दिलासा..! उपचारांती बरे होण्याचा तालुक्याचा टक्का वाढला! चालू महिन्यात रुग्ण सापडण्याची गती निम्म्यावर आल्याने संगमनेरकरांना मोठा दिलासा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
ऑक्टोबर सरत आला तरीही रुग्णसंख्येतील घट कायम असल्याने तालुक्यातील कोविडचे संक्रमण आटोक्यात येत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. नागरिकांनी प्रशासकीय सूचनांना दिलेला प्रतिसाद आणि आरोग्य यंत्रणांनी जीव ओतून केलेले काम यामुळे रुग्णसंख्या घटण्यासोबतच तालुक्यातील बाधित रुग्ण बरे होण्याची सरासरीही तब्बल 96 टक्क्यांवर तर मृत्यूदर एक टक्क्याहूनही खाली आला आहे. मोठ्या रुग्णसंख्येचे धक्के झेलणार्या संगमनेरकरांसाठी हा सर्वात मोठा सुखद् धक्का आहे. मात्र या महामारीवरील इलाज अद्यापही दूरच असल्याने ‘जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं’ या तत्त्वाचे प्रत्येकाला पालन करावेच लागणार आहे.

संगमनेर तालुक्यातील 152 गावांसह संगमनेर शहरातून आजवर एकूण 4 हजार 65 रुग्ण समोर आले. त्यातील 1 हजार 157 रुग्ण संगमनेर शहरातील तर 2 हजार 908 रुग्ण ग्रामीणभागातील आहेत. एप्रिलमध्ये पहिल्यांदा आठ रुग्ण समोर आल्यानंतर कोविडने टप्प्याटप्प्याने तालुक्यात पाय पसरले. मे महिन्यात आठावरुन बाधितांचा आकडा 44 वर पोहोचला, म्हणजे महिन्याभरात 36 रुग्ण समोर आले. त्यानंतर जूनमध्ये 65, जुलैमध्ये थेट दहा पट वाढून 650 बाधितांची भर पडली. ऑगस्टमध्ये संक्रमणाचा वेग काहीसा मंदावला आणि सरासरीनुसार केवळ 961 रुग्णांची भर पडली. सप्टेंबरने मात्र अनपेक्षित उसळी घेतली आणि तालुक्याच्या रुग्णसंख्येत पहिल्यांदाच महिन्याभरात चार आकडी म्हणजे 1 हजार 529 रुग्णांची भर पडली. कोविडवरील लस अजूनही आपल्यापासून लांबच असल्याने रुग्णसंख्येचा हा आलेख या महिन्यातही असाच वाढत जाई असाच अंदाज होता, मात्र तो फोल ठरवून या महिन्याने संगमनेरकरांना आत्तापर्यंत तरी मोठा दिलासा दिला आहे.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पॉझिटिव्ह रुग्ण समोर येण्याची गती 25.25 टक्के, दुसर्या आठवड्यात 27.59 टक्के, तिसर्या आठवड्यात 28.49 टक्के व चौथ्या आठवड्यात 25.86 टक्के होती. ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात त्यात मोठी घट होवून ती 22.13 टक्क्यांवर आली. दुसर्या आठवड्यात 20.91 तर तिसर्या आठवड्यात 20.02 टक्के वेगाने रुग्ण समोर येत आहेत. हा दर शून्य टक्क्यांवर नेण्यासाठी आपण सर्वांनीच नियमांचे पालन करण्याची गरज आहे. कोविड विषयी सुरुवातीला असलेल्या धारणा गेल्या सहा महिन्यात बदललेल्या आपणास दिसल्या. त्याप्रमाणेच कोविड वयस्करांनाच होतो ही एक धारणा होती. आज प्राप्त झालेल्या आकडेवारीतून ती खोटी ठरली आहे. आजवर बाधित झालेल्या एकूण रुग्णसंख्येतील सर्वाधीक 756 रुग्णांचे वय 31 ते 40 च्या दरम्यानचे आहे तर 21 ते 30 वयोगटातील 690 तरण्याबांड तरुणांनाही कोविडने जखडले आहे.

त्या तुलनेत 61 ते 70 या ज्येष्ठ नागरिकांच्या वयमर्यादेत केवळ 438 रुग्ण, तर 71 ते 80 या वयोगटातील 40 आणि त्यापुढील केवळ चार रुग्ण आढळून आले आहेत. एक वर्षापेक्षा लहान वयाच्या अकरा जणांना, 1 ते 10 वर्ष वयोगटातील 207 बालकांनाही कोविडची लागण झाली आहे. आजवर अधिकृत नोंदविल्या गेलेल्या 40 कोविड मृत्यूमधील बारा जणांचे वय 51 ते 60 च्या दरम्यान होते. त्याखालोखाल 61 ते 70 वयोगटातील दहा, 71 ते 80 वयोगटातील आठ, 41 ते 50 वयोगटातील सहा जणांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय एकूण रुग्णसंख्या पाहता सर्वाधीक रुग्ण अहमदनगर महापालिकेच्या क्षेत्रात आहेत. तेथील 16 हजार 648 जणांना आजवर संक्रमण झाले आहे. त्याखालोखाल संगमनेर तालुक्याचा नंबर आहे. संगमनेरातून आजवर 4 हजार 65 रुग्ण समोर आले आहेत. राहाता तालुक्यातून 3 हजार 649, नगर तालुक्यातून 3 हजार 385, पाथडी तालुक्यातून 2 हजार 843, श्रीरामपूर तालुक्यातून 2 हजार 659, नेवासा तालुक्यातून 2 हजार 560, राहुरी तालुक्यातून 2 हजार 285, पारनेर तालुक्यातून 2 हजार 248, श्रीगोंदा तालुक्यातून 2 हजार 237, कोपरगाव तालुक्यातून 2 हजार 204, अकोले तालुक्यातून 2 हजार 163, जामखेड तालुक्यातून 2 हजार 87, कर्जत तालुक्यातून 1 हजार 755, अहमदनगरच्या लष्करी परिसरातून 897 तर लष्करी रुग्णालयातून 496 रुग्ण समोर आले आहेत.

ऑक्टोबरच्या प्रारंभापासून संगमनेरकरांना कोविडपासून काहीसा दिलासा मिळत आहे. गेल्या महिन्यात सरासरी दररोज 52 रुग्ण समोर येत होते. या महिन्यातील आत्तापर्यंतच्या 23 दिवसांचा विचार करता त्यात मोठी घट होवून आज सरासरी दररोज रुग्णसमोर येण्याचा वेग 35.48 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. गेल्या महिन्यात विस जणांचे बळी गेले होते. या महिन्यात आत्तापर्यंत प्रशासकीय माहितीप्रमाणे केवळ दोघांचे जीव गेले आहेत. तालुक्याची एकूण रुग्णसंख्या 4 हजार 65 असली तरी प्रत्यक्षात त्यातील केवळ 135 रुग्ण सक्रीय संक्रमित आहेत. आत्तापर्यंत तालुक्यातील 3 हजार 890 रुग्णांनी उपचार पूर्ण केले असून रुग्ण बरे होण्याचे तालुक्यातील प्रमाणाही आता 95.69 टक्क्यावर पोहोचले आहे.

अलगीकरणातूनही लढा सुरुच..
संगमनेरच्या कोविड लढ्याचे सेनापती सध्या कोविडग्रस्त असल्याने अलगीकरणात आहेत. मात्र त्यांचे सगळे चित्त संगमनेरातील कोविड लढ्यावर असल्याचे दिसून येत आहे. सामाजिक माध्यमावर दररोजच्या कार्यवाही साठी तयार केलेल्या समूहात अधिकारी व कर्मचार्यांना सूचना देण्यासह वरील विश्लेषणासाठी आवश्यक असलेली आकडेवारीही त्यांनीच उपलब्ध करुन दिली आहे. अधिकार्यांच्या निर्मितीतला खरा सार स्पष्ट करणारी त्यांची ही कृती अन्य अधिकारी व कर्मचार्यांसाठी निश्चितच आदर्शवत आहे.

