बड्या राजकीय नेत्याच्या निकटवर्तीयाला ‘हनी ट्रॅप’चा विळखा! लाखांची उसनवारी की इज्जतीची सुपारी?; दुधाच्या ‘फॅट’सोबत वाढला ‘इश्काचा’ ताप..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
सहकार चळवळीचे माहेरघर आणि संयमी राजकारणासाठी ओळखल्या जाणार्‍या संगमनेर तालुक्यात सध्या एका ‘नाजूक’ प्रकरणाने बोचर्‍या थंडीतही वातावरणातील ताप वाढवला आहे. या प्रकरणात एका 27 वर्षीय विवाहितेने 55 वर्षाच्या डेअरी चालकालाच प्रेमपाशात ओढून त्याला लाखोंना गंडवल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. या प्रकरणात त्या ‘हनी’च्या बेडीत अडकणार्‍या अधेड वयाच्या गृहस्थाचा संबंध थेट एका बड्या राजकीय नेत्याच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचत असल्याने या प्रकरणाला राजकीय वळण मिळण्याचीही शक्यता आहे. संगमनेर शहरापासून अवघ्या 15 किलोमीटरच्या परिघात घडल्याची चर्चा असलेले हे धक्कादायक प्रकरण केवळ वासनेपुरते मर्यादित नसून, त्यामागे ‘उसनवारी’ आणि ‘ब्लॅकमेलिंग’चे मोठे अर्थकारण असल्याचेही समोर येत असल्याने हे प्रकरण घडले की घडवले गेले अशीही दबकी चर्चा सुरु आहे.


तालुक्याच्या पूर्वेकडील भागातील दोन गावांचा संबंध येणार्‍या दूध डेअरीत सदरचा प्रकार घडल्याची ही चर्चा आहे. या प्रकरणातील सर्वात खळबळजनक बाब म्हणजे, ज्या 55 वर्षीय डेअरी चालकाला त्या 27 वर्षीय ‘हनी’ने प्रेमपाशात ओढले ती व्यक्ती तालुक्यातील एका वजनदार राजकीय नेत्याच्या वलयातील असल्याचेही बोलले जात आहे. याच राजकीय संबंधांमुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून, सदरचे प्रकरण दाबण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याचीही चर्चा आहे.


या प्रकरणाची दुसरी बाजू पडताळण्याचा प्रयत्न केला असता संबंधित 27 वर्षीय ‘हनी’ने काही महिन्यांपूर्वी घरगुती अडचणीचे कारण सांगून ‘त्या’ डेअरी चालकाकडून काही लाख रुपयांची ‘उसनवारी’ (कर्ज) घेतली होती. या पैशांची परतफेड करण्याची वेळ आली, तेव्हा या महिलेने आपल्या सौंदर्याचा आणि जवळीकीचा वापर करुन ‘हनी ट्रॅप’ची खेळी रचल्याची चर्चा आहे. जेव्हा डेअरी चालकाने आपल्या पैशांची मागणी केली, तेव्हा संबंधित महिलेने पैशांऐवजी त्याच्याशी जवळीक साधून ‘त्या’ नाजूक प्रसंगाचे मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रण केले. त्यानंतर पूर्वी घेतलेले पैसे मागितले तर, व्हिडिओ व्हायरल करील, अशी धमकी देत तिने थेट डेअरी चालकाच्या चारित्र्यावरच शिंतोडे उडवण्याचे षडयंत्र रचले. त्यामुळे हा प्रकार प्रेमप्रकरण आहे की पैशांसाठी रचलेला कट, अशी शंका निर्माण झाली आहे.


या महिलेने दोघांमधील ‘नाजूक’ क्षणांचे अतिशय शिताफीने चित्रण केल्याची चर्चा असून त्या आधारे आता ती संबंधित व्यक्तीला ‘ब्लॅकमेल’ करीत आहे. संगमनेर शहराच्या अगदी जवळ असलेल्या ग्रामीण भागात हा प्रकार घडला असून त्याची चर्चा आता तालुकाभर पसरली आहे. या प्रकरणातील डेअरीचालक राजकीय व्यक्तिशी संबंधित असल्याने ‘त्या’ हनीने सदरचा प्रकार स्वतःच्या आर्थिक हितासाठी केला की, तिच्याकडून कोणी जाणीवपूर्वक घडवून घेतला हे येणारा काळच सांगणार असला तरीही ‘इश्काच्या’ या प्रकरणाने फेब्रुवारीच्या बोचर्‍या थंडीतील संगमनेर तालुक्याचे वातावरण मात्र चांगलेच तापवले आहे.


संगमनेर तालुक्याच्या पूर्वेकडील भागात घडलेले हे प्रकरण सध्या नाजूक वळणावर आहे. एका बाजूला ‘सभ्य’ समजल्या जाणार्‍या व्यक्तीचा लंपटपणा चव्हाट्यावर येण्याची भीती आहे, तर दुसर्‍या बाजूला एका महिलेने कर्जाच्या वसुलीपासून वाचण्यासाठी रचलेला हा भयानक सापळा असण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही. मात्र सदरचे प्रकरण अद्यापही पोलिसांच्या दप्तरापासून दूर असल्याने या प्रकरणातून निर्माण होणार्‍या प्रश्‍नांची कोणतीही उत्तरे नाहीत. परंतु, या ‘धुसमुसत्या’ प्रकरणाने भविष्यातील मोठ्या राजकीय वादळाची नांदी दिली आहे, हे मात्र निश्‍चित!

Visits: 6 Today: 6 Total: 1442341

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *