अनैतिक देहव्यापारा विरोधात अपर अधिक्षकांचा गर्भित इशारा! मालकाला सहआरोपी करण्यासह लॉजही ‘सील’; जिल्ह्यातील लॉज चालकांचे धाबे दणाणले..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
पूर्वीच्या कारवायानंतरही लॉज मालकाच्या अनैतिक वृत्तीत बदल होत नसल्याने अखेर अपर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी कायद्याचे वज्रास्त्र उगारले आहे. त्याचा पहिला दणका श्रीरामपूरमधील सालस नाव धारण करुन त्या नावालाच बट्टा लावण्याचा अव्याहत उद्योग सुरु असलेल्या ‘आदर्श लॉज’ला बसला आहे. यापूर्वी तिनवेळा पोलिसांकडून कारवाई झाल्यानंतरही मंगळवारी (ता.10) दुपारी पुन्हा या लॉजवर अनैतिक कृत्य आढळून आल्याने पोलिसांनी लॉजचा व्यवस्थापक धिरज प्रमोद बिंगले याला ताब्यात घेतले. गोंधळाचा फायदा घेत त्याचा साथीदार अहमद शेख घटनास्थळावरुन पसार झाला. यावेळी केलेल्या तपासणीत लॉजमधून तिघींची सुटकाही करण्यात आली. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी अनैतिक देहव्यापारास प्रतिबंध करणार्‍या कायद्यान्वये व्यवस्थापक, त्याचा पसार साथीदार आणि लॉजच्या मालकासह सहाजणांवर गुन्हा दाखल केला आहे. श्रीरामपूर पोलिसांनी जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव सादर करुन सदरील लॉजचा परवाना रद्द करण्याची विनंती केली होती, त्यानुसार श्रीरामपूरच्या उपविभागीय अधिकार्‍यांनी अधिनियमाच्या कलम 18 अन्वये ‘लॉज का जप्त करण्यात येवू नये?’ अशी नोटीस बजावली होती, त्यावर संबंधिताकडून कोणतेही उत्तर प्राप्त न झाल्याने श्रीरामपूरातील रंगोली रोडवर असलेल्या ‘आदर्श लॉज’चा परवाना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आला असून पोलिसांनी लॉजला ‘सील’ही ठोकले आहे. या कारवाईने केवळ श्रीरामपूरच नव्हेतर संपूर्ण जिल्ह्यातील लॉज चालकांचे धाबे दणाणले आहेत.


पूर्वाश्रमी संगमनेरच्या पोलीस उपाधिक्षकपदी कार्यरत असताना सोमनाथ वाघचौरे यांनी संगमनेर-अकोल्यातील ‘कॅफे’च्या नावाखाली अल्पवयीन मुला-मुलींना अश्‍लिल चाळे करण्यासाठी प्रवृत्त करणार्‍या ठिकाणांविरोधात एल्गार पुकारला होता. त्यांच्या येथील कार्यकाळात अशा ‘कॅफे’त घडलेल्या बलात्कार, विनयभंग व बाल लैंगिक अत्याचाराच्या (पोक्सो) घटनांमध्ये थेट कॅफेच्या चालकासह त्यांनी जागा मालकालाही सहआरोपी करुन गजाआड घालण्यास सुरुवात केल्याने या दोन्ही तालुक्यांमध्ये ‘कॅफे’च्या गोंडस नावाखाली सुरु झालेली ही अश्‍लिल चाळ्यांची केंद्र नियंत्रणात आली. त्यावेळी शहरात कॅफेसाठी जागा भाड्याने देणार्‍या भल्याभल्यांना अनेक महिने कारागृहात खितपत पडावे लागले होते. त्यांचा हाच ‘पॅटर्न’ नंतर जिल्ह्यातील अन्य पोलीस ठाण्यांनीही वापरण्यास सुरुवात केल्याने मध्यंतरी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरु झालेल्या अशा प्रकारच्या कॅफे हाऊसला आता बर्‍यापैकी चाप लागला आहे.


एकीकडे कॅफेच्या माध्यमातून सुरु असलेल्या अशाप्रकारच्या अश्‍लिल केंद्रांवर नियंत्रण आलेले असताना दुसरीकडे मात्र त्याचा पूर्ण गैरफायदा घेत जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यांमधील ‘काही’ लॉजचालकांनी ठराविक वेळासाठी खोल्या उपलब्ध करुन देण्यासह थेट समाजातील असाहाय्य, निराधार व गोरगरीब महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून अनैतिक देहव्यापार करण्यास सुरुवात केली आहे. संगमनेरसह अनेक ठिकाणी वर्दळीच्या भागात असलेल्या काही लॉजमध्ये सर्रासपणे अल्पवयीन मुला-मुलींसह अशाप्रकारचे अनैतिक कृत्य करणार्‍यांना ताशी हजार/पाचशे रुपये दराने लॉजमधील खोल्या देण्यास सुरुवात झाल्याने जिल्ह्यातील सर्वच शहरांमध्ये अशाप्रकारचा अनैतिक उद्योग सुरु आहे. अनेकवेळा त्याला स्थानिक पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचेही पाठबळ असल्याच्या चर्चा यापूर्वी नेहमीच समोर आल्या आहेत. संगमनेरातील बसस्थानक परिसरासह अन्य भागातील काही ठिकाणी देखील हा प्रकार आजही सुरु आहे.


अशातच श्रीरामपूरचे अपर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी मात्र ‘कॅफे’च्या धर्तीवर आता अशा ‘लॉज’वर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी त्यांनी अशाप्रकारचे अनैतिक उद्योग करणार्‍या ठिकाणांची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली असून श्रीरामपूर उपविभागात समावीष्ट असलेल्या तालुक्यांमध्ये त्यांची पथकेही कार्यरत झाली आहेत. त्यातूनच मंगळवारी (ता.10) त्यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, उपनिरीक्षक दीपक मेढे व दादाभाई मगरे यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल आजीनाथ आंधळे, अंबादास आंधळे, सचिन दुकले, अमोल पडोळे, अमोल गायकवाड, मच्छिंद्र कातखडे व महिला पोलीस कॉन्स्टेबल मीरा सरग यांच्या पथकाने श्रीरामपूर शहरातील वॉर्ड क्रमांक पाचमधील रंगोली रस्त्यावर असलेल्या ‘कुप्रसिद्ध’ आदर्श लॉजवर छापा घातला.


यावेळी गदारोळाचा फायदा घेत अहमद शेख हा आरोपी पोलिसांना हुलकाणी देवून तेथून पसार झाला. पोलिसांनी लॉजचा व्यवस्थापक धिरज प्रमोद बिंगले (वय 35, रा.रंगोली रोड, वॉर्ड नं.5) याला ताब्यात घेवून लॉजची तपासणी केली असता तीन पीडित महिला आढळून आल्या. त्यांच्याकडे विचारणा केली असता संबंधितानी असाहय्यतेचा फायदा घेत पैशांचे आमिष दाखवून सदरचे कृत्य करण्यास भाग पाडल्याचे त्या तिघींनी पोलिसांना सांगितले. धक्कादायक म्हणजे या लॉजवर यापूर्वी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये व त्यापूर्वी जानेवारी 2024 मध्येही छापा घालून कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी सदरील लॉजमालकाच्या अनैतिक प्रवृत्तीत बदल होत नसल्याचा ठपका ठेवून श्रीरामपूरातील ‘आदर्श’ या सालस नावाने सुरु असलेल्या या अनैतिक लॉजचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला होता, त्यावरील कारवाई श्रीरामपूरच्या उपविभागीय अधिकार्‍यांकडे सोपवण्यात आली होती.


त्यानुसार त्यांनी आदर्श लॉजच्या मालकाला ‘आपले लॉज जप्त का करण्यात येवू नये?’अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस बजावून त्याचे उत्तर मागवले होते. मात्र आपली संपूर्ण काळी बाजू झाकण्यात लॉजमालकाला अपयश आल्याने त्यांनी स्त्रिया व मुलींच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध करणार्‍या अधिनियमातील कलम 18 अन्वये कारवाईचे वज्रास्त्र उगारुन सदरील लॉजचा परवाना वर्षभरासाठी निलंबित करण्याचे आदेश दिले. पोलिसांनीही छाप्यासोबतच आदर्श लॉजला लागलीच ‘सील’ ठोकण्याची कारवाई देखील पूर्ण केली आहे. अनैतिक व्यवसाय करणार्‍या एखाद्या लॉज अथवा ठिकाणच्या चालकासह त्याच्या जागामालकाला सहआरोपी करण्यासह संबंधित ठिकाण ‘सील’ करण्याच्या या धडाकेबाज कारवाईने श्रीरामपूर उपविभागातील लॉज चालकांमध्ये धडकी भरली असून अशाप्रकारे अनैतिक पैसा कमावणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.


संगमनेरच्या पोलीस उपअधिक्षकपदी कार्यरत असताना सोमनाथ वाघचौरे यांनी अश्‍लिल चाळे करण्यास प्रवृत्त करणार्‍या ‘कॅफे’ चालकांविरोधात धडक कारवाई केली होती. त्याच्या धाकाने शहरासह जिल्ह्यातील अशी अनेक केंद्र कायमस्वरुपी बंदही झाली. आता श्रीरामपूरच्या अपर अधिक्षकपदी कार्यरत झाल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा उपविभागातील अनैतिक कृत्य करणार्‍या लॉजकडे वळवल्याने लॉज चालकांचे धाबे दणाणले आहेत. संगमनेर बसस्थानकाच्या परिसरासह आसपासच्या भागात असलेल्या ‘काही’ लॉजमध्येही अशाप्रकारच्या कृत्यांसह अल्पवयीन मुला-मुलींना खोल्या उपलब्ध करुन दिल्या जातात. अपर अधिक्षक वाघचौरे यांनी यापूर्वी संगमनेरात काम केलेले असल्याने त्यांना अशी सर्व ठिकाणं परिचितं आहेत, त्यातच त्यांनी कारवाईसाठी आपले स्वतंत्र पथकही स्थापन केल्याने संगमनेरात अनैतिक कृत्य करणार्‍यांची पाचावर धारणा बसली आहे.


श्रीरामपूर उपविभागातील कोणत्याही लॉज, हॉटेल अथवा कॅफेमध्ये अशाप्रकारचे अनैतिक उद्योग सुरु असतील तर पोलिसांकडून त्या विरोधात अतिशय कठोर कारवाई केली जाईल. लॉजमालकांनी कोणत्याही स्थितीत ओळखपत्र पडताळून वैध असलेल्या प्रवाशांनाच आपल्या लॉजमधील खोल्या उपलब्ध करुन द्याव्यात. नियम डावलून कोणी गैरकृत्य करताना आढळल्यास अशा कारवायांमध्ये संबंधित लॉजच्या चालकासह मालकांनाही कायदेशीर प्रक्रियेचा सामना करावा लागेल. उपविभागातील अनैतिक व्यापारावर पूर्णतः प्रतिबंध लावण्यासाठी विशेष पथकाकडून छापेमारी सुरु असून स्थानिक पोलिसांनाही नियमित तपासण्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सोमनाथ वाघचौरे
अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर

Visits: 3 Today: 3 Total: 1450004

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *