संपूर्ण जगात हिंदू राष्ट्राची स्थापना व्हावी : कालिचरण महाराज संगमनेरात अवतरले शिवराज्य; चौकाचौकात शिवप्रतिमा आणि पोवाडे
नायक वृत्तसेवा, संगमनेर
छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी हिंदवी स्वराज्याची स्थापना करुन परकीय आक्रमकांना थोपवले. मात्र त्यापूर्वी प्रचंड विस्तारलेल्या आपल्या देशाचे अनेक भाग या आक्रमकांनी गिळले आहेत. आज शिवरायांचा जन्मोत्सव साजरा करताना आपण पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्याची शपथ घेण्याची आणि आपला भूभाग पुन्हा मिळवण्याची गरज निर्माण झाली आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने आपल्या नसानसात बळ प्राप्त होवो आणि शिवरायांचे स्वप्नं पुन्हा एकदा साकार होवो अशा शब्दांत कालिचरण महाराज यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
येथील शिवजयंती उत्सव युवक समितीने शिवजयंतीचे औचित्य साधून शहरातून मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी चंद्रशेखर चौकात रॅलीच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. समितीचे अध्यक्ष कपिल टाक, उपाध्यक्ष अक्षय कर्पे, विक्रम कतारी, कार्याध्यक्ष सागर कानकाटे, नीलेश पवार, सचिव सागर पगार, खजिनदार संतोष वलवे व प्रकल्पप्रमुख तुषार ओहरा आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना कालिचरण महाराज पुढे म्हणाले की, आजच्या दिवसाचे निमित्त साधून आपण सर्वांनी जातीवाद, वर्गवाद, भाषावाद, प्रांतवाद मिटवून छत्रपतींच्या स्वप्नातील हिंदवी स्वराज्य पुन्हा निर्माण करण्यासाठी एकजुटीने उभे राहण्याची गरज आहे. हिंदू धर्माचे प्रेरणास्त्रोत, ऊर्जास्त्रोत असलेल्या छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करताना आपण सर्वांनी ही भारतभूमीच नव्हेतर संपूर्ण विश्व हिंदूराष्ट्र व्हावे यासाठी शपथ घेतली पाहिजे. परकीय आक्रमकांनी आपल्या देशाची संपत्ती लुटली, जमीन लुटली परंतु त्यांना आपल्या मनगटातील बळ मात्र लुटता आले नाही, त्या बळाचा वापर आता छत्रपतींच्या स्वप्नातील स्वराज्य निर्माण करण्यासाठी करावा असे आवाहनही त्यांनी केले.
तिथीनुसार देशभरात आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. संगमनेरातही चौकाचौकात आणि गल्लोगल्ली तरुण मंडळांसह बाल मंडळांनीही शिवरायांच्या प्रतिमा उभारुन भगवे झेंडे आणि मराठी फौजांच्या पराक्रमाचे पोवाडे लावल्याने संगमनेरात शिवराज्य अवतरल्याचा आभास निर्माण होत होता. काल रात्रीपासूनच उत्साही तरुण आपल्या दुचाक्यांना भगवे ध्वज बांधून शहरातून घोषणा देत फिरु लागल्याने वातावरणात उत्साह संचारला होता. त्यातच आज (ता.10) सकाळी शिवजयंती उत्सव युवक समितीने कालिचरण महाराज यांचा सहभाग असलेल्या मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत असंख्य तरुण व तरुणी भगवे फेटे बांधून व आपापल्या दुचाकींना भगवे ध्वज बांधून सहभागी झाल्याने शहराच्या रस्त्यावरुन भगवे वादळ वाहत असल्याचे विहंगम दृष्यही सकाळी बघयायला मिळाले. या रॅलीचे जागोजागी भव्य स्वागतही करणत आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे स्वतः फौजफाट्यासह या रॅलीत सहभागी झाले होते.