नगराध्यपदाच्या पदभार सोहळ्याबाबत प्रशासनातच गोंधळ! शपथ घेण्यापूर्वीच पदभार कसा?; सेवा समितीकडून जय्यत तयारीची चर्चा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
पालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होवून दहा दिवस उलटल्यानंतरही नगराध्यक्षांसह नूतन नगरसेवकांचा शपथविधी झालेला नाही. निकालानंतर लागलीच तांबे दाम्पत्य परदेशात गेल्याने हा सोहळा अधिक लांबला गेल्याचे बोलले गेले. त्यानंतर आता येत्या शनिवारी (ता.3) सत्ताधारी संगमनेर सेवा समितीकडून पदभार स्वीकारण्याच्या हालचालीची चर्चा सुरु झाल्याने एकतर्फी निकालानंतरही काहीशा थांबलेल्या राजकीय चर्चांना पुन्हा हवा मिळाली आहे. मात्र महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमानुसार निकालानंतर ठराविक कालावधीत पालिकेची ‘विशेष सभा’ बोलावण्याचा अधिकार जिल्हाधिकार्‍यांना आहे. त्यांनी बोलावलेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अथवा त्यांचा प्रतिनिधी (प्रांताधिकारी किंवा तहसीलदार) असतो. या सभेत त्यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांना संविधानासह गोपनीयतेची शपथ दिली जाते आणि त्यानंतरच पदग्रहण समारंभ होवू शकतो. प्रत्यक्षात मात्र जिल्हाधिकार्‍यांच्या मार्फत महसूल अथवा पालिका प्रशासनाने अशा ‘विशेष सभे’ची सूचना प्रसिद्ध केल्याबाबत चाचपणी केली असता प्रशासनातच एकमत नसल्याचे व पदभार सोहळ्याबाबत गोंधळाचे वातावरण असल्याचे दिसले. पालिकेची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबवणार्‍या प्रांताधिकार्‍यांनी या विषयावर थेट कानावरच हात ठेवला तर, पालिकेच्या उपमुख्याधिकार्‍यांनी अध्यक्षपदाचे पदग्रहण होवून त्यांचे ते ठरवतील असे विचित्र उत्तर दिले.


सलग सत्तेच्या कारणाने निर्माण झालेले नकारात्मक वातावरण, विधानसभेतील सत्तापालट, केंद्र आणि राज्यातील पक्षाची घसरणी आणि त्यातून विचलीत होत असलेले कार्यकर्ते अशा सगळ्याच पडक्या बाजू सोबतीला असतानाही आमदार सत्यजीत तांबे यांनी आपल्यातील नेतृत्वगुणांची छाप निर्माण करीत आधी लढण्यासाठी मैदान निर्माण केले आणि त्यानंतर निश्‍चित ध्येय, सूक्ष्म नियोजन, अचूक पाठपुरावा आणि त्यातून निर्माण झालेल्या आत्मबळावर लक्ष्याच्या दिशेने वाटचाल या सूत्रांचा वापर करुन केवळ ऐतिहासिक विजयच मिळवला नाही तर, आपले नेतृत्वही सर्वमान्य केले. त्यामुळे पालिकेतील त्यांच्या गटाचा पदग्रहण सोहळा दिमाखदारच होईल अशी संगमनेरकरांना आशा होती. मात्र निकालानंतर लागलीच तांबे दाम्पत्य पूर्वनियोजित परदेश दौर्‍यावर गेल्याने या विक्रमी यशासह पालिकेत होणार्‍या शपथसोहळ्याची चर्चाही विरळ होत गेली.


मात्र नववर्षाच्या सूर्योदयासोबतच येत्या शनिवारी (ता.3) परदेशातून परतणार्‍या नवनिर्वाचित नगराध्यक्षा मैथिली तांबे यांचा पदग्रहण सोहळा होणार असल्याच्या चर्चा कानावर येवू लागल्या. त्यामुळे निवडणूक निकालानंतर गेली दहा दिवस थांबलेल्या राजकीय चर्चा पुन्हा सुरु झाल्या असून त्यातून पालिकेतील ऐतिहासिक यशानंतर सत्ताधारी गटाकडून आयोजित होणार्‍या शपथ सोहळ्याच्या भव्यतेवरुन चर्चा रंगल्या आहेत. सध्या वातावरणाचा पाराही कमालीचा खाली आलेला असल्याने गल्लोगल्ली शेकोट्यांभोवतीचे रिंगण वाढू लागले आहे, त्यात आता शपथ सोहळ्याच्या चर्चेनेही प्रवेश केल्याने थंडीचीही रंगत वाढली आहे.


याबाबतची अधिकृत माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता सत्ताधारी गटाकडून सोहळ्याची तयारी सुरु असली तरीही तो शनिवारीच होईल याबाबत ठामपणे सांगणारा कोणीही समोर आला नाही. त्याचवेळी कायद्यातील तरतुदींचा अभ्यास करता महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमानुसार नगरपरिषदेच्या निवडणूक निकालानंतर निवडून आलेल्या नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या नावाने राजपत्र प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून जिल्हाधिकारी ठराविक दिवसांत त्या नगरपालिकेच्या नूतन लोकप्रतिनिधींची ‘विशेष सभा’ बोलावतात. या सभेच्या अध्यक्षस्थानी स्वतः जिल्हाधिकारी अथवा त्यांचे प्रतिनिधी म्हणून प्रांताधिकारी किंवा तहसीलदार असतात. त्यांच्या समक्षच निवडून आलेल्या सर्व नूतन सदस्यांना संविधान आणि गोपनीयतेची शपथ दिली जाते.


याच सभेत जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांचाही शपथविधी होतो व त्यानंतरच ते नगराध्यक्षांच्या दालनात जावून पदभार स्वीकारल्याच्या पत्रावर स्वाक्षरी करतात. कोणत्याही लोकप्रतिनिधीला त्यांचे कर्तव्य पार पाडण्यापूर्वी कायदेशीर शपथ घेणे अनिवार्य असते. संगमनेरच्या प्रकरणात नूतन नगराध्यक्ष निवडीपासून अद्याप विदेशात असल्याने त्यांचा अथवा अन्य सदस्यांचा शपथविधी झालेला नाही. जो पर्यंत सर्व नूतन सदस्यांना कर्तव्याची शपथ दिली जात नाही, तो पर्यंत त्यांचे सदस्यत्व अधिकृत होत नाही. आज-उद्यात तांबे दाम्पत्य भारतात परतण्याची शक्यता असून त्या आधारावरच या चर्चा सुरु झाल्याचे जाणवल्यानंतर प्रशासकीय पातळीवरील तयारीची चाचपणी केली असता अशा बैठकीसह शपथविधीबाबत प्रशासनच गोंधळात असल्याचे दिसले.


कथीतपणे शनिवारी (ता.3) हा सोहळा होणार म्हटल्यावर जिल्हाधिकार्‍यांकडून त्याबाबतची सूचना प्रसिद्ध झाली असेल असा विचार करुन पालिकेची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सांभाळणार्‍या संगमनेरच्या उपविभागीय अधिकार्‍यांकडे विचारणा केली असता त्यांनी आपला संबंध निवडणुकीपूरताच असे म्हणतं चक्क कानावरच हात ठेवले. त्यानंतर पालिकेच्या उपमुख्याधिकार्‍यांकडे चौकशी केली असता त्यांनी विधानसभा, लोकसभेप्रमाणे गटनेता, पत्र असा भलताच गुताडा सांगत शनिवारी त्यांचा-त्यांचा पदभार समारंभ होणार असेल असे म्हणतं पालिका अधिनियमांबाबतचे आपले अज्ञानही उघड केले. त्यातून ऐतिहासिक विजयानंतरही संगमनेर सेवा समितीच्या नूतन नगराध्यक्षांसह निवडून आलेल्या नगरसेवकांचा शपथग्रहण कधी होणार याबाबतची उत्कंठा कायम असताना आता त्यात या सोहळ्याचे निमंत्रक नेमके कोण? या नवीन विषयालाही फोडणी मिळाली आहे.


महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमानुसार निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना त्यांचे कर्तव्य पार पाडण्यापूर्वी कायदेशीर शपथ घेण्याचे बंधन आहे. निवडून आलेल्या प्रत्येक नगराध्यक्षाला आणि नगरसेवकाला पद आणि गोपनीयतेची संवैधानिक शपथ घ्यावीच लागते. त्यासाठी जिल्हाधिकारी विशेष सभा बोलावून स्वतःच्या अथवा आपल्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत सर्वांचा शपथविधी घडवून आणतात व त्यानंतरच पदग्रहण सोहळा होवू शकतो. मात्र प्रशासकीय पातळीवरुन अद्यापही शनिवारी (ता.3) पालिकेची ‘विशेष सभा’ बोलावल्याची कोणतीही सूचना प्रसिद्ध केली गेली नाही. त्यामुळे शपथ सोळ्याबाबत नागरिकांसह प्रशासनही गोंधळलेले असल्याचे दिसत आहे.

Visits: 127 Today: 3 Total: 1412430

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *