जिल्ह्याची वाटचाल पुन्हा एकदा कोविड संक्रमणाच्या दिशेने! गेल्या सहा दिवसांत रुग्णसंख्येत उच्चांकी वाढ; तिसर्या लाटेचा धोकाही वाढला..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील काही महिन्यांपासून देशभरासह अहमदनगर जिल्ह्यातील कोविड रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचे पहायला मिळाले. या कालावधीत दररोज समोर येणार्या रुग्णांची संख्या कायम असली तरीही ती अगदीच नगण्य असल्याने कोविडबाबतचे गांभिर्यही जवळपास संपुष्टात आले होते. मात्र गेल्या महिन्यापासून देशात शिरलेल्या ओमायक्रॉनसह कोविड बाधितांच्या संख्येतही मोठी भर पडू लागल्याने राज्याच्या चिंता वाढत असतांना आता त्यात अहमदनगर जिल्ह्याचीही पुन्हा भर पडू लागली आहे. गेल्या सहा दिवसांतच जिल्ह्यातील एकूण रुग्णांच्या संख्येत तब्बल तिपटीने वाढ झाली असून अवघ्या दहा दिवसांतच दिड हजारांच्या आसपास रुग्ण आढळले आहेत. त्यातही संगमनेरसह अन्य काही तालुक्यात अद्यापही ‘खासगी’ चाचण्यांवरील बंदी कायम असतांना समोर येणारी रुग्णसंख्या चिंता वाढवणारी ठरत आहे.

गेल्या वर्षी फेब्रुवारी दरम्यान कोविड संक्रमणाच्या आकडेवारीत टप्प्याटप्प्याने वाढ होवून एप्रिल व मे या दोन महिन्यांत कोविडने राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात अक्षरशः हाहाकार उडविला होता. या कालावधीत अहमदनगर महापालिका क्षेत्रासह राहाता, पारनेर, संगमनेर, कोपरगाव, श्रीगोंदा, कर्जत, शेवगाव, अकोले या तालुक्यातील रुग्णसंख्या लक्षणीय प्रमाणात वाढली. या दोन महिन्यांच्या कालावधीत एकट्या अहमदनगर जिल्ह्यातच हजारों बाधितांचे बळी गेले. अनेकांना रुग्णालयात खाटा उपलब्ध झाल्या नाहीत, तर काहींना ऑक्सिजन न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचेही समोर आले. त्यानंतर जूनपासून संक्रमणाचा वेग आटोक्यात आला आणि वर्ष सरतासरता त्यात मोठी घट होवून दररोज हजार ते पंधराशे रुग्ण समोर येणार्या अहमदनगर जिल्ह्याचा सरासरी रुग्णवाढीचा वेग अवघ्या 54 रुग्णांवर आला होता.

सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंतही संक्रमणाचा हाच वेग कायम होता. त्यातून गेल्या महिन्याभरात जिल्ह्यात सरासरी 54.03 रुग्ण दररोज या गतीने 1 हजार 675 रुग्णांची भर पडली. नववर्षाच्या पहिल्या चार दिवसांतही याच गतीने रुग्ण समोर आले. मात्र 5 जानेवारीपासून जिल्ह्याच्या एकूण सरासरीत अचानक वाढ होवू लागली असून मागील अवघ्या सहा दिवसांतच संक्रमणाचा वेग तिप्पट वाढला आहे. चालू महिन्यातील पहिल्या चार दिवसांत जिल्ह्यात सरासरी 54.75 या गतीने 219 रुग्ण वाढले होते, मात्र नंतर सहा दिवसांत सरासरीचा दररोजचा वेग थेट 197 रुग्णांवर पोहोचला असून या सहा दिवसांतच जिल्ह्यात 1 हजार 182 तर चालू महिन्यातील दहा दिवसांत सरासरी 140 रुग्ण या वेगाने 1 हजार 401 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या चिंता पुन्हा एकदा वाढल्या असून प्रशासनाकडून निर्बंधांची सक्ती करण्यास सुरुवात झाली आहे.

