जितेंद्र आव्हाडांच्या टीकेला अण्णा हजारेंचं सडेतोड उत्तर! वकीलांशी चर्चा करुन अब्रुनुकसानीचा दावा करणार दाखल


नायक वृत्तसेवा, नगर
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर सोशल मीडियातून टीका केली होती. ‘टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही’, असे म्हणत त्यांनी अण्णा हजारे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या टीकेला अण्णा हजारे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. आपली बदनामी केल्याप्रकरणी आव्हाड यांच्याविरूद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे हजारे यांनी सांगितले.

काँग्रेस सरकारविरोधात रामलीला मैदानावर ऐतिहासिक आंदोलन करणार्‍या अण्णांनी देशात आणि महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्यापासून एकही आंदोलन केलेले नाहीये. अण्णा हजारे यांची काय मजबुरी आहे की काँग्रेसचे सरकार आल्यावरच ते आंदोलन करतात. भाजपचे सरकार आल्यावर ते मौनव्रत का धारण करतात, असे सवाल लोक विचारत असतात. हाच धागा पकडून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारे यांना सवाल करणारी ‘एक्स’वर एक पोस्ट केली आहे.
अण्णा हजारे यांचा फोटो शेअर करीत ‘या माणसानं देशाचं वाटोळं केलं. टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही’, अशी पोस्ट त्यांनी केली आहे. याला उत्तर देताना हजारे म्हणाले, ‘माझ्यामुळे देशातील नागरिकांचे भले झाले, मात्र त्यांच्या काही कार्यकर्त्यांना सत्तेपासून दूर व्हावे लागले. याची खंत त्यांच्या मनामध्ये असावी. यावर वकीलांशी चर्चा करून आव्हाड यांच्याविरूद्ध अब्रू नुकसानीचा दावा करणार आहे.’

बरोबर बारा वर्षांपूर्वी एप्रिल महिन्यात ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ नावाच्या संघटनेने काँग्रेस सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात रान उठवलं होतं. त्यांना दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि तमाम काँग्रेसविरोधी सामाजिक आणि राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला होता. लोकपालच्या मुद्द्यावर अनेक दिवस चाललेलं आंदोलन दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या मध्यस्थीनंतर अण्णांनी मागे घेतले. परंतु भाजपचं सरकार येऊन आता १० वर्ष होत आलेत, मात्र त्यांनी भाजप सरकारच्या विरोधात एकही आंदोलन न केल्याने सोशल मीडियावरून नेटकरी त्यांना सवाल विचारताहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *