एकाच विषयावर व्यंगचित्राचे पुस्तक काढणे कौतुकास्पद ः पंडित अरविंद गाडेकर लिखीत ‘सासू व्हर्सेस सून’ पुस्तकाचे प्रकाशन


नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘सासू व्हर्सेस सून’ ह्या व्यंगचित्र पुस्तकात अनेक विनोदी प्रसंग आणि मार्मिक टिपण्णी व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांनी केली आहे. एकाच विषयावर व्यंगचित्राचे पुस्तक काढणे खरोखरच हे कौतुकास्पद आहे. हे पुस्तक अतिशय चांगले व वाचनीय आहे, असे उद्गार महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्यंगचित्रकार चारुहास पंडित यांनी काढले.

संगमनेर साहित्य परिषद तर्फे व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांच्या ‘सासू व्हर्सेस सून’ या व्यंगचित्र पुस्तकाचा प्रकाशन सोहळा के. बी. (दादा) देशमुख सभागृहात झाला. याप्रसंगी दुर्गा तांबे, अनिल देशपांडे, डॉ. संतोष खेडलेकर, मैथिली तांबे आदी प्रमुख अतिथी उपस्थित होते.

याप्रसंगी प्रमुख अतिथी दुर्गा तांबे म्हणाल्या, दहा वर्षापूर्वी जगविख्यात व्यंगचित्रकार स्वर्गवासी आर. के. लक्ष्मण यांनी अरविंद गाडेकर यांची चित्रे पाहिली आणि त्यांनी गाडेकरांचे कौतुक केले. व्यंगचित्रकलेत नवीन पिढी तयार झाली याचे आर. के. लक्ष्मण यांना समाधान वाटले. तसेच अनिल देशपांडे म्हणाले, व्यंगचित्रकार हे बोटांचे जादुगार आहेत. त्यांच्या बोटातून उतरलेले चित्र सामाजिक व राजकीय चमत्कार दाखवतात. डॉ. संतोष खेडलेकर म्हणाले, संगमनेर कला क्षेत्रात अनेकांनी महाराष्ट्रात ठसा उमटविलेला आहे. परंतु व्यंगचित्र कलेत ठसा उमटविणारे गाडेकर हे एकमेव आहेत.

व्यंगचित्र म्हणजे मानवी जीवनातल्या विसंगतीवरचं सहृदय भाष्य आहे. ते रेषेतून आणि मोजक्या काही शब्दांतून मांडून लोकांच्या चेहर्‍यावर हास्य फुलविण्यासाठी ‘सासू व्हर्सेस सून’ हे माझे व्यंगचित्र पुस्तक आहे, अशी प्रतिक्रिया लेखक अरविंद गाडेकर यांनी दिली. प्रास्ताविक किसन हासे यांनी केले. याप्रसंगी पुष्पा निर्‍हाळी (सासू) आणि सुप्रिया गवांदे (सून)ची भूमिका साकारून सादर केलेल्या नाटिकेस उपस्थितांनी दाद दिली. सूत्रसंचलन संज्योत वैद्य यांनी केले. आभार प्राचार्य मुकुंद डांगे यांनी मानले. या पुस्तक प्रकाशनास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Visits: 170 Today: 6 Total: 2016304

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *