सकल धनगर समाजाकडून विखे पिता-पुत्रांचा निषेध अहमदनगर नामांतर प्रकरण; जिल्हाधिकारी कार्यालयावरही काढणार मोर्चा


नायक वृत्तसेवा, राहुरी
अहमदनगरच्या नामांतराच्या मुद्द्याला आता वेगळे वळण लागले आहे. नामांतरास विरोध दर्शविणारे भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा धनगर समाजातर्फे निषेध करण्यात आला आहे. आगामी निवडणुकांमध्ये त्यांना धडा शिकविण्याचा इशाराही देण्यात आला आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगरचे नामांतर अहिल्यादेवीनगर करण्याची मागणी केली आहे. त्याला विखे पिता-पुत्रांनी विरोध दर्शविला आहे. त्यानंतर जिल्ह्यातील धनगर समाजाकडून ही प्रतिक्रिया आली आहे. पडळकर यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर लवकरच मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.

राहुरी येथे सकल धनगर समाजाची बैठक झाली. त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान, यशवंत सेना, धनगर समाज युवा मल्हार सेना, धनगर ऐक्य परिषद, धनगर समाज उन्नती मंडळ, यशवंत प्रहार संघटना यांच्यावतीने राहुरीचे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांना निवेदन देण्यात आले. अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरनगर असे करावे अशी मागणी त्यात करण्यात आली आहे.

अहिल्याभवनमध्ये धनगर समाज बांधवांची बैठक झाली. या बैठकीत आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेमध्ये ठराव मांडला व शिंदे-फडणवीस सरकारने त्यास सहमती दर्शविली. याबाबत अभिनंदनचा ठराव मांडण्यात आला. याशिवाय या मागणीला विरोध करणारे खासदार डॉ. सुजय विखे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचा निषेध करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या जरी धनगर समाजाच्या असल्या तरी अखंड हिंदू समाजाविषयी त्यांचे कार्य मोठे आहे. त्यांचे जन्मगाव हे अहमदनगर जिल्ह्यातीलच असून नामांतर केल्याने अहमदनगर जिल्ह्याचे नाव मोठे होईल. अशा महान व्यक्तीच्या नावाला कुणीही विरोध करू नये. या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरीय निवेदने देऊन येत्या आठ दिवसांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर या मागणीचा मोर्चा नेण्यात येईल. यापुढे जर कोणी या नावाला विरोध करण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा यशवंत सेनेचे जिल्हाप्रमुख विजय तमनर यांनी दिला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अण्णासाहेब बाचकर, वावरथचे सरपंच ज्ञानेश्वर बाचकर, जांभळीचे सरपंच रामदास बाचकर, पिंपरी अवघडचे सरपंच श्रीकांत बाचकर, अहिल्यादेवी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष दत्ताभाऊ खेडेकर, सामाजिक कार्यकर्ते महेशभाऊ तमनर, डॉ. किशोर खेडेकर, भारत मतकर, यशवंत सेनेचे तालुकाप्रमुख भागवत झडे, बिरोबा देवस्थान ट्रस्टचे भास्कर मंचरे, कोंडीराम बाचकर, दादाभाऊ तमनर, संदीप तमनर, धामोरीचे माजी सरपंच अनिल माने, पिंपरी अवघडचे उपसरपंच दत्तात्रय बाचकर, धनगर समाज युवा मल्हार सेनेचे हरिभाऊ चोरमले, यशवंत सेनेचे रामदास बाचकर आदी यावेळी उपस्थित होते.

Visits: 15 Today: 1 Total: 115212

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *