खेडकरांच्या कार्यक्रमात थोरातांवर राजकीय सुमने! डॉ.रावसाहेब कसबेंचे भाषण चर्चेत; विद्यमान सरकार कलेबाबत ‘अज्ञानी’ असल्याचीही टीका..


श्याम तिवारी, संगमनेर
महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे भोई, कलाभूषण रघुवीर खेडकर यांना केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केल्याने आमदार सत्यजीत तांबे यांच्या पुढाकारातून रविवारी संगमनेरात त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या ज्येष्ठ साहित्यिक डॉ.रावसाहेब कसबे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना तमाशाच्या आडून राज्यसरकारवर आसूड ओढले. यावेळी त्यांनी सरकारला कलेबाबत ‘अज्ञानी’ संबोधताना कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बसलेल्या माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करीत त्यांच्यावर राजकीय सुमनांची उधळणही केली. सांस्कृतिक कार्यक्रमात झालेल्या या राजकीय भाषणाने वातावरणातील माहौल बदलला, त्या ओघातच त्यांनी दिवंगत भाऊसाहेब थोरात यांनी संगमनेरनगरी उभी केली, त्याची परंपरा बाळासाहेबांनी चालवली आणि आता तोच वारसा सत्यजीत पुढे घेवून जात असल्याचे सांगताना थोरातांच्या राजकीय वारसदाराचीही घोषणा करुन टाकली. त्यामुळे हा कार्यक्रम पद्मश्री रघुवीर खेडकरांच्या सन्मानासाठी झाला असला तरीही चर्चा मात्र डॉ.कसबे यांच्या भाषणाचीच झाली.


मूळच्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेडच्या मात्र संगमनेरात आश्रय घेवून कलाभूषण तुकाराम खेडकर यांचा आई कांताबाई सातारकर यांच्याकडून आलेला लोककलेचा समृद्ध वारसा पुढे नेणार्‍या कलाभूषण रघुवीर खेडकर यांना केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर करुन त्यांच्या कलेच्याप्रती अविरत सेवेचा सन्मान केला. त्या निमित्ताने संगमनेर कर्मभूमी मानून राज्यभर गावाचे नाव पोहोचवणार्‍या या लोककलावंताचा जाहीर नागरी सत्कार व्हावा यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी पुढाकार घेत रविवारी (ता.8) पालिकेच्या कवी अनंत फंदी नाट्यगृहात शानदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ साहित्यिक डॉ.रावसाहेब कसबे आणि शहरातील अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पद्मश्री खेडकर यांचा संगमनेरकरांच्यावतीने लोकसन्मान करण्यात आला.


याप्रसंगी डॉ.रावसाहेब कसबे यांच्याकडून महाराष्ट्राच्या या अस्सल लोककलेबाबत, त्याच्या अंतरंगाबाबत आणि लोककलेचा अव्याहत वारसा जोपासणार्‍या कलावंतांच्या आजच्या संघर्षाबाबत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन होईल अशीच उपस्थित श्रोत्यांना अपेक्षा होती. मात्र आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी पद्मश्री खेडकरांऐवजी ‘काही वर्षातच मुख्यमंत्र्यांची गाडी संगमनेरात सायरन वाजवत येईल आणि तिच्यात बाळासाहेब थोरात बसलेले असतील’ असे सांगत त्यांच्या पूर्वीच्या वक्त्यांनी आपल्या उद्बोधातून निर्माण केलेल्या सांस्कृतिक वातावरणाचा एकदम माहौलच बदलून टाकला. आपल्या सतरा मिनिटांतील भाषणात जवळजवळ दहा मिनिटे राजकीय भाष्य करणार्‍या प्रा.डॉ.रावसाहेब कसबे यांनी राज्य सरकारला लोककलेबाबत ‘अज्ञानी’ संबोधताना त्यांच्या धोरणांवर आसूडही ओढले.


यावेळी बोलताना त्यांनी मंचावर उपस्थित असलेल्या प्रा.एस.झेड्.देशमुख यांच्या व आपल्या गावाला शिव नसून दोन्ही गावे एकच मानली जातात असे सांगत त्यांच्याशी भावनिक नाळ जोडली, तर श्रीमंत माणसं साधारण उद्धट असतात, मात्र उद्योगपती राजेश आणि डॉ.संजय मालपाणी यांच्या इतक्या नम्र व्यक्ति आपण आजवर पाहील्या नसल्याचे सांगून त्यांचा संगमनेरभूषण असा गौरवपूर्ण उल्लेखही केला. डॉ.सोमनाथ मुटकुळे यांना नाट्यवेडा सांगत कलेसाठी त्यांनी केलेल्या वेडेपणाचे किस्से सांगून त्यांनी माजी नगराध्यक्षा दूर्गा तांबे यांच्या काळात झालेल्या विकासाचे दाखले देत त्यांच्यावरही कौतुकाची फुले उधळली. दूर्गाताईंच्या उल्लेखासोबतच त्यांना मूळ कार्यक्रमाचे स्मरण झाल्याने दिवंगत कांताबाई सातारकरांचा आपली बहिण असल्याचा उल्लेख करीत त्यांनी आख्यानकार शाहीर विठ्ठल उमाप यांच्या आठवणींनाही उजाळा दिला.