कोविड संक्रमणाच्या दुसर्या लाटेत उच्चांकी रुग्णसंख्येच्या तालुक्यात अग्रणी असलेल्या संगमनेर तालुक्यातून आजच्या स्थितीत रुग्ण समोर येण्याची गती नगण्य आहे. मात्र याचा अर्थ संगमनेरात कोविड संक्रमीत व्यक्तिंची संख्या नाही असा होणार नाही. कारण गेल्या चार महिन्यांपासून स्थानिक प्रशासनाने खासगी रुग्णालयांकडून खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणार्या चाचण्यांना मनाई करण्यात आली आहे. त्याचा परिणाम ‘त्या’ निर्णयापासूनच संगमनेरांनी अनुभवला आहे. आजही खासगी चाचण्यांवर मनाई कायम असून केवळ शासकीय रुग्णालयात उपचार घेणे आवश्यक असलेल्या व्यक्तिंच्याच चाचण्या होत असल्याने लक्षणे नसलेले अथवा उपचार घेण्याची आवश्यकता नसलेले अनेकजण आजही सार्वजनिक वावरत असल्याची शक्यता नाकारता येणार नाही.

विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात संगमनेरात आलेल्या जिल्हाधिकार्यांनी कोविड आढावा घेतांना लसीकरण आणि चाचण्यांचा वेग वाढवण्याची सूचना स्थानिक अधिकार्यांना केली होती. मात्र त्यानंतरही चाचण्यांचा वेग वाढलेला नसल्याने तालुक्यातील रुग्ण समोर येण्याची गती आजही कमी असल्याचे आकडेवारीतून दिसून येते, प्रत्यक्षात मात्र वस्तुस्थिती तशी नाही. आजही जिल्ह्यात 244 रुग्ण समोर आलेले असतांना संगमनेर तालुक्यात अवघ्या 13 जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यात संगमनेर शहरातील महात्मा फुले चौकातील 36 वर्षीय महिला, मालदाड रोडवरील 19 वर्षीय तरुण व जोर्वे रस्त्यावरील 32 वर्षीय तरुण बाधित झाल्याचे समोर आले आहे.

तर ग्रामीणभागातील वडगाव लांडगा येथील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, गुंजाळवाडी येथील 22 वर्षीय महिला, आश्वी खुर्द येथील 58 वर्षीय इसमासह 26 वर्षीय तरुण, अमृतनगरमधील 59 वर्षीय इसम, घुलेवाडीतील 42 वर्षीय तरुण, चिंचपूर येथील 41 वर्षीय महिला, मालदाड येथील 29 वर्षीय महिला, वडगाव पान येथील 26 वर्षीय महिला व सादतपूर येथील 19 वर्षीय तरुणाचा आजच्या बाधितांमध्ये समावेश आहे.

जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येत आज 244 नवीन बाधितांची भर पडली आहे. त्यात सर्वाधीक 84 रुग्ण एकट्या अहमदनगर महापालिका क्षेत्रातून समोर आले आहेत. त्या खालोखाल नगर तालुका 24, कोपरगाव 19, इतर जिल्ह्यातील 18, संगमनेर 13, अकोले व श्रीरामपूर प्रत्येकी 12, पाथर्डी 11, पारनेर व राहाता प्रत्येकी 10, नेवासा व श्रीगोंदा प्रत्येकी 7, राहुरी 6, भिंगार लष्करी परिसर 4, कर्जत 3, इतर राज्यातील 2, जामखेड व शेवगाव येथून प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्या आता 1 हजार 306 झाली असून आजवरची एकूण रुग्णसंख्या 3 लाख 60 हजार 397 तर एकूण कोविड बळींची संख्या 7 हजार 157 झाली आहे. आज 31 जणांना उपचार पूर्ण झाल्याने घरी सोडण्यात आले.

