संगमनेर गटविकास अधिकार्यांच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट
नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील सामजिक कार्यकर्ते व उद्योजकांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट किंवा ते क्लोन करून लोकांकडे पैशांची मागणी केली जात आहे. अगदी मंत्र्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनाही याचा फटका बसला आहे. ही प्रकरणे ताजी असतानाच संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांच्याबाबतही तसे घडले आहे. त्यांच्या नावाने बनावट अकाउंट उघडल्याचे समोर आले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, अज्ञात व्यक्तीने गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांचा फोटो व नाव असलेले फेसबुक खाते क्लोन केले. त्यावरून त्यांच्या मित्रपरिवाराकडे 10 हजार रुपयांची तातडीची गरज असल्याचे सांगत पैशांची मागणी केली होती. या प्रकरणी त्यांच्या संपर्कातील व्यक्तींनी शिंदे यांना फोनवरुन विचारणा करीत माहिती दिल्यानंतर शिंदे यांनी तातडीने त्यांचे फेसबुक खाते बनावट नावाने सुरू झाल्याचे जाहीर केले. या प्रकाराला बळी न पडण्याचे आवाहन केले. तसेच तातडीने जुन्या खात्यावरचा प्रोफाईल फोटो हटवला आहे. तसेच समाज माध्यमांचा वापर करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन सुरेश शिंदे यांनी केले आहे.