विश्वासावरच संगमनेर मर्चंटने नावलौकिक मिळवला ः मालपाणी अकोले शाखेच्या 42 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
नायक वृत्तसेवा, अकोले
आशिया खंडातील व्यापारी वर्गात आणि सर्वसामान्य जनतेच्या मनात गेल्या चार वर्षांपासून संस्थेने 24 तास सेवा देऊन नोटबंदी आणि टाळेबंदीच्या कठीण काळातही ग्राहकांना तत्पर सेवा दिली आहे. त्यावरुन संगमनेर मर्चंट बँकेने मोठा विश्वास संपादन करत नावलौकिक मिळवला आहे. यापुढेही संस्थेद्वारे अधिकाधिक अत्याधुनिक सेवा-सुविधा देण्यासाठी आमचे संचालक मंडळ प्रयत्नशील राहील असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष तथा उद्योजक राजेश मालपाणी यांनी केले.
अकोले शाखेच्या 42 व्या वर्धापन दिनानिमित्ताने ते बोलत होते. यावेळी अकोलेचे तहसीलदार मुकेश कांबळे, संचालक गोपाल पडतानी, संतोष कारवा, अकोले शाखा समिती अध्यक्ष दिलीप पारख, संचालक प्रकाश राठी, राजेश वाकचौरे, संदीप जाजू, अकोले शाखेचे सल्लागार सतीश बुब, अजित सुरपुरीया, डॉ.मारुती भांडकोळी, डॉ.ज्योती भांडकोळी, डॉ. संदीप कडलग, रवींद्र वाकचौरे, संदेश धुमाळ, डॉ.विष्णू बुळे, दिलीप पारस, पत्रकार संघाचे सरचिटणीस विश्वास आरोटे, धनंजय भुरके, डॉ.प्रवीण वैद्य, राजेंद्र नाईकवाडी, मंडलाधिकारी बाबासाहेब दातखिळे, विजयकुमार बजाज, शाखाधिकारी प्रकाश कानडे, नीलेश शेणकर, दीपाली नवले, सुवर्णा मुंदडा आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना बँकेचे अध्यक्ष मालपाणी म्हणाले, बँकेने कायमच सभासदांच्या हिताचे निर्णय घेऊन वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त अत्याधुनिक सेवा-सुविधा देण्याचा प्रयत्न संचालक मंडळाचा मानस असतो. सेवा देताना अधिकारी व कर्मचारी देखील मनापासून कष्ट घेतात म्हणून अधिककाधिक व्यापारी आणि शेतकरी आपल्या संस्थेकडे वळाले आहेत. ठेवीदार, कर्जदार, सभासद व ग्राहकांच्या विश्वासावरच बँकेने आपला नावलौकिक मिळवला असल्याचे शेवटी नमूद केले. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करुन बँकेच्या कार्याचा गौरव केला.