राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत पालकमंत्र्यासमोर निर्माण झाला संभ्रम! निम्म्या जिल्ह्याचा स्वबळाचा नारा, तर निम्म्या जिल्ह्याला महाविकास आघाडीची आशा..

नायक वृत्तसेवा, अहमदनगर
राज्यातील महाविकास आघाडीचे सूत्र स्थानिक पातळीवरील निवडणूकांमध्ये रुजेल का याबाबत तिन्ही पक्षांकडून चाचपणी सुरु करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मंगळवारी राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे ग्रामविकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील पदाधिकार्यांची बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रवादीचे निरीक्षक अंकुश काकडेही उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील निम्म्या तालुकाध्यक्षांनी आघाडीबाबत अनुकूलता दर्शविली, तर निम्म्यांनी आघाडीला विरोध करीत स्वबळाची मागणी केली. त्यातही काहींना शिवसेना अडचणीची वाटल्याने आगामी काळात होणार्या जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांच्या निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संभ्रमात असल्याचे दिसून आले.

ओबीसी आरक्षणावरुन निर्माण झालेला पेच कायम असताना राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत येत्या 5 एप्रिल रोजी अंतिम प्रभागरचना जाहीर करण्याचा निर्णय जारी केला आहे. त्यामुळे येत्या मे मध्ये या निवडणुका पार पडतील असा अंदाज व्यक्त होवू लागल्याने राजकीय पक्षांनी स्थानिक पातळीवरील राजकीय स्थितीचा अंदाज घ्यायला सुरुवात केली आहे. हाच धागा पकडून राष्ट्रवादीने मंगळवारी आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीसाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, पक्ष निरीक्षक अंकुश काकडे यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रसचे सर्व तालुकाध्यक्ष उपस्थित होते. या बैठकीतून या दोन्ही नेत्यांनी महाविकास आघाडीच्या सूत्राचीही चाचपणी केली.

जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार असतानाही या बैठकीला केवळ कोपरगावचे आमदार आशुतोष काळे हे एकमेव लोकप्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी सुरुवातीलाच भाजपाला रोखण्यासाठी एकास एक हेच सूत्र राबवावे लागेल व त्यासाठी कोपरगाव, शिर्डी व राहाता नगरपरिषदांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी व्हावी याचे त्यांनी समर्थन केले. श्रीरामपूरचे तालुकाध्यक्ष अविनाश आदिक यांनी गेल्या वेळच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपाशी आघाडी केल्याचे सांगताना यावेळी मात्र तसा प्रकार घडणार नसल्याचे स्पष्ट करताना महाविकास आघाडीने एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जावे असे मत व्यक्त केले.

संगमनेर राष्ट्रवादीच्यावतीने उपस्थित असलेले युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी सन्मानाने स्थान मिळाल्यास आघाडी अथवा स्वबळाचा नारा दिल्याने निम्म्या जिल्ह्याने त्यांचीच री ओढली. यावेळी देवळाली प्रवरा (राहुरी) पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसला सोबत घ्यावे, मात्र शिवसेनेची ताकद अतिशय कमी असल्याने विनाकारण त्यांना मोठे करु नये असे मत अजित कदम यांनी मांडले. पाथर्डीच्या शिवशंकर राजळे यांनीही स्वबळाची तयारी दाखविताना आघाडीचे सूत्र मात्र मान्य असल्याचे सांगितले. आमदार रोहित पवार यांच्या अनुपस्थितीमुळे जामखेडबाबत नेमकी दिशा समोर आली नाही, मात्र मधुकर राळेभात यांनी आघाडीने एकत्रित निवडणुका लढाव्यात असा विचार मांडला.

शेवगावच्या बाबतीत मत व्यक्त करताना सभापती क्षितीज घुले यांनी स्वबळाचा नारा दिला. त्यांनी मंत्री मुश्रीफ यांच्यासमोर आपले मत व्यक्त करताना शेवगावची पृष्ठभूमी राष्ट्रवादीसाठी अनुकूल असल्याने आघाडीला विेराध असल्याचे सांगितले. तसाच विचार राहुरीच्या मच्छिंद्र सोनवणे यांनीही व्यक्त केला व पक्षाने स्वबळावरच निवडणूक लढवावी अशी सूचना मांडली. या सगळ्यांचा विचार ऐकून घेतल्यावर मुंबईत वरीष्ठांशी चर्चा झाल्यानंतर राज्यातील निवडणुकांबाबत निर्णय होईल, मात्र कोणाला सोबत घ्यावे याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवरच व्हावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या बैठकीच्या प्रांरभी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी काँग्रेस व शिवसेनेच्या जिल्ह्यातील मंत्र्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की; ‘महाविकास आघाडीत ‘संगमनेर’ अवघड दुखणे आहे. तेथे राज्याचे नेते, मंत्री बाळासाहेब थोरात राष्ट्रवादीला सांभाळून घेत नाहीत. त्यामुळे न्याय मिळत नसेल तेथे ताकदीने लढावे लागेल. विधान परिषदेची जागा कायम राखायची असेल तर जिल्ह्यातील नेत्यांना एकसंघ ठेवण्यासाठी पालकमंत्र्यांनी आपली भूमिका वठवावी’ अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. यावेळी त्यांनी शिवसेनेचे मंत्री पाथर्डीत भाजपाला साथ देत असल्याचा घणाघातही केला.

एकंदरीत येत्या काही महिन्यांत राज्यातील 208 नगर परिषदांच्या निवडणुका घेण्याचा घाट सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रलंबित प्रभाग रचनांबाबत कालबद्ध कार्यक्रम जाहीर करुन 5 एप्रिल रोजी अंतिम प्रभागरचना जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या मे मध्ये या निवडणुका पार पडतील असे अंदाज व्यक्त होवू लागले असताना राज्यातील राजकीय पक्षांनी परिस्थितीचा अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी काँग्रसने उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकार्यांचा शिर्डीत मेळावा घेतला होता, तर मंगळवारी राष्ट्रवादीने पालकमंत्री व पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या लोकप्रतिधींसह तालुकाध्यक्षांकडून आढावा घेतला.