यानंतर पुन्हा राजकीय वळण घेत डॉ.कसबे यांनी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी संगमनेरनगरी उभी केली आणि बाळासाहेब थोरात यांनी त्याची समर्थ परंपरा चालवल्याचे सांगत या सगळ्यांचा खरा वारसदार आमदार सत्यजीत तांबे असल्याची घोषणाही करुन टाकली. यावेळी भूतकाळात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या ‘एका’ कार्यक्रमाचा दाखला देत त्यांनी आपण त्यावेळी लहान असलेल्या सत्यजीत तांबे यांचा ‘मुका’ घेतल्याची आठवण श्रोत्यांना सांगितली. आपल्या भाषणातील निम्म्याहून अधिकवेळ राजकीय भाष्य केल्यानंतर मूळ विषयावर बोलताना त्यांनी तमाशा महाराष्ट्रातील मनोरंजनाचे साधन आहे आणि याच तमाशाने समाजाचे प्रभावीपणे प्रबोधन केल्याचे सांगितले. दादा इंदुरीकरांच्या फडाला आग लावण्याच्या घटनेचा उल्लेख करीत त्यांनी घटनेनंतर दीड महिना त्यांच्यासह शंकर व प्रभा शिवणेकर यांना आपल्या खोलीत आश्रयाला ठेवल्याचा प्रसंगही सांगितला.


तमाशा कलावंताच्या डोक्यात पैसा नसतो, तर कला असते असे समर्पित भाव व्यक्त करताना भाचा म्हणून लाभलेल्या कलाभूषण रघुवीर खेडकर यांचे भरभरुन कौतुकही केले. असा भाचा ‘जन्मोजन्मी’ मिळावा असा पुनःजन्मावर विश्‍वास ठेवणारा शब्दप्रयोग करीत त्यांनी रंगमंचावर राजाची भूमिका साकारणार्‍या तमाशा कलावंताला रात्री दोन घास खाऊन तंबूत कशाप्रकारे झोपावे लागते याचे कथन करुन त्यांनी तमाशा कलावंतांच्या व्यथाही मांडल्या. नेहमीच उपेक्षित राहीलेल्या या कलाकारांसाठी राज्य शासनाने एखादी योजना जाहीर करण्याची अपेक्षा व्यक्त करताना त्याद्वारे केवळ पुरस्कारच नव्हेतर त्यांच्या तहहयात जीवनातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज मांडताना त्यांनी पुन्हा आपल्या शब्दांना राजकीय वळण दिले.


याच योजनेचा धागा पकडून डॉ.कसबे यांनी ‘बाळासाहेब’ सरकारमध्ये नाहीत, पण ते लवकरच सरकारमध्ये येतील. त्याचवेळी या गोष्टी घडतील असे सांगत सध्याच्या राज्य सरकारला ‘कला’ नावाची गोष्टच ‘कळत’ नसल्याची टीका करुन सरकारला कलेबाबतच अज्ञानी जाहीर केले. थोरात मंत्री होतील, त्यानंतर आपण काहीजण मुंबईत जावून त्यांची भेट घेवू व तमाशा कलावंतांचे प्रश्‍न सोडवू असा कल्पनाविलास मांडून त्यांनी पुन्हा तमाशाकडे वळण घेतले. पठ्ठे बापूराव व संगमनेरच्या पवळा हिवरगांवकर यांच्या जीवनातील काही प्रसंगांवर झोत टाकतांना त्यांनी तमाशा सामाजिक क्रांती घडवण्यात अग्रेसर असल्याचे सांगत देव आणि भाषा लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कामही तमाशाने केल्याचा टोमणाही दिला. हा कार्यक्रम अतिशय दिमाखदारपणे झाला, विविध श्रोत्यांनी पद्मश्री रघुवीर खेडकर, दिवंगत कांताबाई सातारकार यांच्या कलेचे आणि त्याप्रति त्यांच्या योगदानाचे भरभरुन कौतुकही केले, मात्र चर्चा झाली ती ज्येष्ठ साहित्यिक डॉ.रावसाहेब कसबे यांच्या याच सतरा मिनिटांच्या भाषणाची. सोशल माध्यमात त्यावरुन वेगवेगळ्या विचारांनाही मोठी चालना मिळाली आहे.


दिवंगत कांताबाई सातारकर व पद्मश्री रघुवीर खेडकर यांची कर्मभूमी असलेल्या संगमनेरच्या रहिवाशांकडून त्यांचा नागरी सन्मान व्हावा या हेतूने आमदार सत्यजीत तांबे यांनी कोणताही राजकीय अभिनिवेश न बाळगता या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मंचावर उपस्थित असलेल्या पाहुण्यांवरुनही त्यांची प्रामाणिक भावना दिसून येत होती. त्यामुळे या कार्यक्रमाला संगमनेरकरांची मोठी उपस्थितीही लाभली होती. अशावेळी सर्व वक्त्यांसह ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक असलेल्या प्रा.डॉ.रावसाहेब कसबे यांच्याकडून श्रोत्यांना महाराष्ट्राच्या या लोककलेचे अंतरंग उलगडले जाण्याची, तमाशा कलावंतांची सद्यस्थिती आणि पद्मश्री खेडकर यांच्या जीवनातील संघर्ष श्रवण्याची अपेक्षा असताना त्यांनी आपल्या भाषणाचा संपूर्ण ‘फोकस’ माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मुख्यमंत्रीपदासह त्यांच्या राजकीय वारसदारावर केंद्रीत केल्याने सांकृतिक म्हणून आयोजित या कार्यक्रमाला राजकीय झालर लागली.

Visits: 3 Today: 3 Total: 1446452

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *