून पलायन केले. या घटनेनंतर सदरील महिलेने जोरजोरात आरडाओरड केल्याने आसपासच्या नागरीकांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली, मात्र तो पर्यंत पल्सरवरील दोन्ही चोरटे घुलेवाडीकडे जाणार्या रस्त्यावरुन अदृष्य झाले होते.
मालदाड रोडवरुन महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याहून जास्त वजनाचे गंठण लांबविणारे दोन्ही चोरटे त्यानंतर कोणत्याही भीतीशिवाय तेथून सकाळी नऊच्या सुमारास घुलेवाडीत पोहोचले. जाताजाता घुलेवाडीतही हात साफ करण्याच्या हेतूने त्यांनी साखर कारखान्याकडे जाणार्या रस्त्यावरुन पायी जाणार्या महिलांच्या गळ्यावर लक्ष केंद्रीत केले. त्याचवेळी मराठी शाळेजवळून वैष्णवी विकास भालेराव ही महिला जात असल्याचे पाहून दोन्ही चोरट्यांनी मालदाडरोड प्रमाणेच आधी त्या महिलेच्या पाठीमागून जात गळ्यातील दागिने हेरले व त्यानंतर काही अंतर पुढे जात पुन्हा माघारी येवून आपला हात साफ करीत तेथून पळ काढला. या घटनेत भालेराव यांचे दोन तोळे वजनाचे आणि अवघे 40 हजार रुपये पोलीस मूल्य असलेले मिनी गंठण गायब करण्यात आले.
या घटनेनंतर वैष्णवी भालेराव ही महिला आपल्या पतीसह तक्रार देण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात पोहोचली व त्यानंतर काही वेळाने संगिता राठीही तेथे आल्या. वास्तविक या दोन्ही घटना वेगवेगळ्या वेळी व ठिकाणी घडलेल्या असल्याने व दोन्ही घटनांमधील तक्रारदार समोर हजर असतानाही पोलिसांनी आपली फाटलेली लक्तरे झाकण्यासाठी केवळ संगिता राठी यांची तक्रार दाखल करुन घेत त्यांच्याच फिर्यादीत भालेराव यांच्या चोरीचा दोन ओळीत उल्लेख करताना लाल रंगाच्या पल्सरवरील अज्ञात दोघा चोरट्यांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्याचे सोपस्कार उरकले.
अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधीक विकसित व आघाडीवर असलेल्या शहरांमध्ये अग्रणी असलेल्या संगमनेर शहरातील सर्वसामान्य माणसांच्या मुद्देमालाची सुरक्षा गेल्याकाही दिवसांपासून धोक्यात आली आहे. केवळ मलिदा लाटण्यातच व्यस्त असलेली पोलीस यंत्रणा, महिलांकडून लैंगिक अत्याचाराचे आरोप, ठाण्यातंर्गत निर्माण झालेली गटबाजी, प्रभारी अधिकार्यांचा संपुष्टात आलेला धाक, एकामागून एक घडणार्या असंख्य घटनांचे खोळंबलेले तपास अशा वेगवेगळ्या कारणांनी पोलिसांच्या नाकर्तेपणात मोठी वाढ झाली असून कधीनव्हे ती संगमनेरची सामाजिक शांतता अगदी लयाला पोहोचली आहे. भारतीय पोलीस सेवेतून आलेल्या पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आतातरी या गंभीर विषयाकडे गांभीर्याने पाहून काहीतरी तर हालचाल करावी अशी आर्त विनवणी करण्याची वेळ आता संगमनेरकरांवर आली आहे.
पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी पदभार स्वीकारल्यापासून शहरात जातीय तणावाच्या एकामागून एक घटना घडल्या आहेत. त्या घटनांमध्येही पोलिसांनी मूळापर्यंत तपास केलेला नाही. त्या शिवाय सलग घडणार्या चोरीच्या घटनांमधील एकाही प्रकरणाचा तपास झालेला नसल्याने सध्या शहरात चोरट्यांचेच राज्य असल्याची स्थिती आहे. यापूर्वीच्या पोलीस उपअधीक्षकांनी सोनसाखळी चोरांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवल्याने दीर्घकाळ शहर अशा घटनांपासून मुक्त होते, मात्र गेल्या गेल्याकाही कालावधीत पोलीस तपासापासून दूर गेल्याने बसस्थानकासह शहराच्या सर्वच रस्त्यांवर सोनसाखळी चोरांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे संगमनेरकर महिला धास्तावल्या असून पोलिसांचा नाकर्तेपणा सामान्य माणसांच्या मूळावरच उठल्याचे चित्र दिसत आहे.