सोशल मीडियावरील ‘शेर’ आता कोठडीत ‘ढेर’! संगमनेर पोलिसांचा ‘नाशिक पॅटर्न’; कोयता भाईच्या ठेचल्या नांग्या..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
आजच्या काळात माणसाला ऑक्सिजन मिळाला नाही तरी चालेल, पण दिवसाकाठी चार-पाच ‘रिल्स’ आणि त्यावर काही ‘लाईक्स’ मिळाले नाहीत, तर त्याला जगणे व्यर्थ वाटू लागते. या रिल्समधून कोणी डान्स करतो, कोणी गातो, तर कोणाला अचानक आपल्यात ‘सुलतान’ किंवा ‘पुष्पा’ शिरल्याचा भास होतो. असाच काहीसा साक्षात्कारी अनुभव संगमनेर खुर्दच्या एका महाभागाला, म्हणजेच फारुक शेखला आला. पण दुर्दैवाने, त्याने निवडलेला मार्ग ‘अभिनयाचा’ नसून ‘कोयता प्रदर्शनाचा’ होता. परिणामी, पोलिसांनी त्याला असा काही ‘लाईक’ दिला की, आता भाईला रिल्सची नाही तर, जामिनाची काळजी लागली आहे.


त्याचं झालं असं की, गेल्यावर्षी 30 नोव्हेंबरच्या रात्री, जेव्हा सामान्य जनता गुलाबी थंडीत निद्रीस्त होती, तेव्हा हा फारुकभाई चंद्रशेखर चौकात दुचाकीवर स्वार होऊन ‘सिनेमॅटिक एन्ट्री’ घेत होता. एका हातात दुचाकीचे हँडल आणि दुसर्‍या हातात चकाकणारा ‘कोयता’!, सोबत दारूची नशा आणि बॅकग्राउंडला एखादे धमकावणारे गाणे. भाईंना वाटले आपण ‘गँग्स ऑफ वासेपूर’चे हिरो आहोत. पण त्याला हे ठाऊक नव्हते की, पडद्यावरचा हिरो आणि रस्त्यावरचा ‘झिरो’ यात केवळ एका पोलीस व्हॅनचा फरक असतो.


सोशल मीडियावर दहशत निर्माण करून चार-दोन ‘गल्लीतले गुंड’ गोळा करायचे आणि स्वतःला ‘डॉन’ समजायचे, हा आजकालचा नवा ट्रेंड झाला आहे. यालाच आपण ‘डिजिटल दहशतवाद’ म्हणू शकतो. पण या डिजिटल वाघांची शिकार करण्यासाठी आता पोलीसही ‘सायबर शिकारी’ झाले आहेत. नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी सुरु केलेला ‘नाशिक पॅटर्न’ सध्या गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. जो रिल्सवर दादागिरी करेल, त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणून ‘कायद्याचा बालेकिल्ला’ दाखवायचा, हाच तो पॅटर्न!.


संगमनेर पोलिसांनीही याच धर्तीवर ‘ऑपरेशन रिल्स’ राबवले आहे. गुरुवारी (ता.5) सकाळी उपनिरीक्षक श्रीकांत सावंत सोशल मीडियाची ‘सफर’ करत होते, तेव्हा त्यांना फारुकभाईचा ‘तो’ जुना पण ‘झणझणीत’ व्हिडिओ दिसला. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता तांत्रिक जाळे विणले. ज्या मोबाईलवरुन रिल्स बनवले, त्याच मोबाईलच्या लोकेशनने भाईचा घात केला. पोलिसांनी त्याला त्याच्या राहत्या घरातून अशा पद्धतीने उचलले की, भाईला ‘रिटेक’ घेण्याचीही संधी मिळाली नाही.


या कारवाईनंतर शहरातील इतर ‘भावी भाई’ आणि ‘रिलस्टार’ यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. जे कालपर्यंत हातात लाठ्या-काठ्या घेऊन रिल्स बनवत होते, त्यांनी आता घाबरुन आपले प्रोफाईल ‘प्रायव्हेट’ करायला सुरुवात केली आहे. काहींनी तर थेट मोबाईलच स्विच ऑफ करून ठेवला आहे. गेल्याकाही दिवसांपासून नाशिक पोलिसांच्या धर्तीवर शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेकडूनही अशाप्रकारची धडक कारवाई सुरु झाली असून त्यावर सामान्य माणसांकडूनही ‘हवा करायला जाल, तर जेलची हवा खावी लागेल. कोयता हातात शोभत नाही, तो शेतातच बरा असतो’ अशाप्रकारच्या उत्स्फूर्त कमेंट येत आहेत.


या कारवाईतून पोलीस केवळ नाक्यावर नसतात, तर ते तुमच्या इन्स्टाग्रामच्या ‘एक्सप्लोर’ फीडमध्येही डोकावत असतात. शेवटी काय, तर ‘रील’ लाइफमधील ‘हिरो’ बनण्याच्या नादात ‘रिअल’ लाइफमधील ‘व्हिलन’ ठरु नका. या प्रकरणात संगमनेर पोलिसांनी संगमनेर खुर्दच्या फारुक इसहाक शेख या रिलस्टारला भारतीय हत्यार कायद्यानुसार ‘कायद्याचा प्रसाद’ दिला आहे. समाजात दहशत निर्माण करणार्‍या अशा ‘रिलबाज’ प्रवृत्तींना ठेचणे काळाची गरज आहे. पोलिसांनी केलेला हा ‘डिजिटल स्ट्राईक’ नक्कीच कौतुकास्पद आहे. यामुळे किमान काहीकाळ तरी सोशल माध्यमावरील कचरा आणि दहशत कमी होईल.

Visits: 34 Today: 34 Total: 1442362

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *