लाचखोर पोलीस उपनिरीक्षक राणा परदेशीला जामिन मंजूर! लाखाची रक्कम लाटूनही अवघ्या चोवीस तासांतच झाली मुक्तता..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
चोरीचे सोने घेतल्याचा ठपका ठेवून नाशिकच्या सोनाराला दोन लाखांचा गंडवण्याच्या प्रयत्नात एक लाखांची लाच स्विकारतांना आपल्या ‘पंटर‘सह रंगेहात पकडल्या गेलेल्या पोलीस उपनिरीक्षक राणा प्रतापसिंग परदेशी याला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर काही वेळातच जामिनही मंजूर झाला. तत्पूर्वी एसीबीकडून पुढील तपासासाठी त्याला कोठडीची मागणी करण्यात आली होती, मात्र बचाव एसीबीचे दावे खोडून काढल्याने त्यांचा प्रतिवाद मान्य करीत न्यायालयाने परदेशीसह त्याचा पंटर विशाल रविंद्र पावसे याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे व त्यानंतर काही वेळातच त्या दोघांनीही दाखल केलेले जामिन अर्ज मंजूर करीत अवघ्या चोवीस तासांतच त्यांची कारागृहातून सुटकाही झाली.

गेल्या महिन्यात 20 ऑक्टोबररोजी विद्युत वसाहतीत आपल्याच घराचा कडी-कोयंडा उचकटून जन्मदात्या आईच्या दागिन्यांसह तब्बल सव्वातीन लाखांचा मुद्देमाल चोरणार्या व मित्राच्या मदतीने नाशिकमध्ये ते विकणार्या दोघांना गेल्या आठवड्यात याच लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाने गोव्यातून अटक केली होती. त्याच्या चौकशीतून त्याने कोठे कोठे चोरीचे सोने विकले याची माहिती मिळवत परदेशी याने त्या सोनारांनाच नागवण्यास सुरुवात केली. त्यातून नाशिक येथील ज्या सोनाराला संबंधितांनी चोरीचे सोने विकले होते त्याला अटकेचा धाक दाखवित परदेशी याने दोन लाख रुपयांची मागणी केली.

तडजोडीअंती मंगळवारी त्यातील एक लाख रुपये देण्याचे ठरले होते. मात्र संबंधित सोनाराने नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्याने त्याच दिवशी परदेशी याचे भ्रष्ट कारनामे आटोपणार असल्याचे निश्चित झाले होते. मंगळवारी संबंधित सोनार ठरलेली रक्कम घेवून पोलीस ठाण्यात आले, त्यांनी फोन करुन परदेशीला त्याची माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच परदेशी पोलीस ठाण्यात आला व खासगी पंटरमार्फत त्याने ‘त्या’ सोनाराकडून एक लाखाची रक्कम स्विकारली. त्याचवेळी एसीबीने त्याच्यावर झडप घातली.

मात्र त्यांच्या तावडीतून सुटका करुन घेत परदेशी आपल्या ‘बुलेट’ दुचाकीवरुन तेथून पसार होण्यात यशस्वी झाला. मात्र एसीबीने त्याचा पिच्छा सोडला नाही, त्यांनीही त्याचा पाठलाग करीत पालिकेच्या क्रीडा संकुलाजवळ त्याच्या मूसक्या आवळल्या व गुन्हेगाराप्रमाणे त्याला ओढीतच पोलीस ठाण्यात आणले. रात्रभर संगमनेरच्या कारागृहात काढल्यानंतर आज दुपारी त्याच्यासह त्याचा पंटर विशाल रविंद्र पावसे यालाही न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्या आवाजाचे नमूने तपासण्यासह या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे याचा शोध घेण्यासाठी या दोघांनाही एसीबी कोठडी द्यावी अशी मागणी एसीबीच्यावतीने सरकारी वकील अॅड.बी.जी कोल्हे यांनी केली.

याशिवाय संबंधिताला जामीन मिळाल्यास त्याच्याकडून साक्षीदारांवर दबाव आणला जावू शकतो असा युक्तिवादही करण्यात आला. मात्र बचाव पक्षाचे वकील अॅड.अतुल आंधळे यांनी एसीबीचे दावे खोडीत अन्य प्रकरणातील काही दाखले देत दोन्ही संशयितांना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली. ती मान्य करीत न्यायालयाने परदेशीसह त्याच्या पंटरला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर काही वेळातच त्याने जामिन अर्ज दाखल केला, तो देखील मंजूर करण्यात आला व अवघ्या चोवीस तासांतच हा लाचखोर अधिकारी मुक्त झाला.

मंगळवारी दुपारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी राणा प्रतापसिंग परदेशी व त्याचा पंटर विशाल रविंद्र पावसे याला रंगेहात पकडल्यानंतर कालची रात्र दोघांनाही गजाआड काढावी लागली. आज सकाळी साडे अकराच्या सुमारास त्या दोघांना न्यायालयासमोर नेण्यात आले. यावेळी सरकार पक्षाच्यावतीने अॅड.बी.जी.कोल्हे यांनी तर आरोपींच्यावतीने अॅड.अतुल आंधळे यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद मान्य केल्याने या दोहींनाही न्यायालयीन कोठडी मिळाली व त्यानंतर काही वेळातच जामिनही मंजूर झाला व ते दोघेही मुक्त झाले.

