37 वर्षांनी भेटलेले मित्र-मैत्रिणी रंगले जुन्या आठवणींत! सह्याद्री विद्यालयाच्या 1985 सालातील दहावीच्या वर्गाचा स्नेहमेळावा उत्साहात
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरातील सह्याद्री विद्यालयाची 1985 सालामध्ये दहावीत शिकणारी तुकडी नुकतीच स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने भेटली. तब्बल 37 वर्षांनी भेट होणार असल्याने वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व मित्र-मैत्रिणींनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रम व स्नेहभोजनाने स्नेहमेळावा अतिशय रंगतदार झाला.
समाज माध्यमावरुन जुन्या मित्र-मैत्रिणींना रवी मंडलिक व दिलीप ढोले यांनी स्नेहमेळाव्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यानुसार वेळ, ठिकाण व दिनांक निश्चित झाले. त्यास सर्वांना दाद दिली आणि रविवारी (ता.29) इंद्रप्रस्थ लॉन्स येथे स्नेहमेळावा पार पडला. प्रारंभी शारदास्तवनाने स्नेहमेळाव्याची सुरुवात झाली. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक वसंत साबळे, विठ्ठल शेवाळे, श्रीपाद घुले, शिवाजी देशमुख, श्री. कर्डिले, श्री. धारणकर, श्रीमती. जाधव, श्रीमती. काळे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी शारदास्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रत्येकाने आपापला परिचय करुन दिला.
त्यानंतर तब्बल 37 वर्षांनी एकत्र येत असल्याने जुन्या आठवणींमध्ये रममाण होत विनोदात दंगून गेले होते. याचबरोबर एकमेकांची आपुलकीने विचारपूस करुन सद्यस्थिती जाणून घेतली. तसेच अनेकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन देत स्नेहमेळाव्याचा मनमुराद आनंद घेतला. सेवानिवृत्त शिक्षक साबळे व शेवाळे यांनीही जुन्या आठवणी ताज्या करुन या उपक्रमाचे कौतुक केले. दरम्यान, माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते उपस्थित गुरुजनांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाने यामध्ये अधिक रंगत आणली. वृक्षारोपण करुन पर्यावरण बचाव करण्याचाही संदेश दिला.
प्रास्ताविक रवी मंडलिक यांनी केले. सूत्रसंचालन राजू गोरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन शेखर गाडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उद्योजक दिलीप ढोले, अनिल खिलारी, शैलेश कासार, सोमनाथ अभंग, साहेबराव अभंग, किसन अभंग, माधव भोंडरे, जयश्री कोकणे, अनिल वाकचौरे, शशांक खोजे, रमेश गुरखा आदिंनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी सैराट चित्रपटातील झिंगाट गाण्यावर सर्वांनी ताल धरला. त्यानंतर स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.