भक्तीमय वातावरणात संगमनेरात जगन्नाथ रथाची मिरवणूक! राजस्थानी ब्राह्मण समाजाची परंपरा; जागोजागी पुष्पवृष्टी आणि जयघोषाने शहर दुमदुमले

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मोठी ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा असलेल्या संगमनेरात शुक्रवारी जगदीश जयंतीचा उत्सव भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. राजस्थानी ब्राह्मण समाजाच्या शहरात एकमेव असलेल्या जगदिश मंदिरात यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी शहरातील प्रमुख रस्त्यावरुन भगवान जगन्नाथाची प्रतिमा असलेल्या रथाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती. त्यात राजस्थानी ब्राह्मण समाजातील अबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संगमनेरातील या उत्सवाला सुमारे शंभर वर्षांचा इतिहास असून पूर्वी जगदीश भगवानाच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढली जात, मात्र गेल्या काही दशकांपासून त्यात बदल करुन ओरीसातील जगन्नाथपुरीच्या धरतीवर रथोत्सव साजरा केला जातो. मिरवणुकीच्या मार्गावर पुष्पवृष्टी आणि जगदिश भगवान की जयच्या घोषाने वातावरण दुमदुमले होते.

दरवर्षी आषाढ शुद्ध प्रथमेला देशभरात रथोत्सवाची धूम असते. ओरिसातील जगन्नाथपुरी येथे भगवान जगदीशांचे अतिशय प्राचीन मंदिर आहे. येथे होणारा रथोत्सवाला जगभरातून लाखो भाविक हजेरी लावतात. जगदीश जयंतीच्या दिनापासून सुरू होणारा हा उत्सव नऊ दिवस चालतो. पूर्वी महाराष्ट्रात भगवान जगदीशांचे एकमेव मंदिर संगमनेरात होते, मात्र अलिकडच्या काळात राज्यात अनेक ठिकाणी नव्याने मंदिरे उभारली गेली असून तेथेही दरवर्षी हा उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. राजस्थानी ब्राह्मण समाजाच्या या मंदिरात शुक्रवारी पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

जगदीश जयंतीच्या दिनी श्रींच्या मंगलमूर्तीला अमृतवाहिनी प्रवरेच्या वाहत्या प्रवाहातून सुहासिनींनी सवाद्य आणलेल्या पाण्याने मंगलस्नान घालण्याची परंपरा आहे. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी समाजातील सुवासिनींनी प्रवरेकाठी जावून वाजतगाजत घागरी भरुन पाणी आणले. उत्सवाच्या दिनी शुक्रवारी पहाटे श्रींना मंगलस्नानासह लघुरुद्राभिषेक करण्यात आला. महिला मंडळाच्यावतीने भजन व कीर्तनाच्या कार्यक्रमासह माध्यान्नाला श्रींची आरती करण्यात आली. यावेळी राजस्थानी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. सायंकाळी 5 वाजता मंदिरापासून श्रींची प्रतिमा असलेल्या रथाची शहरातील प्रमुख मार्गांवरुन सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी फाटक्यांची आतिषबाजी करीत स्वागत केले, अनेक ठिकाणी या मिरवणूकीवर पुष्पवृष्टीही करण्यात आली. संपूर्ण मिरवणूक मार्गावर भजनकीर्तन आणि जयघोषाने संगमनेरातील वातावरण दुमदुमून गेले होते. रात्री साडेआठच्या सुमारास रथोत्सवाची सांगता झाल्यानंतर रथातील प्रतिमेची पूजाअर्चा व आरती करण्यात येवून प्रसादाचे वाटप झाले. या मिरवणुकीसाठी ब्राह्मण समाजाच्या युवक संघटनेने मोठे परिश्रम घेतल्याने ही मिरवणूक अतिशय दिमाखदार झाली. शहर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी या दरम्यान चोख बंदोबस्त ठेवला होता.

Visits: 17 Today: 1 Total: 115036

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *