संगमनेरच्या कुख्यात कत्तलखान्यांवर ‘दुसर्‍यांदा’ बुलडोझर! चार वर्षांपूर्वीही झाली होती कारवाई; मोठ्या फौजफाट्यासह चौदा ठिकाणं ध्वस्त..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
वारंवार पोलिसांच्या छाप्यानंतरही मूळढाच्यावर पत्र्यांचे आडोसे तयार करुन सुरु असलेल्या शहरातील बेकायदा गोवंश कत्तलखान्यांवर आज पुन्हा एकदा बुलडोझर चालवण्यात आला. चार जेसीबी आणि तितक्याच ट्रॅक्टरसह सकाळी दहाच्या सुमारास पालिकेच्या अतिक्रमण पथकाने तगड्या पोलीस बंदोबस्तात अवघ्या दोन तासांतच ही मोहीम फत्ते केली. या दरम्यान किरकोळ विरोध वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. चार वर्षांपूर्वी अहिल्यानगर पोलिसांनी राज्यातील सर्वात मोठा छापा घातल्यानंतर उसळलेला जनक्षोभ शांत करण्यासाठी त्यावेळीही प्रशासनाने बेकायदा गोवंश कत्तलखाने उध्वस्त केले होते. मात्र कालांतराने त्याच ठिकाणच्या मूळ ढाच्यावर पुन्हा पत्र्यांचे आडोसे उभारुन हा बेकायदा धंदा जोमात आल्यानंतर प्राणिमित्र शिवशंकर स्वामी यांनी प्रशासनासह स्थानिक आमदार व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेवून या विषयाकडे त्यांचे लक्ष वेधल्यानंतर अखेर आज पुन्हा एकदा पालिकेला कारवाई करणं भाग पडलं.


संगमनेरातील गोवंश कत्तलखान्यांवरुन यापूर्वी जातीय तणावासारख्या गोष्टी घडल्याचे भूतकाळात डझनाने दाखले सापडतील. मात्र त्याउपरांतही येथील बेकायदा गोवंश कत्तलखाने बंद होत नसल्याचे वास्तव आहे. त्यामागे या उद्योगातून होणारी कोट्यवधी रुपयांची उलाढाल कारणीभूत असल्याने काहीवेळा धोका पत्करुन तर, बहुतेक स्थानिकपासून ‘स्थानिक‘पर्यंतच्या यंत्रणेला ‘मॅनेज’ करुन अपवाद वगळता हा धंदा अव्याहत सुरुच आहे. या विषयावरुन यापूर्वी अनेकदा चर्चाही झाल्या, चार वर्षांपूर्वीच्या अहिल्यानगर पोलिसांच्या कारवाईत सापडलेल्या डायर्‍यांच्या माध्यमातून नावानिशी तो ठळकपणे समोरही आला. मात्र कुंपनच शेत खातं असेल तर, जमिनीचे रक्षण करणार कोण? असा प्रश्‍न प्रत्येकवेळी उभा राहील्याने आजवरच्या कारवाया केवळ ‘फार्स’ असल्याचे लपून राहीले नाही.


याबाबत मुंबईच्या प्राणिकल्याण समितीचे सदस्य, प्राणिमित्र शिवशंकर स्वामी यांनी गेल्या महिन्यात (ता.28) संगमनेरातील कुख्यात गोवंश कत्तलखान्यांचे वास्तव समोर करुन स्थानिक पोलिसांपासून ते पोलीस अधिक्षकांपर्यंत आणि आमदार अमोल खताळ यांच्यापासून ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत सर्वांची भेट घेत त्यांना कारवाईचे साकडे घातले. यासंदर्भातील निवेदनातून त्यांनी वारंवार गुन्ह्यात सापडणार्‍या आरोपींवरही प्रकाश टाकल्यानंतर आमदार खताळ यांनी आठवडाभरात कारवाईचे आदेश दिले होते. मात्र त्या उपरांतही पालिकेकडून कारवाईबाबत कोणतीही हालचाल होत नव्हती. विशेष म्हणजे पोलिसांना निवेदन प्राप्त झाल्यानंतर त्यांनी कारवाईसाठी आवश्यक असलेला बंदोबस्त देण्याची लेखी तयारीही दर्शवली होती, मात्र त्या उपरांतही पालिका कारवाईसाठी धजावत नसल्याने मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्याबाबत संशय निर्माण झाला होता.


पालिकेच्या या चालढकलीचा फायदा येथील कसायांना होत असल्याचेही गेल्या दहा दिवसांतील स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांनी घातलेल्या एकामागून एक तीन छाप्यांमधून समोर आले. मात्र पालिकेच्या इच्छाशक्तिपुढे काहीच चालत नसल्याने शहरातील हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांनी शिवशंकर स्वामी यांच्या 28 जानेवारीच्या निवेदनासह 29 जानेवारीरोजी शहर पोलिसांनी बंदोबस्त देण्याची लेखी तयारी दर्शवल्याचा संदर्भ देत गेल्या बुधवारी (ता.11) कारवाई करण्याबाबत निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर ‘अखेर’ आज (ता.16) पालिकेला कारवाईचा मुहूर्त सापडला.


आज सकाळी दहाच्या सुमारास पालिकेने अतिक्रमण पथकासह बांधकाम व आरोग्य विभागाचे सुमारे पन्नासावर अधिकारी व कर्मचारी, चार जेसीबी व तितक्याच संख्येने ट्रॅक्टर-ट्रॉली आणि सोबतीला पोलीस उपअधिक्षक डॉ.कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांच्यासह शहर पोलिसांचा तगडा बंदोबस्त सोबत घेत शहराच्या पूर्वेकडील जमजम कॉलनी, भारतनगर परिसरातील 14 कत्तलखान्यांच्या मूळ ढाच्यावर जेसीबीचा पंजा उगारुन ते ध्वस्त केले. यावेळी कत्तलखान्यांसाठी होणारा वीज, सांडपाणी व पाण्याचा बेकायदा पुरवठाही तोडण्यात आला. जवळपास दोनतास चाललेल्या कारवाईदरम्यान परिसरातील काहींनी विरोध दर्शवण्याचाही प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला. या कारवाईने संगमनेरातील बेकायदा गोवंश कत्तलखाने पुढील काही दिवस नियंत्रणात राहतील असा अंदाज आहे.


राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्यापासून जर्शी गायींच्या गोर्‍ह्यांचा प्रश्‍न ऐरणीवर आहे. शेतीला जोडधंदा म्हणून ग्रामीणभागात मोठ्या प्रमाणात संकरीत गायींचे पालन होते, मात्र त्यांच्या गोर्‍ह्यांना खांदाच नसल्याने त्यांचा शेतीसाठी काहीच उपयोग होत नाही. अशावेळी केवळ पोसण्यासाठी गोर्‍हे सांभाळणे छोट्या शेतकर्‍यांना शक्यच नसल्याने एकप्रकारे या कायद्याने गोवंश कत्तलखान्याच्या चोरवाटाही निर्माण केल्या आहेत. संगमनेर व अकोले तालुक्यात अशाप्रकारच्या संकरीत गायींच्या व्यवसायातून दूध व्यवसाय तेजीत येवून त्यांच्या संख्येसह गोर्‍ह्यांची संख्याही वाढती असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. कायदा करताना शासनाकडून बिनकामाच्या ‘गोर्‍ह्यां’चा विचारच झाला नसल्याने कायद्याची चौकट लाभलेला विदेशी गोवंशही तणावाचे कारण बनला आहे.

Visits: 4 Today: 4 Total: 1461864

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *