ऊसतोड मजूर कामावर गेल्यानंतर चोरटे साधायचे डाव! बंटी-बबलीच्या कर्जत पोलिसांनी आवळल्या मुसक्या
नायक वृत्तसेवा, राहुरी
पोटाची खळगी भरण्यासाठी घरापासून शेकडो किलोमीटर दूर ऊस तोडणीच्या कामाला आलेले मजूर फडाजवळ कोप्या करून राहतात. मात्र त्यांच्या कष्टाच्या कमाईवर डल्ला मारण्याचा प्रकार होत असल्याचं कर्जत तालुक्यात उघडकीस आलं आहे. ऊस तोडणी मजुरांच्या कोप्या तोडून आतील धान्य चोरून नेणार्या बंटी-बबलीला पोलिसांनी पकडलं आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्ह्याची माहिती पुढे आली आहे. तसंच काही ठिकाणी त्यांनी धान्यासोबतच शेळ्याही चोरून नेल्याचं तपासात उघडकीस आलं आहे.
अमोल रमेश सुलताने (मूळ रा. किनखेड, ता. मूर्तिजापूर, जिल्हा अकोला, हल्ली रा. कनगर, ता. राहुरी) आणि त्याची पत्नी गीता अमोल सुलताने यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचे साथीदार सुनील सुभाष बर्डे, अनिल ऊर्फ भीमराज निकम (सर्व रा. राहुरी) यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली. सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. त्यासाठी विविध जिल्ह्यातून मजूर आले आहेत. उसाच्या फडाच्या परिसरात किंवा कारखान्याजवळ कोप्या बांधून मजूर राहतात. ते ऊस तोडणीला गेले की दिवसा कोप्यांवर कोणीच नसते. याचा गैरफायदा उठवत आरोपी गुन्हे करत होते. प्रचंड मेहनतीचे काम करून रोजी रोटी कमावणार्यांच्या अन्नधान्यावर डल्ला मारणार्या या चोरांच्या कृतीबद्दल संताप व्यक्त होत आहे.
कर्जत तालुक्यातील येसवडी गावच्या शिवारात ऊस तोडणीसाठी आलेल्या आप्पा धनंजय भिल्ल (रा. काकडदा ता. शहादा जि. नंदुरबार) या ऊसतोड मजुराच्या बंद कोपीचे कुलूप तोडून आरोपींनी कोपीतील शंभर किलो बाजरी चोरली. ही बाजरी आरोपी आपल्या कारमधून (एम.एच.42, ए.1411) घेऊन जात होते. मात्र, याची माहिती मिळाल्याने ग्रामस्थ आणि पोलीस सावध झाले. त्यांनी राशीनमध्ये या चोरांना अडविले. त्यांच्याकडे चोरीचा माल आढळून आला. त्यामुळे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी आणखी काही गुन्ह्यांची माहिती दिली. त्यांनी गणेशवाडी (ता. कर्जत) येथील दोन ठिकाणावरून शेळ्यांची चोरी केल्याचंही पोलिसांना सांगितले. आरोपी अमोल याच्यावर मूर्तिजापूर शहर आणि मूर्तिजापूर ग्रामीण याठिकाणी यापूर्वी 12 गुन्हे दाखल आहेत.