… आता ‘19 मे’ ला तहसीलसमोर आत्मक्लेश आंदोलन ः आ. डॉ. लहामटे ‘अताएसो’ बचाव कृती समिती आक्रमक ; लढा चालूच ठेवण्याचा निर्धार

नायक वृत्तसेवा, अकोले
अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी बचाव समितीच्या तीन दिवसांच्या धरणे आंदोलनास जनाधार मिळाल्याचे लक्षात घेऊन संस्थेचे कार्यकारी विश्वस्त मधुकर पिचड यांनी चौदा मागण्या मान्य केल्या. परंतु मागणीनुसार घरातील एकच व्यक्ती विश्वस्त राहणार हे लक्षात आल्यावर बैठक स्थगित केली असा विश्वासघात जनतेला नवा नाही. आता आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून 19 मे, 2022 ला तहसील कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दिला.

अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी बचाव समितीच्या समवेत शिक्षण संस्थेचे कायम विश्वस्त मधुकर पिचड यांची बैठक सोमवारी (ता.9) आयोजित करण्यात आली होती. पण रविवारी रात्री अचानक ही बैठक रद्द केल्याचे नूतन कार्यकारिणीकडून जाहीर करण्यात आले. म्हणून आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करण्यासाठी बचाव कृती समितीच्यावतीने शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेण्यात आली होती. आमदार डॉ. किरण लहामटे यांनी आंदोलनाच्या पुढील टप्प्यांची माहिती देतानाच जनआंदोलनांबरोबर न्यायालयात दाद मागण्याचा लढा चालूच राहणार असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी सीताराम गायकर, विठ्ठल चासकर, बाळासाहेब भोर, अशोक भांगरे, कचरू शेटे, डॉ. अजित नवले, विनय सावंत, विजय वाकचौरे, डॉ. संदीप कडलग, मीनानाथ पांडे, भानुदास तिकांडे, वकील के. बी. हांडे, सुरेश खांडगे, सुरेश नवले, राजेंद्र कुमकर, चंद्रकांत सरोदे, अरुण रूपवते, शरद चौधरी, जालिंदर बोडके, शहाजी पाटोळे, चंद्रकांत सरोदे, शहाजी पाटोळे, अरुण रूपवते, बाळासाहेब आवारी, भानुदास तिकांडे, राजेंद्र कुमकर, कळसचे सरपंच राजेंद्र गवांदे, संतोष नाईकवाडी, संदीप शेंणकर, बाळासाहेब भांगरे व सोमनाथ नवले आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. अजित नवले म्हणाले, पिचड यांनी बचाव कृती समितीत फूट पाडण्याचा प्रयत्न केला असून लेखी आश्वासन दिले. पण शब्द पाळला नाही. आता जनआंदोलनाचा लढा अधिक तीव्र करणार आहोत असे सांगितले. यावेळी अशोक भांगरे, सीताराम गायकर, मीनानाथ पांडे, विनय सावंत, विठ्ठल चासकर व विजय वाकचौरे यांनीही जोरदार टीका केली.
