दागिने ओरबाडणार्या दोघांच्या आवळल्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेची श्रीरामपूर शहरात कारवाई
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
श्रीरामपूरसह अहमदनगर जिल्ह्यात चेन स्नॅचिंग तसेच इतर गुन्हे करणार्या दोघांना पोलिसांनी पकडले. त्यांनी आत्तापर्यंत 52 गुन्हे केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, त्यातील एकाकडून पोलिसांनी पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूर शहरात ही कारवाई केली आहे.
चेन स्नॅचिंगचे गुन्हे करणार्या गुन्हेगांराची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना दिल्या होत्या. या आदेशानुसार पोलीस निरीक्षक कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना अशा गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सहायक फौजदार भाऊसाहेब काळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयकुमार वेठेकर, बबन मखरे, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरदंले, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल आकाश काळे, मेघराज कोल्हे, चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल उमाकांत गावडे व चालक पोलीस नाईक भरत बुधवंत यांनी मिळून आरोपींची माहिती व शोध घेत होते.
यावेळी श्रीरामपूर येथील कंबर मिर्झा याने त्याच्या साथीदारांसह चेन स्नॅचिंग करून चोरलेले सोन्याचे दागिने श्रीरामपूर शहरातील श्रीरामपूर-पुणतांबा जाणारे रस्त्यावरील हॉटेल मिरावली येथे विक्री करण्यासाठी येणार आहे, अशी खात्रीशीर माहिती पोलीस निरीक्षक कटके यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाल्याने त्यांनी खात्री करून कारवाईच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी श्रीरामपूर येथे जाऊन हॉटेल मिरावली परिसरात सापळा लावला होता. थोड्याच वेळात एक व्यक्ती संशयित हालचाली करताना पथकास दिसून आल्याने पथकाने त्याला ताब्यात घेत पोलीस असल्याची ओळख सांगून त्याने कंबर रहीम मिर्झा (वय 35, रा. श्रीरामपूर) असे त्याचे नाव असल्याचे सांगितले.
यावेळी पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळील एका काळ्या रंगाच्या कापडी पिशवीत सोन्याचे दागिने मिळून आले. याबाबत त्यास विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचा साथीदार आयूब इराणी (रा. श्रीरामपूर) याच्यासोबत अहमदनगर, राहुरी, लोणी, व संगमनेर येथून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओढून चोरून आणले असून ते दागिने मोडीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. त्याने दिलेल्या कबुलीच्या अनुषंगाने अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख तपासले असता त्यांच्यावर एकूण 4 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. त्यात तोफखाना पोलीस स्टेशन गुरनं. 907/2022 भादंवि कलम 392, राहुरी 969/2022 भादंवि 392, 34, संगमनेर शहर 851/2022 भादंवि 392 व लोणी 497/2022 भादंवि 392, 34 या गुन्ह्याचा समावेश आहे. वरील गुन्ह्यात चोरी गेलेले एकूण 55 ग्रॅम वजनाचे सोन्याचे 2 लाख 75 हजार रुपये किंमतीचे दागिने कंबर रहीम मिर्झा (रा. श्रीरामपूर) याच्या ताब्यात मिळून आले. त्यामुळे त्याला लोणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
तसेच त्याच्या साथीदाराचा त्याच्या राहते घरी जाऊन शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेत त्याचे नाव गाव विचारले असता त्याने भुर्या उर्फ आयुब फैयाज इराणी (वय 50, रा. इराणी गल्ली, श्रीरामपूर) असे त्याचे नाव असल्याचे सांगितले. त्याच्याकडे वरील गुन्ह्यांबाबत विचारपूस केली असता त्याने कंबर मिर्झा याच्यासोबत गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यालाही लोणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास लोणी पोलीस करत आहे.