दीर्घकाळानंतर स्थानिक गुन्हे शाखा संगमनेरात सक्रिय! बहुचर्चीत कत्तलखाने झाले लक्ष्य; कारवाईतून मात्र ‘लाईन’ टाकल्याचा वास..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या वर्षभर अमलीपदार्थांसह वाढती गुन्हेगारी समोर करुन संगमनेरात सुरु असलेल्या राजकीय चिकलफेकीला नगरपालिका निवडणुकांसह विश्राम मिळाला आहे. विधानसभेच्या निकालांपासूनच संगमनेरात कुरघोडीचे राजकारण रंगल्याने त्यातून शहरातील सर्वच अवैध व्यवसायांवर आंच आली. सत्ताधारी आणि विरोधक अशा दोहींकडून कारवाया होणार्‍या गुन्हेगारांशी एकमेकांचे नातेही जोडले जावू लागल्याने पालिका निवडणुकीत हा मुद्दाही प्रभावी ठरला. त्यामुळे स्थानिक पोलिसांसह दीर्घकाळ ‘चाचपणी’तच गेलेल्या अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचाही नाईलाज झाला होता. मात्र आता निवडणूका संपताच ‘त्या’ विषयाचे गांभीर्यही संपल्याने दीर्घकाळ शांत बसलेली ‘एलसीबी’ आता सक्रिय होवू लागली असून रविवारी जमजम कॉलनीत छापा घालून शाखेच्या पथकाने तब्बल तीन टन गोवंशाचे मांस हस्तगत करीत संगमनेरातील बेकायदा कत्तलखाने आजही सुरुच असल्याचे सिद्ध केले. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला. तरीही, प्रत्यक्षात सदरील कत्तलखान्याचा मालक मात्र भलताच असल्याची व त्याच्याशी तडजोड करुन पुढील ‘लाईन’ सुरळीत झाल्याची चर्चाही सुरु झाली आहे. त्यामुळे दीर्घकाळानंतर सक्रिय झालेल्या एलसीबीने कारवाई केल्यानंतरही त्यातून संशयाचा वास येत आहे. सदरील कारवाई कत्तलखान्यांचा ‘म्होरक्या’ म्हणून नेहमीच समोर आलेल्या कसायाच्या वाड्यावर झाली, प्रत्यक्षात मात्र गुन्ह्यातून त्याचे नाव वगळले गेल्याने या चर्चांना बळ मिळाले आहे.


याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (ता.4) सायंकाळी सातच्या सुमारास भारतनगर परिसरातील जमजम कॉलनीतील एका वाड्यावर छापा घातला. यावेळी वाड्यात मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल झाल्याचे व त्यांचे अवशेष वेगळे करण्याचे काम सुरु असल्याचे पोलीस पथकाने पाहिले. सदरील वाडा यापूर्वी डझनाने गुन्हे दाखल असलेल्या व संगमनेरच्या बेकायदा कत्तलखाना चालकांचा म्होरक्या म्हणून नेहमीच समोर येणार्‍या कसायांच्या जोडीचा होता. चार वर्षांपूर्वी 2 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या कारवाईत याच कसायाच्या वाड्यातून रोकडसह ‘काळी’ व ‘लाल’ रंगाची डायरी हस्तगत झाली होती. त्यात स्थानिक पातळीपासून ‘स्थानिक’च्या उंचीपर्यंत प्रत्येकाचा मासिक दरही नमूद केलेला होता.


रविवारी (ता.4) याच ठिकाणावर कारवाई सुरु असताना त्याची वाच्चताही झाली, त्यातच इतक्या मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल करुन त्यांचे मांस साठवले गेल्याने छाप्याच्या जागेत बदल होण्याचीही शक्यता नव्हती. त्यामुळे ‘अखेर’ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाड्याच्या आणि पर्यायाने कत्तलखान्याच्या मूळ मालकाला ‘अभय मार्ग’ दाखवून बाहेरील ‘तोंडं’ बंद करण्यासाठी मूळ मालकाच्या पुतण्यासह तिघा ‘पंटर’ना ताब्यात घेत पोलीस कॉन्स्टेबल योगेश कर्डिले यांच्या तक्रारीवरुन त्या सर्वांवर भारतीय न्यायसंहितेच्या कलम 271, 325 3 (5) सह महाराष्ट्र पशूसंरक्षण कायद्याच्या कलम 5 (ब), (क), 9, 9 (अ) प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे यांच्याकडे सोपवला आहे.


चार वर्षांपूर्वी भारतनगर परिसरातील साखळी कत्तलखान्यांवर इतिहासातील सर्वात मोठी कारवाई झाली होती. त्यावेळी तत्कालीन श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर पोलिसांनी घातलेल्या छाप्यात एकारेषेत असलेले दहा साखळी कत्तलखाने उघड होवून जवळपास 31 टन वजनाचे कांपलेले गोमांस, 73 जिवंत जनावरे, चारचाकी वाहने, रोकड आणि अन्य असा जवळपास सव्वाकोटी रुपयांहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. त्यावेळी पोलिसांच्या कारवाईतून नवाज कुरेशी व समद कुरेशी या दोघा भावंडांची नावे समोर येण्यासह त्यांच्या बेकायदा कत्तलखान्यातून ‘त्या’ डायर्‍याही हाती लागल्या होत्या. त्यावरुन हे दोघेही संगमनेरातील सर्व बेकायदा गोवंश कत्तलखान्यांचे ‘म्होरके’ असल्याचे ठळकपणे समोर आले होते.


मध्यंतरी संगमनेरचे पोलीस उपाधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी संबंधित आरोपीवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची संख्या पाहता शहर पोलिसांना त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते. मात्र तत्कालीन शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी आरोपीशी असलेल्या स्नेहपूर्ण संबंधांच्या कारणाने डझनावर गुन्ह्यांची नोंद असलेल्या या आरोपीच्या नावातच जाणीवपूर्वक घोळ केल्याने त्याला शेवटपर्यंत तडीपारीची नोटीस प्राप्त होवू शकली नव्हती. त्यावरुन या महाशयांचे पोलीस दलातील विविध टप्प्यांवर कधी घनिष्ट संबंध आहेत याचेही चित्र दिसले होते.


गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत संगमनेरात राजकीय परिवर्तन झाले. त्यापूर्वी संगमनेरात गोवंशा विरोधात झालेल्या आंदोलनात परिवर्तनासह निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा सहभाग असल्याने निवडणुकीच्या निकालापासूनच शहरातील बेकायदा कत्तलखान्यांसह विविध अमलीपदार्थांच्या तस्करीचा आणि अवैध व्यवसायांचा मुद्दाही वेळोवेळी चर्चेत येवू लागला. त्यातून दबाव निर्माण झाल्याने पोलिसांकडून कारवायाही वाढल्या. मात्र या कारवायांमधून उघड होणार्‍या अवैध व्यावसायिकांशी दोन्ही बाजूने एकमेकांचे संबंध जोडण्यास सुरुवात झाल्याने शहरातील अवैध व्यवसाय सुरु ठेवणे धंदेवाईकांसह पोलिसांसाठीही डोकेदुखी ठरु लागले. त्यातच नवीन जिल्हा पोलीस प्रमुख येण्यापूर्वी ‘एलसीबी’ने जिल्ह्यात घातलेला ‘धिंगाणा’ पाहता अन्य तालुक्यांमध्येही कमी-अधिक प्रमाणात संगमनेरसारखीच स्थिती होती, ती स्थानिक निवडणुकांपर्यंत राहील असा या सगळ्याच मंडळींचा अंदाज होता.


त्यामुळे गेल्या वर्षभर केवळ चाचपणीतच वेळ घालवणार्‍या स्थानिक गुन्हेशाखेचे आता हात उघडले गेले असून जिल्ह्यातील विविध ठिकाणी छापेमारीचे सत्र राबवून शाखा ‘सक्रिय’ झाल्याचा संदेश पसरवण्यास सुरुवात झाली आहे. संगमनेरचे गोवंश कत्तलखाने म्हणजे महिन्याकाठी लाखोंची कमाई करुन देणारे साधन. त्यावरील कारवाई करतानाही शाखेच्या पथकाने ‘म्होरक्या’चा वाडाच निवडल्याने आणि त्यातही सायंकाळी सातच्या कारवाईचा मध्यरात्रीच्या सुमारास गुन्हा दाखल करताना प्रत्यक्षात त्यातून वाडा मालकाला गायब करुन चर्चा थोपवण्यासाठी त्याच्या पुतण्यासह अन्य दोघा पंटरवर कारवाई करण्यात आल्याचे समोर आल्याने गुन्हे शाखेच्या सक्रियतेचे मार्गक्रमणही आता समोर येवू लागले आहेत.


भौगोलिक दृष्टीने अवाढव्य असल्याने जिल्ह्यात पोलीस मुख्यालयासह श्रीरामपूर अपर पोलीस अधिक्षक कार्यालय कार्यरत असून सात उपविभाग आणि 33 पोलीस ठाण्यांद्वारा संपूर्ण जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेसह गुन्हेगारीचे नियंत्रण केले जाते. पूर्वी अपवादात्मक एखाद्या गंभीर प्रसंगात तत्काळ गुन्ह्याचा तपास आणि मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचा जिल्ह्यातील अन्य पोलीस ठाण्याच्या कारभारात हस्तक्षेप असायचा. मात्र गेल्याकाही वर्षात या परंपरा मागे पडल्या असून आता जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दित नियमितपणे स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍यांचा वावर असतो. स्थानिक पोलीस ठाण्यांप्रमाणेच त्यांच्याकडून त्या-त्या पोलीस ठाण्याच्या हद्दितील सर्व गुन्हेगारी कारवाया आणि अवैध व्यवसायांवर नियंत्रण ठेवले जाते. यापूर्वी या शाखेचा परिपूर्ण गैरफायदा घेत सायबरमध्ये दीर्घकाळ कार्यरत असलेल्या ‘भाऊ’ने घातलेला अक्षरशः ‘धिंगाणा’ही जिल्ह्याने अनुभवला आहे. यासर्व प्रसंगानंतर नूतन पोलीस अधिक्षकांनी पदभार घेतल्यापासून हा हस्तक्षेप थांबलेला असताना पालिका निवडणूका होताच त्यात सक्रियता आल्याने शाखेकडून लाईन टाकण्यास सुरुवात झाल्याची चर्चाही रंगली आहे.

Visits: 152 Today: 2 Total: 1578046

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *