संगमनेर शिवसेनेची धडाडती तोफ थंडावली! माजी नगरसेवक अप्पा केसेकर कालवश; हाडाचा निष्ठावान शिवसैनिक हरपला..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शिवसेनेचे पालिका सभागृहातील पहिले नगरसेवक, माजी उपजिल्हाप्रमुख कैलास उर्फ अप्पासाहेब केसेकर (वय 61) यांचे शुक्रवारी (ता.23) अल्पशा आजाराने निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मध्यंतरी उपचारांना प्रतिसाद देत त्यांनी घरी परतण्याची इच्छाही व्यक्त केल्याने त्यांच्या कुटुंबियांसह त्यांना मानणार्या मोठ्या वर्गाच्या आशा जागल्या होत्या. मात्र शुक्रवारी सकाळपासून अचानक त्यांची प्रकृती ढासळली आणि त्यातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अकस्मात निधनाने संगमनेरच्या शिवसेनेची धडाडती तोफ थंडावली असून संगमनेरकरांनी लढवय्या निष्ठावान शिवसैनिक गमावला आहे. त्यांच्या अकस्मात निधनाच्या वार्तेने संपूर्ण तालुक्यातून शोक व्यक्त केला जात आहे.
सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी भारावलेल्या अप्पा केसेकर नावाच्या तरुणाने नव्वदच्या दशकांत राजेंद्र जोर्वेकर, जयवंत पवार, रावसाहेब गुंजाळ, एकनाथ मेहेत्रे, कैलास वाकचौरे अशा कितीतरी ‘ज्ञात-अज्ञात’ सवंगड्यांसह संगमनेरात शिवसेनेच्या विचारांची पायाभरणी केली. शिवसेनेच्या शहरप्रमुखपदाची जबाबदारी खांद्यावर आल्यानंतर त्यांनी ठाकरेंचा विचार तरुणांच्या नसानसात भरला. त्याचा परिणाम संगमनेरच्या राजकारणात पालिकेच्या माध्यमातून शिवसेनेचा प्रवेश झाला आणि पहिला नगरसेवक होण्याचा मानही त्यांनी मिळवला. सन 2000 पर्यंत त्यांचा हा झंझावात कायम होता. या दहा वर्षात त्यांच्या शहरप्रमुखपदाच्या काळात संगमनेरच्या शिवसेनेने सुवर्णकाळ बघितला. पालिकेतील विरोधी नगरसेवकांच्या संख्येतही त्याकाळात लक्षणीय वाढ झाली होती.
कडव्या हिंदूत्ववादी विचारांचा पाईक म्हणून ओळख असलेल्या अप्पा केसेकर यांना सर्वसामान्यांचा मसिहा म्हणूनही त्याकाळी ओळखले जायचे. त्यांच्याकडे काम घेवून येणार्या सर्वसामान्यांना कधीही निराशेने माघारी जावे लागले नाही. त्यातूनच संपूर्ण तालुक्यात त्यांचा चाहता वर्ग तयार झाला. त्यांची राजकीय उंची वाढत असतानाच संबंध नसलेल्या एका प्रकरणाशी त्यांचे नाते जोडून त्यांना तब्बल 38 दिवस विसापूरच्या कारागृहातही घालवावे लागले, तेथूनही ते सहीसलामत सुटून आले. त्यावेळी त्यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाई झाल्याची भावना सामान्यांमध्ये निर्माण झाल्याने शहरात मोठा रोषही निर्माण झाला होता. अप्पा केसेकर कारागृहात असताना शहरातील काही भागात ‘ये जंजीर अब जनताही तोडेगी’ अशा आशयाचा मजकूर असलेले फलकही लागले होते, त्यातून त्यांच्याविषयी लोकांच्या मनात असलेला आदरही अधोरेखीत झाला होता.
मात्र कारावासातून बाहेर पडल्यानंतर एकप्रकारे त्यांनी सक्रिय राजकारणातून हळुहळु माघार घेण्यास सुरुवात केली. या दरम्यान त्यांच्या हितशत्रूंच्या कारवायाही वाढल्याने शहरात शिवसेना रुजवण्यात सिंहाचा वाटा असलेल्या या ढाण्या वाघाला मनस्तापही सहन करावा लागला. मात्र सरसेनापतींच्या विचारांवरील निष्ठा कायम अढळ राहिल्याने त्यांनी अशा अनेक प्रसंगाना कडू घोट म्हणून गिळले. तब्बल दीड दशक सक्रिय राजकारणापासून अलिप्त राहिल्यानंतरही 2016 साली पक्षाने त्यांना पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली. कोणतेही प्रबळ आर्थिक पाठबळ नसतांनाही त्यांनी त्या निवडणुकीत दुसर्या क्रमांकाची मतं मिळवून जनमानसातील आपली प्रतिमा पुन्हा एकदा ठळक असल्याचे दाखवून दिले. त्यावेळी भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवली नसती तर कदाचित अप्पा केसेकर पालिकेच्या नगराध्यक्षपदी निवडून आले असते अशी त्यावेळी स्थिती असल्याचे आजही अनेकजण सांगतात.
वर्षभरापूर्वी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अमोल खताळ यांच्या प्रचारासाठी त्यांनी संपूर्ण मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला होता. गेल्या 26 नोव्हेंबररोजी त्यांच्याच पुढाकारातून जिर्णोद्धार झालेल्या साळीवाड्यातील खंडोबा देवस्थानमध्ये आयोजित चंपाषष्टी उत्सव मात्र त्यांच्या जीवावर बेतणारा ठरला. हृदय शस्त्रक्रिया झालेली असल्याने वैद्यकीय नियमांचे पालन आवश्यक असताना त्यांनी उत्साहाच्या भरात देवाची पालखी खांद्यावर घेतली आणि बेधुंद होवून उत्सव साजरा केला. या दरम्यान भंडार्याची प्रचंड उधळण झाल्याने त्याचा भपका बसून ते अत्यवस्थ झाले आणि जागीच कोसळले आणि त्यानंतर दोन महिन्यांच्या संगमनेर व पुणे येथील उपचारांनंतर अखेर शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
आज (ता.24) दुपारी चार वाजता त्यांच्यावर संगमनेर येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या निधनाने संगमनेर शिवसेनेचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या रुपाने धडाडती तोफ थंडावली आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण संगमनेर तालुका हळहळला असून त्यांच्या चाहत्यांनी रात्रीपासूनच त्यांच्या घरी गर्दी केली होती. आज सकाळी त्यांचे पार्थिव पुण्याहून संगमनेरला आणल्यानंतर शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंतिम दर्शन घेवून शोक व्यक्त केला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ, भावजया, पुतणे असा खूप मोठा परिवार आहे.
