जिल्हास्तरीय योगासन पंच प्रशिक्षण कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचा उपक्रम; साडेनऊशे प्रशिक्षणार्थींचा सहभाग

नायक वृत्तसेवा, संगमनेर
योगासनांचा खेळात समावेश झाल्यापासून देशभरात या खेळाचे महत्त्व वाढले असून आंतरराष्ट्रीय योगासन स्पोर्टस् फेडरेशनपासून महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनपर्यंतच्या विविध संस्थांकडून योगासनांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनने तीन दिवसीय ऑनलाईन पंच प्रशिक्षणाचा उपक्रम राबविला. या शिबिरात राज्यभरातील विविध भागातील सुमारे साडेनऊशे प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते अशी माहिती असोसिएशनचे राज्यसचिव डॉ. संजय मालपाणी यांनी दिली.

रविवार 14 ते मंगळवार 16 या कालावधीत घेण्यात आलेल्या या प्रशिक्षण शिबिरात राज्यातील 36 जिल्ह्यांमधून 953 प्रशिक्षकांनी सहभाग नोंदविला. या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय योगासन स्पोर्ट्स फेडरेशनचे सेक्रेटरी जनरल डॉ. जयदीप आर्य यांनी केले. यावेळी त्यांनी संघटनेच्या कार्यात महाराष्ट्राच्या योगदानाबद्दल विशेष कौतुक केले. याप्रसंगी राज्य संघटनेचे अध्यक्ष बापू पाडळकर, सचिव डॉ.संजय मालपाणी यांनी देखील प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. प्रारंभी राज्य स्पर्धा प्रमुख सतीश मोहगावकर यांनी शिबिराची रूपरेषा आणि आवश्यकता याबद्दल माहिती दिली.

सध्या राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरु असल्याने या शिबिराचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून योगासन स्पर्धांची पद्धत, त्याचा अभ्यासक्रम, पंचांचे कार्य आणि जबाबदारी, सूक्ष्म गुणांकन, सॉफ्टवेअरचा वापर आदी विषयांवर सतीश मोहगावकर, राजेश पवार, महेश कुंभार, स्नेहल पेंडसे, भूषण टाके, सुहास पवळे, मंगेश खोपकर, नीलेश पठाडे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. संजय मालपाणी आणि प्रशिक्षकांनी प्रशिक्षणार्थीच्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे देवून त्यांच्या शंकांचे निरसन केले. प्रशिक्षणाचा तांत्रिक भाग निलेश पठाडे यांनी सांभाळला.

बुधवार 16 ऑगस्ट रोजी ऑनलाईन पद्धतीने लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आल्या. शिबिराचा समारोप राष्ट्रीय योगासन फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष उदीत सेठ यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बोलताना त्यांनी योगासन फेडरेशनची स्थापना, राष्ट्रीय योगासन स्पर्धा, आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धा आणि भविष्यात ऑलिम्पिकमध्ये योगासन खेळाचा समावेश होणार असल्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष बापू पाडळकर यांनी राज्यभरातून सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन करतांना यशस्वी आयोजनाबद्दल संघटनेच्या पदाधिकार्‍यांचे कौतुक केले. डॉ. संजय मालपाणी यांनी पाहुण्यांचा परिचय व कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. राजेश पवार व रुचिता ठाकूर यांनी शिबिराचे संचालन तर स्नेहल पेंडसे यांनी आभार मानले.

Visits: 89 Today: 1 Total: 1101163

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *