सहकाराच्या बालेकिल्ल्यात सत्तेचे नवीन ‘स्ट्रक्चरल ऑडिट’! काँग्रेसला ‘एकाकी’ झुंजावे लागणार; माजीमंत्री थोरातांची राजकीय ‘अग्निपरीक्षा’..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्राच्या राजकारणाचे ‘शक्तिपीठ’ मानल्या जाणार्या अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या राजकीय हवा पालटली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर वर्षभराने झालेल्या नगरपालिका, नगरपंचायती व महापालिका निवडणूक निकालांनी हे स्पष्टही केले आहे. त्यातच आता नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील बारा जिल्हा परिषद व 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीत ग्रामीण मतदारांनी प्रस्थापित ‘बॅरिकेट्स’ तोडून महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे मतदारांचा हा बदलता मूड साखरसम्राटांच्या जिल्ह्यात काय उलथापालथ घडवणार, याचे उत्तर आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतून मिळणार आहे.

गेल्या दशकानुदशके अहिल्यानगर जिल्ह्याचे राजकारण सहकारी साखर कारखाने, दूध संघ आणि जिल्हा बँकेच्या भोवती फिरत राहिले आहे. विखे-पाटील, थोरात, गडाख, कोल्हे आणि पिचड या जिल्ह्यातील मोठ्या राजकीय घराण्यांनी ‘सहकारातून समाजकारण आणि समाजकारणातून सत्ताकारण’ हे सूत्र अतिशय यशस्वीपणे राबवले. जिल्ह्यावर दीर्घकाळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी (संयुक्त) या पक्षांचे वर्चस्व राहीले आहे. मात्र, 2024 मध्ये झालेल्या विधानसभा आणि महिन्याभरापूर्वी पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांच्या निकालांनी जिल्ह्यातील सहकाराचा हा ‘पॅटर्न’ आता वैचारिक राहिला नसून तो, ‘सत्तेच्या सोयीचा’ झाल्याचे सिद्ध केले. त्याचा परिणाम काल-परवापर्यंत शहरी मतदारांचा पक्ष म्हणून संबोधल्या जाणार्या भाजपने नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून आले आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून राबवण्यात आलेल्या विविध योजना आणि थेट खात्यात अनुदान जमा होण्याची व्यवस्था यामुळे ग्रामीण मतदारही आता महाविकास आघाडीची साथ सोडून महायुतीकडे आणि विशेषतः भाजपकडे झुकत असल्याचे दिसू लागले आहे. राज्यातील बारा जिल्हा परिषदांच्या या निकालांमुळे महायुतीशी जवळीक साधणार्या नेत्यांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनाही बळ मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे कोणत्याही पक्षाने या निवडणुकीत जाहीर प्रचार केला नाही. त्यामुळे उमेदवारांना घरोघरी जावून मतं मागावी लागली. त्यातही महायुतीचे प्राबल्य दिसून आल्याने ‘ज्याची राज्यात सत्ता, त्याचाच विकासनिधी’ हा विचार ग्रामीण मतदारांच्या मनात रुजत असल्याचे दिसून आले आहे.

नगरपालिका, महापालिकांपाठोपाठ जिल्हा परिषद निवडणुकीतही महाविकास आघाडीला धोबीपछाड मिळाल्याने आघाडीच्या एकसंधतेसाठी या निवडणुकांचे निकाल धोक्याची घंटा ठरु शकतात अशी स्थिती आहे. या निकालातून ज्येष्ठनेते शरद पवार यांच्या गटाची ताकद कमी झाल्याचे तर, शिवसेना (ठाकरे) गटाला ग्रामीण भागात संघटनात्मक बांधणीत पूर्णतः अपयश आल्याचेही दिसून आले आहे. त्यातच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीच्या दोन गटांच्या विलिनीकरणासाठी आग्रही होते अशाप्रकारची चर्चा समोर येवून पवार कुटुंबियांमध्ये त्यावरुन बैठकाही सुरु असल्याने ‘महाविकास आघाडीचे’ भवितव्य अधांतरीत आहे. अशास्थितीत एकाकी पडलेल्या काँग्रेसला जिल्ह्यात जिवंत ठेवण्याची जबाबदारी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या खांद्यावर येवून पडली आहे. त्यामुळे त्यांना आता केवळ संगमनेरपुरते मर्यादित राहून चालणार नाही.

नगरपालिका, नगरपंचायती व त्यानंतर झालेल्या अहिल्यानगर महापालिकेचा निकाल आणि राज्यातील बारा जिल्हा परिषदा व 125 पंचायत समित्यांच्या निकालांमधून समोर आलेला मतदारांचा कौल असाच कायम राहीला तर, अहिल्यानगर जिल्ह्यातून काँग्रेसचा ‘हात’ निसटण्याची भीती आहे. त्याचवेळी राज्याचे जलसंपदा व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासमोर भाजपवरील ‘शहरी पक्षा’चा छाप पुसण्याचीही संधी असल्याने यावेळच्या जिल्हा परिषदेत विखे-पाटील विरुद्ध थोरात आणि प्रस्थापित असा राजकीय संघर्ष बघायला मिळू शकतो.

राजकारण हे प्रवाहासारखे असते, जो प्रवाहाच्या वेगाशी जुळवून घेतो, तोच काठावर पोहोचतो. अहिल्यानगर जिल्ह्यात आता हा प्रवाह ‘परिवर्तना’च्या दिशेने वाहत असल्याचे गेल्या तीन निवडणुकांमधून दिसून आले आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत ‘आघाडी विरुद्ध महायुती’ असा सामना होतो की, ‘महायुती विरुद्ध स्थानिक प्रस्थापित’ असा अस्तित्वाचा संघर्ष पाहायला मिळतो याबाबत उत्कंठा निर्माण झाली आहे. आपल्या राजकीय सुरक्षिततेसाठी साखर कारखानदारीवर पकड असलेल्या नेत्यांकडून महायुतीचा आसरा घेतला जाण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषदेचे गणित महायुतीच्या बाजूने झुकल्याचे आजतरी दिसून येत आहे.

राष्ट्रवादीचे एकत्रीकरण झाल्यास जिल्ह्याचा राजकीय पोत पूर्णपणे बदलणार आहे. अशावेळी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना ‘महाविकास आघाडीचा चेहरा’ म्हणून केवळ समन्वय साधून चालणार नाही तर, जिल्ह्यातील काँग्रेसचे अस्तित्व टीकवण्यासाठी त्यांना अधिक आक्रमक पवित्रा घ्यावा लागणार आहे. राज्यातील बारा जिल्ह्यांच्या मतदारांचा कौल पाहता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना आपल्या मुत्सद्दीपणाची आणि तळागाळातील ताकदीची ‘अग्निपरीक्षा’च द्यावी लागणार हे निश्चित आहे.

