सपकाळांच्या ‘त्या’ विधानाचे संगमनेरात तीव्र पडसाद! आंदोलनात टिपूच्याही प्रतिमेचा वापर; सुलतान शासन दरबारी ‘महापुरुष’ नाही..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना थेट देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या विधानाचे तीव्र पडसाद प्रवरेच्या काठीही उमटले असून, सोमवारी संगमनेरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत हर्षवर्धन सपकाळ आणि टिपू सुलतान यांच्या प्रतिमा हातात घेत आंदोलन केले. यावेळी संतप्त आंदोलकांनी सपकळ यांची प्रतिमा पायदळी तुडवली व त्यावर अंडी फेकून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या आंदोलनानंतर मुस्लिम समाजातील एका गटाने शहर पोलीस ठाण्यात जावून आंदोलकांविरोधात धार्मिक भावना दुखवल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, मात्र टिपू सुलतानला शासन दरबारात ‘महापुरुषाचा’ दर्जा नसल्याचे सांगत पोलिसांनी त्यांची मागणी धुडकावून लावत जमाव पांगवला.


सोमवारी (ता.16) संगमनेरमध्ये महायुतीच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांचा रोष शिगेला पोहोचला होता. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हेतर, विश्वाचे आदर्श आहेत, अशा वेळी त्यांची लाखों हिंदूंचे शिरच्छेद करणार्‍या क्रूरकर्मा टिपू सुलतानशी तुलना करणे हा जाणीवपूर्वक केलेला अपमान असल्याचे आंदोलकांनी म्हटले. हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या असून, पक्षाने त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली.


आंदोलनानंतर मुस्लिम समाजातील एका वर्गाने या प्रकारावर नाराजी व्यक्त करत शहर पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली होती. यावेळी जमलेल्या तरुणांनी आंदोलकांनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, संगमनेर पोलिसांनी अत्यंत संयमाने आणि कायद्याच्या चौकटीत राहून ही मागणी धुडकावून लावली. इतिहासात टिपू सुलतानने जरी इंग्रजांविरोधात लढा दिला असला, तरी तो लढा राष्ट्रहितासाठी नसून स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि सत्ता टिकवण्यासाठी होता. त्यामुळे शासन दरबारी टिपू सुलतानची गणना ‘महापुरुष’ म्हणून केली जात नसल्याचेही यातून स्पष्ट झाले.


सपकाळ यांच्या विधानाकडे केवळ एक चुकीचे विधान म्हणून न पाहता, त्याकडे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विशिष्ट वर्गाला खुश करण्याचा राजकीय प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. बहुसंख्य हिंदू समाजात टिपू सुलतानबद्दलची मते ही त्याच्या धर्मांध कृत्यांनी आणि सक्तीच्या धर्मांतराच्या इतिहासामुळे अत्यंत नकारात्मक आहेत. अशा परिस्थितीत त्याची तुलना शिवरायांशी करणे म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखेच आहे. आता या प्रकरणावरून सुरू असलेले राजकारण आगामी काळातील निवडणुकांवर काय परिणाम करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ एकत्रित होवून शिवरायांच्या अर्धाकृती प्रतिमेस पुष्पाहार अर्पण केला. त्यानंतर पदयात्रेने बसस्थानकापर्यंत येवून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. आंदोलकांच्या हातात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व टिपू सुलतान यांच्या प्रतिमा होत्या. पदयात्रेदरम्यान आंदोलकांनी सपकाळ यांची प्रतिमा पायदळी तुडवत त्यावर अंडीही फेकली. यावेळी टिपूच्या प्रतिमेशीही आंदोलकांनी तसाच प्रकार केल्याचे सांगत एका गटाने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती, मात्र ती धुडकावण्यात आली. या आंदोलनात आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, भाजपच्या शहराध्यक्षा पायल ताजणे, रिपाईचे शहराध्यक्ष कैलास कासार, शिवसेनेचे शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख सौरभ देशमुख, भाजपच्या युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रोहीत चौधरी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Visits: 2 Today: 2 Total: 1465270

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *